नवीन लेखन...

पुण्यातील सुप्रसिद्ध दगडूशेठ हलवाई गणपती

 

१८९३ :-श्रीमंत दगडूशेठ हलवाई हे पुण्यातील सुप्रसिध्द मिठाईचे व्यापारी होते. श्रीमंत व निगर्वी, सत्याचे पाईक असा त्यांचा स्वभाव होता. पुण्यातील बुधवार पेठेतील दत्त मंदिर ही त्यांची रहावयाची इमारत होती. त्याकाळी पुण्यामध्ये आलेल्या प्लेगच्या साथीमध्ये श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांच्या मुलाचे देहावसान झाले. त्या घटनेने ते स्वत: व त्यांच्या पत्नी सौ. लक्ष्मीबाई हे दोघेही व्यथीत झाले. दरम्यानच्या काळात त्यांचे गुरू श्री. माधवनाथ महाराजांनी त्यांचे सांत्वन केले व त्यांना धीर देत सांगितले की, ”आपण काही काळजी करू नका, आपण श्री दत्त महाराज व श्री गणपतीची मुर्ती तयार करा व त्याची रोज पुजा करा व ही दोन दैवते आपल्या मुलाप्रमाणे सांभाळा. भविष्यात जसे आपले अपत्य आपल्या मातापित्यांचे नाव उज्वल करते त्याप्रमाणे ही दोन दैवते तुमचे नाव उज्वल करतील”. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेटजींनी श्री दत्त महाराजांची एक संगमरवरी व श्री गणपतीची मातीची मुर्ती बनविली व ती गणपती बाप्पाची मुर्ती म्हणजेच आपली पहिली मुर्ती होय. ही पहिली मुर्ती आज सुध्दा आपण शुक्रवार पेठेतील अकरा मारूती मंदिरात ठेवलेली आहे व तिची नित्य नियमाने पुजा चालू आहे. ह्या मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना लोकमान्य टिळकांच्या हस्ते झाली होती आणि त्यावेळी परिसरातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई, बाबुराव गोडसे, भाऊसाहेब रंगारी, श्री. मोरप्पाशेठ उर्फ काका हलवाई, नारायणराव बाजेवाले उर्फ जाधव, नारायणराव भुजबळ, रामाराव बुटलेर, गणपतराव विठूजी शिंदे, सरदार परांजपे, शिवरामपंत परांजपे, गोपाळराव रायकर, नारायणराव दरोडे यासह सर्व थरातील लोकांनी एकत्र येऊन या समारंभाची मंगलज्योत प्रदिप्त केली. तिच्या मंद पण तेजस्वी प्रकाशात आसमंत उजळून निघाले. भक्तिची धूप आणि श्रध्देची निरांजन लावून ही जी पुजा त्यांनी केली त्यास सर्व थोर लोकांनी मनोमन आर्शिवाद दिले आणि अशा रितीने ही मंगल परंपरा सुरू झाली.

सन १८९६ :-सन १८९४ साली लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरूवात केली. सन १८९६ साली श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची दुसरी मुर्ती तयार करण्यात आली व तिचा उत्सव होऊ लागला. दरम्यानच्या काळात श्रीमंत दगडूशेठ हलवाई यांचे निधन झाले. परंतू त्यांनी निर्माण केलेली गणेशोत्सवाची परंपरा त्या परिसरातील नागरिकांनी, तत्कालीन कार्यकर्त्यांनी पुढे सुरू ठेवली. त्याकाळी हा गणपती कै. श्री. दगडूशेठ हलवाई बाहूलीचा हौद, सार्वजनिक गणपती म्हणून प्रचलित होता. या उत्सवाचे व्यवस्थापन सुवर्णयुग तरूण मंडळ करीत होते. सध्या ही मुर्ती आपल्या बाबुराव गोडसे कोंढवा येथील पिताश्री वृध्दाश्रमातील मंदिरात आहे.

सन १९६८ :-सन १८९६ साली केलेल्या मुर्तीची थोडी जीर्ण अवस्था झाली होती व सन १९६७ साली आपल्या गणपती बाप्पाच्या अमृत महोत्सव साजरा झाला. त्या पार्श्वभूमीवर तत्कालीन सुवर्णयुग तरूण मंडळाच्या प्रमुख म्हणजेच सर्वश्री प्रताप गोडसे, दिंगबर रासने, रघुनाथ केदारी, शंकर सुर्यवंशी, चंद्रकांत दरोडे, उमाजी केदारी, प्रल्हादशेठ शर्मा, रमाकांत मारणे, वसंत कोद्रे, कांता रासने, दत्तात्रय केदारी, उल्हास शेडगे, उत्तम गावडे इत्यादी. ब-याच कार्यकर्त्यांनी नविन गणपतीची मुर्तीं बनविण्याचा संकल्प केला व त्यासाठी कर्नाटकचे प्रसिध्द शिल्पकार श्री. शिल्पी यांना पाचारण केले. त्यांच्याकडून लहान मातीची मुर्ती नमुना म्हणून करून घेतली व श्री. बाळासाहेब परांजपे यांनी प्रोजेक्टर वरून मोठया पडद्यावर कार्यकर्त्यांना दाखविली व सर्वानुमते ती आधीच्या मुर्तीसारखी असल्याची खात्री पटल्यानंतर प्रत्यक्ष मोठया मुर्तींचे काम सुरू झाले. संपूर्ण मुर्ती तयार झाल्यानंतर श्री. शिल्पी यांनी त्याकाळी जे ग्रहण झाले त्या दिवशी संगम घाटावर ग्रहण संपेपर्यंत देवाची आराधना केली. श्री. गणेश यंत्राची पुजा केली व त्यानंतर ज्याठिकाणी मातीची मुर्ती तयार केली, त्या ठिकाणी येऊन विधीवत धार्मिक गणेश याग केला व ते सिध्द श्रीयंत्र मंगलमुर्तीच्या पोटामध्ये सर्वांसमक्ष ठेवले. या मंगलमुर्तीची तुम्ही सर्वांनी दररोज नित्य नियमाने पुजा करा व त्याचे शेवटपर्यंत पावित्र्य राखा असे सांगितले. आजतागायत हे सर्व अत्यंत निठेने व प्रामाणिकपणे सुरू आहे व त्यामुळे आपणा सर्वांना त्या गणपती बाप्पाचे आर्शिवाद लाभले आहेत. अशा प्रकारे सध्या आपल्या गणपती मंदिरात असलेली श्रींची सर्वांग सुंदर, नवसाला पावणारी व त्याकाळी सुमारे ११२५/- (एक हजार एकशे पंचवीस रूपये) ही मुर्ती बनविण्याचा खर्च आला होता.

।। ॐ गं गणपतये नम: ।।

— जगदीश पटवर्धन

जगदीश अनंत पटवर्धन
About जगदीश अनंत पटवर्धन 227 Articles
एम.कॉम. एल.एल.बी. असलेले श्री पटवर्धन हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. चित्रकला, तबला वादन, क्रिकेट, टेबल टेनिस शास्त्रीय संगीत ऐकण्याची त्यांना आवड आहे. त्यांनी अनेकविध विषयांवर आजपर्यंत लेखन केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..