नवीन लेखन...

दादर चा जन्म आणि बारसं..!!

मुंबईच्या इतिहासाचा अभ्यास करताना, मला नेहेमी एक गोष्ट खटकायची. ती ही, की मुंबईतलं आजचं सर्वात महत्वाचं ‘दादर’चा उल्लेख कुठे यायचा नाही. मुंबईच्या ब्रिटिशपूर्व इतिहासात फोर्ट विभागाव्यतिकिक्त वाळकेश्वर, वरळी, भायखळा, नाझगांव, परळ, सायन इत्यादींचा उल्लेख आहे, मात्र यात ‘दादर’ कुठेच नव्हतं. मग प्रश्न पडला तो, ‘दादर’ होतं की नाही की असल्यास अगदी नगण्य स्वरुपातील वस्ती होतं, हा..!

या प्रश्नाच्या उत्तराच्या शोधात निघाल्यावर लक्षात येऊ लागलं, की इतिहासातला दादरचा पहिला उल्लेख ब्रिटिश काळातल्या सन १८९६ मध्ये येतो. सन १८९० मध्ये मुंबईत प्लेगची मोठी साथ आली होती आणि दाटीवाटीने वसलेल्या त्या काळच्या मुंबईतली माणसं मोठ्या संख्येने मृत्युमुखी पडू लागली होती. तेंव्हाची मुंबई भायखाळा-माजगांवपर्यंतच होती. पुन्हा असं घडू नये म्हणून ब्रिटिशांनी मुंबईच्या वस्तीचा विस्तार करण्याचं ठरवलं. एव्हाना मुंबईतल्या सर्वच बेटांना एकमेकांशी जेडून झालं होतं आणि या सात बेटांमधे प्रचंड जमिन उपलब्ध झाली होती. तरीही मुंबईतली वस्ती भयखळ्यापर्यंतच मर्यादित असल्याने, आजच्या दादर परिसरात ‘भरणीमुळे उपलब्ध झालेली जमिन’ शेती-वाड्यांसाठी वापरली जात होती. प्लेगच्या साथीनंतर ब्रिटिश सरकारने मुंबईतली गर्दीची वस्ती दादर-माटुंग्या पर्यंत वाढवायची ठरवून त्याप्रमाणे नियोजन करण्यासाठी सन १८९८ मधे ‘Bombay Inprovement Trust (BIT)’ची स्थापना केली. BIT ने व्यवस्थित अभ्यास करून आपली पहिली योजना बनवली आणि तिला नांव दिलं, ती ‘Dadar-Matunga-Wadala-Sion Scheme..!’ या ठिकाणी, म्हणजे सन १९००च्या दरम्यान ‘दादर’ ठळकपणे मुंबईच्या इतिहासात येतं. सन १९१४ च्या आसपास या ट्र्स्टमार्फत हिन्दू काॅलमी, पारशी काॅलनीसारख्या देखण्या वस्त्या आणि फाईव्ह गार्डनसारखा देखणा परिसर जन्माला घातला गेला. आजचं दादर जन्मलं, ते इथे पूर्वेला मुंबई ४०००१४ असा पिनकोड घेऊन.

दादर पूर्व संपूर्णपणे निसर्गाकडून हिसकावून घेतलेल्या (रिक्लेम) जमिनीवर वसवलं गेलेलं आहे, याची आठवण दरवर्षी पावसाळ्यात या इथं थोड्याश्या पावसानेही तयार होत असलेला समुद्र आपल्याला करुन देत असतो. इथे पाणी का तुंबतं याचं कारण इथं सापडतं. बाकी नालेसफाई वैगेरे नेत्यांच्या फाॅर्च्यूनर, मर्सिडीज गाड्यांचा वार्षिक हप्ता आणि पंचवार्षिक निवडणूक फंडाची तयारी असते.

असो. पूर्वेला नव्याने तयार केलेला भुभाग पुढे पश्चिमेकडच्या माहिम बेटाला जोडला जाऊन पश्चिमेला माहिम-प्रभादेवी ते पूर्वेला नायगाव -माटुंग्याच्या चौकोनातला भाग ‘दादर’म्हणून अस्तित्वात आला असला तरी, दादर पश्चिम पूर्वेच्या दादरनंतर किमान ३०-३५ वर्षांनंतर जन्माला घालण्यात आलं आहे. ‘जन्माला घालण्यात आलं’ हा शब्द प्रयोग मी मुद्दामहून केलेला आहे. कारण पूर्वेचं दादर जसं समुद्राच्या बळकावलेल्या जागेवर वसलंय, तसं पश्चिमेचं दादर हे पूर्वीपासूमच अस्तित्वात असलेल्या माहिमकडून घेतल्या गेलेल्या भुमिवर वसलंय. होय, आजचं शिवसेना भवनपासून ते सिद्धिविनायकाच्या देवळापर्यंतचं पश्चिमेचं हे दादर, एकेकाळच्या माहिममधे आहे आणि हा भाग त्या काळात ‘लोअर माहीम’ म्हणून ओळखला जात असे. आजच्या प्रभादेवी मंदीरापर्यंत तेंव्हा माहिमचाच भाग होता. श्री प्रभादेवीचं मंदिर माहिमला* होतं असा उल्लेख ‘महिकावतीच्या बखरी’त सापडतो, तो यामुळेच.

जुना नकाशा पाहिला, तर माहिम बेट वरळी बेटाच्या पूर्व दिशेला दिसतं. तसंच ते वरळी बेटाच्या मध्यापर्यंत साधारणत: समांतर गेलेलं दिसतं. श्री प्रभादेवीचं मंदीर असलेला भाग आज आपण प्रभादेवी म्हणूनच ओळखत असलो तरी, तो पूर्वीच्या माहिमचाच भाग आहे. माहिम आणि वरळी बेटामधली चिंचोळी खाडी एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला कधीतरी बुजवून जमिन तयार करण्यात आली आणि तयार झालेल्या जमिनिवर कॅडेल रोड (आजचा स्वा. सावरकर मार्ग), त्याच्या शेजारचं सुप्रसिद्ध ‘शिवाजी पार्क’ आणि त्या लगतची वस्ती अस्तित्वात आली. हे सर्व होता होता विसाव्या शतकातलं चौथं दशक संपत आलं होतं. सुरुवातीला हा भाग नारळांच्या वाड्यांचा, शांत, सुंदर निवासाचा असा होता. पढे हळुहळू वस्ती वाढत गेली आणि प्रशासकीय सोयीसाठी हा भाग माहीमधनं तोडून तो ‘दादर पश्चिम, मुंबई २८’ म्हणून अस्तित्वात आला. आजही माहिम-दादरची हद्द सेना भवनसमोरच्या ‘राम गणेश गडकरी’ चौकात एकमेंकाला भिडते.

इथपर्यंत पूर्व आणि पश्चिम ‘दादर’चा जन्म कसा झाला हे समजलं. आता जन्माला घातलेल्या मुंबईच्या अपत्याला ‘दादर’ हे नांव कसं मिळालं असावं, याचा विचार करू..!

‘दादर’ हे नांव जिना, पायरी किंवा शिडी यावरून मिळालं, असा उल्लेख अनेक ठिकाणी सापडला, पण हे तर्क दृष्ट्या ते पटणं अवघड जातं. एक तर या परिसरात कसले दादर होते आणि ते एवढे प्रसिद्ध का होते, याचं उत्तर कुठे सापडत नाही. दुसरं म्हणजे म्हणजे, समजा इथले दादर सुप्रसिद्ध असावेत म्हणून मुंबईतल्या ह्या भागाला दादर नांव मिळालं, तर मग दादर या नांवाची आणखीही काही ठिकाणं आहेत, त्यांचं नांवही जीना या अर्थाच्या दादरवरून आलं असं मानायचं का? उदा. दादर या नांवाच एक ठिकाण रायगड जिल्ह्यातील पेन तालुक्यात आहे. गुजराते जवळचं दादराही (नगर हवेली) प्रसिद्ध आहे. आणखी एक दादर मुंबई-अहमदाबाद हायवेवर पालघरच्या जवळपास कुठेतरी वाचलेलं मला आठवतं. मुंबईचं दादर नांव जिन्यावरून आलं असं मानलं, तर मग या इतर ठिकाणच्या दादरांचं नांव कसं पडलं, हा प्रश्न अनुत्तरीत राहातो. सबब, मुंबईचं दादर हे नांव शिजी, जीना, पायरी, स्टेप्स किंवा स्टेयरकेस या शब्दांना ओळखल्या जाणाऱ्या पायऱ्यांमुळे पडलं हे मला तर्कदृष्च्या पटत नाही.

मग हे नांव या सुप्रसिद्ध विभागाला कसं मिळालं असावं याचा विचार करतना मला दोन क्लू सापडले. पैकी एकाला इतिहासात काहिसा आधार आहे, तर दुसरा पूर्णपणे तर्कावर आधारीत आहे.

तर्कावर आधारीत असलेलं माझं दुसरं गृहीतक पहिलं मांडतो. आजचं दादर माहिम, वरळी आणि पूर्वेकडच्या परळ बेटात बसलेलं आहे, हे एव्हाना आपल्या लक्षात आलं असेल. या बेटांमधल्या परिसरात भरती-ओहोटीनुसार पाणथळ जमीन, डबकी, चिखल, दलदल आदी असणं अगदी स्वाभाविक आहे. दादर ही अजुनही खोलगट जागा आहे, हे दर पावसाळ्यात आपल्याला (बिएमशीला नाही) नव्याने समजते. खोल या अर्थाच्या काहीसे जवळ जाणारे दरा, दरी, दरार असे शब्द आहेत हे शब्द मला ‘दादर’ या शब्दाचे जवळचे नातेवाईक वाटतात. दुसरं म्हणजे या परिसरात त्या काळात भरती-ओहोटीमुळे निर्माण होणारा चिखल आणि दलदल. यातला ‘दलदल’ हा शब्द मला विशेष लक्ष देण्यासारखा वाटतो. ‘ल’ आणि ‘र’ ची अनेकदा अदलाबदल होत असताना दिसते. बोबडं बोलणाऱ्या व्यक्ती किंवा लहान मुल अनेकदा ‘र’च्या जागी ‘ल’ उच्चारतात. ‘ल’च्या जागी ‘र’ होणं तसं दुर्मिळ असलं तरी काही ठिकाणी होत असतंच. उदा. ‘स्टेला’ ह्या ग्रीक शब्दाचा अर्थ ‘स्टार’ असा आहे. इंग्रजीत तो ‘स्टार’ म्हणूणच समोर येतो. ‘सलीया’ चं ‘सरीया’ होतं. याच न्यायाने ‘दलदल’चं ‘दरदर’ व कालांतराने पुढे ‘दादर’ झाला असावं असं मला वाटतं.

परिसराच्या एखाद्या ठळक लक्षणावरून त्या परिसराला नांव देण्याची लोकांची सवय जसं, वाघाचा वावर असणारी गांवे वाघीरे, वाघीवरे, ताडदेवनजीकची चिखलवाडी किंवा मसजिद बंदरजवळची पायधुणी उत्यादी लक्षात घेता, दलदल-दरदर-दगर-दादर झालं असण्याची शक्यता नाकारता येत नाही. माझ्या तर्काला आणखी बळकटी देतो तो जुन्या हिन्दीतील ‘दादूर’ ( संस्कृत-दर्दुर:) वा ‘दादूरा’ हा ‘बेडूक’ या अर्थाचा शब्द. आता बघा, पाणथळ जमिन, दलदल अशा ठिकाणी ‘दादूरा’ असणं अगदी सहज आहे आणि त्यामुळे बेडकांची जागा या अर्थाने ‘दादूरा’ म्हणजे ‘दादर’ झालं असावं का, असंही मला वाटतं. अर्थात हे सर्व माझ्या कर्कावर आधारलेले माझे (गैर)समज आहेत. मी मुंबईचा अभ्यासक आहे, तज्ञ नव्हे. मुंबई विषयीवरील तज्ञानी मी मांडलेल्या तर्कावर अधिक विचार करावा, असं सुचवेन.

आता इतिहासात आधार असलेलं माझं पहिलं गृहितक. मुंबईचा पहिला राजा प्रताप बिंब सन ११४० मध्ये हा राजा गुजरातहून दमन, के३ल्वे-माहीम मार्गे मुंबईत आला. या प्रताप बिम्बाने मुंबईतील माहीम येथे आपली राजधानी वसवली. या राजाने मुंबईत येताना त्याच्या सोबत राजा बिंबाच्या काळात त्याच्या सोबत केळवे-माहीम परिसरातील सोमवंशी-सूर्यवंशी कुळातील अनेक कुटुंबं आणली आणि त्यांना मुंबईत वसवलं. इतकंच नाही तर येताना या सर्वांनी त्याची जुनी राजधानी केळवे-माहीम परिसरातल्या गावांची आणि देवतांची नावही इथे आणली, असं म्हणता येईल. कारण आताच्या मुंबई माहीमला या राजानेच आपली जुनी राजधानी केळव्याकडच्या नाहीमचं नांव दिलेलं आहे. या बेटाला पूर्वी ‘बरड बेट’ म्हणजे बॅरन बेट किंवा मराठीत ओसाड बेट म्हणत. प्रताप बिम्बाची पूर्वीची राजधानी असलेल्या केळवे-माहीम मधल्या ‘माहीम’च नांव प्रताप बिम्बाने मुंबई माहिमला दिलं, हा लिखित इतिहास आहे.

तसंच काहीसं पुढे असलेल्या परिसरात त्याने मुंबईतल ‘नायगाव’ वसवलं असावं. भाईन्दरची ‘धारावी’ इथे आणून माहीम बेटाच्या पूर्वेला वसवली. त्याने शितालादेवीही इथे आणली. पूर्वीच्या राज्यकर्त्यांची ही पद्धतच असावी, असं इतिहासावरून म्हणता येतं. एखाद्या राजाने नवीन राज्य वसवलं, की आपल्या जुन्या ठिकाणची आणि देवतांची नांव नव्या ठिकाणांना देण्याची प्रथा असावी. मुंबईत अनेक ठिकाणी दिसणाऱ्या शितलादेवी, हरबादेवी किंवा खोकलादेवींची मंदिरं अशीच केळवे-माहिम परसरात्या देवतांशी साधर्म्य सांगणारी आहेत.

पण याचा दादरशी कसा काय संबंध येतो, असा प्रश्न तुम्हाला पडेल. तर तो तसा संबंध लावता येतो. केळवे-माहीम पालघर भागात ‘दादर पाडा’ नांवाचा केळव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर वसलेला भाग आजही आहे. इतकाच नाही तर त्या शेजारी असलेल्या खाडीलाही ‘दादर पाडा खाडी’ असं नांव आहे. या दादरपाडा भागातीलही काही लोक राजा बिंबाच्या काळात त्याच्या सोबत आले असावेत व ते माहीम बेटाच्या दक्षिणेच्या टोकाला, म्हणजे आजच्या प्रभादेवी परिसरात वसले असावेत आणि त्या वस्तीला त्यांनी ‘दादर पाडा’ असं आपलं जुनंच नांव दिलं असाव. माहिमच्या या भुभागावरच दादर नव्याने अस्तित्वात आलं हे आपण वर पाहिलं. आताच्या माहिम-प्रभादेवीच्या दरम्यान त्याराळात नविन वस्ती वसवतावा, त्या वस्तीला इथल्या जुन्या वस्तीच्या नांवातलं ‘पाडा’ गाळून ‘दादर’ हे नांव प्राप्त झालं असावं, असं म्हटलं तर चुकू नये. दादरच्या नावामागे असू शकणारं हे गृहीतक, मला वरच्या जीना, दलदलवैगेरेच्या कथा-तर्कांपेक्षा सत्याच्या अधिक जवळ जाणारे वाटतं. माझं हे गृहीतक इतिहासाशी सुसंगत वाटतं. तज्ञांनी यावरही विचार करावा.

‘दादर’ पूर्व-पश्चिम हे कसं दुसऱ्याकडून घेतलेल्या जमिनीवर वसलेलं आहे, त्याचा हा धावता आढावा. मुंबईतील उर्वरीत ठिकाणांच्या मानाने वयाने अत्यंत तरुण असूनही, दादर आजं मुंबंईतलं सर्वात महत्वाचं नगर बनलेलं आहे. कानामागून आलेल्या पोराकने मुंबईवर आपली छाप टाकलेली आहे. मुंबईच्या भवितव्याची जाहिर चर्चा याच पोराचं अंगण असलेल्या शिवाजी पार्कात नित्यनेमाने होत असते. ‘मुंबईची एक इंचही जमिन कुणाला हिसकावू दिली जाणार नाही’ अश्या गर्जना माहीम आणि समुद्राकडून हिसकावलेल्या जागेवरून केल्या जातात, तेंव्हा ह्या इतिहास माहित असल्याने मला गालातल्या गालात हसू फुटतं.

-@नितीन साळुंखे
9321811091

टिप-
हा लेख मुंबईच्या आजवरच्या अभ्यासातून मला जे आकलन झालेले आहे, त्या आधारावर लिहिलेला आहे. दादर अस्तित्वात असं आलं असावं, यावर मला जे वाटतं, त्याचा हा धावता आढावा आहे. यात काही दोष असल्यास तो माझा आहे असं समजावं. तसंच ‘दादर’चं नांव कसं आलं असावं हा मी केलेला तर्क आहे.

* यासाठी माहिममधलं आणखीही एक ठिकाण आहे. हे मंदिर दोनदा किंवा तीनदा परंतु माहीममधेच उभारलं गेलं. त्याची कथा माझ्या आगामी पुस्तकातल्या ‘प्रभादेवी’मधे वाचायला मिळेल.

मुंबईतील ऐतिहासिक पाऊलखुणांचा मागोवा – लेखांक – ६ वा

नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश
About नितीन अनंत साळुंखे  उर्फ गणेश 377 Articles
श्री नितीन साळुंखे (मित्रपरिवारात गणेश या नावाने परिचित) हे मुळचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वैभववाडी तालुक्यातील खांबाळे या गावचे. सध्या मुक्काम मुंबईत. वाचन, लेखनाची अत्यंत आवड. स्वत:चा ७०० हून जास्त पुस्तकांचा संग्रह. इतिहास, भाषा,शब्दांचा जन्म, देव, धर्म, संस्कृती, प्रथा, परंपरा यांचा अर्थ काय व त्या कशा अस्तित्वात आल्या याचा शोध घेण्याची विशेष आवड. लहानपणापासून संघ स्वयंसेवक व संघविचारांशी एकनिष्ठ. पुणे येथील संघप्रणित सर्वात मोठ्या अशा जनता सहकारी बॅंकेतील प्रदिर्घ नोकरीनंतर त्यांचे मित्र आणि आमदार प्रमोद जठार यांच्याबरोबर काम करण्यासाठी त्यांनी २००७ मध्ये नोकरी सोडली. त्याचबरोबर मित्राबरोबर मुंबईत बांधकाम व्यवसायात पदार्पण. २०-२२ वर्षांचा ज्योतिष शास्त्राचा अभ्यास असल्यामुळे परिचितांमध्ये एक उत्तम ज्योतिषी म्हणून ओळख. सर्व थरातील मित्र. त्यातही बहुतकरून लेखक, कविंचा, कलाकारांचा जास्त भरणा.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..