दादरचं खोदादाद सर्कल माहित नाही असा निदान मुंबईत तरी माणूस नाही. महानगरपालिकेच्या दप्तरात व बीईएसटीच्या बसवर जरी ‘खोदादाद सर्कल’ असं नांव असलं तरी हे सर्कल सामान्यजनांत मशहूर आहे ते ‘दादर टी. टी.’ या नांवाने. या नांवातील ‘टी.टी.’चा फुलफाॅर्म ‘ट्राम टर्मिनस’ असा आहे. पूर्वीच्या ट्राम्स इथपर्यंत येऊन, या सर्कलला वळसा घालून पुन्हा कुलाब्याच्या दिशेने परतीच्या प्रवासाला निघत, म्हणून ट्राम टर्मिनस..!
तर, या खोदादाद सर्कलमधे मला आज एक गंम्मत दिसली. खोदादाद सर्कलच्या चहुअंगाने नेहमी भरभरून वाहता असणारा गोलाकार हमरस्ता वाहतो. सर्कलच्या भोवतालचा हा रस्त्या ओलांडणं म्हणजे जीवावरचा खेळ असतो. ज्याची चाल आणि नजरही तेज आहे, असे गडीही हा रस्ता ओलांडताना दहा वेळा विचार करतात. आडव्या ठेवलेल्या प्रचंड मृत्युगोलात धावण्यासारखंच आहे ते..! तर अशा या खोदादाद सर्कलमधून आज जाताना माझी नजर रस्त्याच्या पलिकडे असलेल्या एका हलत्या ठिपक्यावर पडली. थोडं कुतुहल जागृत झालं आणि मी जरा नीट निरखून पाहीलं तर मला मुठीयेवढं मांजराचं पिल्लू दिसलं. असावं फार तर २०-२५ दिवसांचं. अफाट वेगानं धावणाऱ्या राक्षसारख्या अजस्त्र बस, ट्रक, बेपर्वा कार्स आपल्या साडेपाच-सहाफुटी अंगावर धडकल्या तर आपलं सॅंडविच व्हायची भिती, तर त्या मुठीयेवढ्या मांजराच्या गोंडस पिलाचं काय होईल हा विचार मनात येताच माझा तर काळजाचा ठोकाच चुकला.
मी जीव मुठीत घेऊन रस्ता क्राॅस करून त्या पिलापाशी पोचलो आणि त्याला उचलून सर्कलच्या गेटच्या आत ठेवायला गेलो तर मला तिथे आणखी चार-पाच पिलं दिसली. माझं जागृत झालेलं कुतुहल आणखी वाढलं आणि मी थेट सर्कलच्या आत प्रवेश केला आणि अबबब, आत १०० च्या आसपास वेगवेगळ्या आकाराच्या, वयाच्या आणि रंगांच्या मांजरांचा हलता-खेळता कळपच दिसला. चार लहान मुलं त्या मांजरांच्या पिलांशी खेळताना आणि एक कळती बाई त्या मांजरांना खाऊ देतानाही दिसली. जरा पुढे सर्कलमधल्या झाडांना पाणी घालणारे म्युनिसीपालीटीचे माळीबुवाही दिसले.
मी सहज चवकशी केली तर ही मांजरं अनेक वर्षापासून इथं मुक्कामास असल्याचं कळलं. मी त्या चार लहान मुलांसोबत असलेल्या बाईंना विचारल, की “यांना खाणं-पिणं कोण देतं? इथून बाहेर पडलं की लगेच हमरस्ता लागतो, मग मांजरं खातात काय नि कुठं?” तर, तिने दिलेलं उत्तर मोठ मजेशीर होतं. ती म्हणाली, “वो सायब, इथे मागे सर्व पारशी लोकं ऱ्हातात. ते लोक सकाळ-दुपार-संध्याकाळ या मांजरांना भरपेट दुध, मासे, चिकन देतात. अवेो, आपल्याला मिळत नाही तशा गोष्टी या मांजरांना मिळतात. तब्येती बघा त्यांच्या..! जागेवर खायला मिळालं तर कोन ही जागा सोडून जायल? आनी त्या मांजरांमुळे माझंही पोट भरतं कारन मला त्यांना खान देन्याचा पगार मिळतो.” माणूस मांजरांना खायला देतो माहित होतं पण मांजरं माणसाचं पोट भरतात हे दृश्य प्रथमच दिसत होतं. पारशी जमात श्रीमंत असूनही परेपकारी आहे हे माहित होतं आणि समोर दिसतही होतं. श्रीमंती आणि परोपकारी हे एकमेकांच्या विरूद्ध अर्थाचे शब्द आहेत अशीच माझी अलीकडे समजूत होत चालली होती, ती खोटी ठरली. बरं झालं..!
आता मी तिथं २४ तास राहाणाऱ्या माळीबुवांना पकडलं आणि विचारलं, की ही येवढी मांजरं आली कुठून? तर ते म्हणाले, की “ही पयल्यापासून इथंच आहेत. त्यांच्यात मुक्त समाजव्यवस्था (हे माझे शब्द, त्यांनी एकदम गावराम शैलीत सांगीतलं) असल्यानं, सारखी पिलं होतच असतात. पुन्हा आजुबाजूच्यी सर्वांनाच इथं मांजरांसाठी दररोजचा भंडारा असल्याचं माहित असल्यानं, कुनाच्या घरी नको असलेली वा रस्त्यात सापडलेली मांजरंही ते इथं आनून सोडतात व म्हनून इथं येवढी मांजरं दिसतात.” उत्तर पटण्यालारखंच होतं. मात्र माझ्या पुढच्या प्रश्नाला त्या अडाणी माळीबुवांनी जे शहाणपणाचं उत्तर दिलं, त्यांने माझ्या मनात माझ्याच शिक्षणाविषयी शंका निर्माण झाली.
मी त्यांना विचारलं, “की यातल एक पिलू मी रस्त्यावर गेलेलं पाहालं व त्याला उचलून आत आणण्यासाठी मी इथं आलो. तर अशी चुकून रस्त्यात गेलेली मांजरं कधी गाडीखाली येत नाहीत काय?” माळीबुवा हसले आणि म्हणाले, “की इथं लय अक्सीटन होतात पन ती मानसाची. मांजर रस्त्यात दिसलं की कितीही जोरात जात असलेली गाडी, मांजर आडवी जाऊ नये म्हणून जोरात ब्रेक लावून थांबतेच थांबते मग मागचा येंऊन धडकला तरी चालेल. यवढी शरधा असताना मांजर कसं येल गाडीखाली तुमीच सांगा?” त्यांच्या उत्तरावर माझ्याकडे खरंच काहीच बोलण्यासारखं नव्हतं..
आपल्याकडे रस्त्यांवर सिग्नल लावायच्या ऐवजी मांजरं आडवी सोडायला माणसं नेमायला हवीत असं वाटून गेलं. तसं झाल्यास सिग्नल जंपिंगची एकही केस होणार नाही.
जाऊ दे, मेरा भारत महान..! आपण कधी गेलात तर दादर टी. टी. सर्कलमधेच आत असलेल्या या मांजरांच्या नंदनवनाला भेट द्यायला मात्र विसरू नका. आणि हो, रस्ता क्राॅस करताना सांभाळून करा, तुम्ही माणूस आहात, मांजर नाहीत, तेंव्हा काळजी घ्या..!!
-नितीन साळुंखे
9331811091
Leave a Reply