त्या दिवशी रानबा सकाळच्या उन्हाला बाहेर शेळ्यांजवळ जाऊन बसला होता.आत त्याची सून झुंबर नवऱ्याला म्हणत होती “ ऐकलं का,बिरोबाच्या जत्राला गावात भांड्यांचं दुकान लागलं का जुन्या पाण्या भांड्यांची मोड करून एक पितळाचं भगुलं घ्याचं हाये आपल्याला, अन् आढ्याला तुमच्या आईनं किती दिसापासून फडक्यात सर्जा राजाच्या शेंब्या ठेवल्यात गुंडाळून त्या सुद्धा ध्यान करून काढा मोडायला!!” झुंबर नंदूला जे सांगत होती ते रानबा बाहेर बसून सगळं ऐकत होता.नंदू आई गेल्यापासून जास्तच झुंबरच्या आहारी गेला होता .तसा लहानपणापासून हरणाबई अन् सीता या दोन पोरींच्या पाठीवर झालेला असल्यामुळे रानबा अन् ठकुबाईनं नंदूचे लई लाड केले होते. एक वेळ पोरींना काही देत नव्हते पण याला त्या गोष्टी मिळत गेल्या होत्या. दोन वर्षांपूर्वीच धाकट्या सीताचं लग्न झालं, सिन्नर जवळच्या वडगावला दिलं होतं तिला. मोठी हरणाबाई सुद्धा संगमनेर जवळच दिली होती. तसं पाहिलं तर दोन्ही पोरी शेतातलं कामधाम करून पोट भरायच्या. मागच्या वर्षी ठकूबाई अचानक सर्वांना सोडून गेल्यामुळे रानबा एकटाच सगळीकडे भीरी भीरी पहायचा. त्याला आता अजिबात करमत नव्हतं. सारखा आकाशाकडे पाहून एकटाच ओठ हलवायचा! काय मागत होता हे त्याचं त्यालाच माहित? पण बायको बरोबर आपण बी निघून गेलो असतो तर लई चांगलं झालं असतं असं त्याचं तोंडूळं सांगायचं. संसरात गाडीचे एखादं चाक नादुरुस्त किंवा जायबंदी झालं म्हणजे दुसरं चाक आपोआप उभं राहतं , त्याला हालचालच नसल्यानं वंगण पाणी वातावरण बदल अन् शरीराचे चक्र अजिबात हलतं राहत नाही मग ते आपोआप पहिल्या चाकासारखं हळूहळू त्याच्या शेवटाला जवळ करतं.
हा सगळा चिंतेचा विषय रानबा सकाळच्या सूर्याकडे कपाळावर हात देऊन बारीक न्याहाळत होता. पण त्याने जेव्हा आढ्याला फडक्यात गुंडाळलेल्या शेंब्यांचा विषय ऐकला अन् त्याचं टाळकंचं सरकलं. आत दोघं नवरा बायको चहा घेताना त्यांना पितळी चहाच्या भगुल्याची आठवण झाली होती. तसा त्यांचा दररोजचा चहा जर्मलच्या भगुल्यात व्हायचा. तेवढ्यात झुंबर रानबाला चहा देऊन परत आत गेली. तिच्यासमोर रानबा बोलायची आता हिम्मतच करत नव्हता. सगळा अवमेळ होऊन बसला होता. हा फक्त नावाला बाप म्हणून जगत होता. ती आत मध्ये गेल्यानंतर रानबा न राहून बोललाच,“झुंबरे, त्या शेंब्यांचा विषय काढू नको मी जित्ता हाये तव्हर, मंग मी मेल्यावं काय करायचं ते करा, नंदू अरे आपल्याला काय वावरं होती धन्ना गोडाची, काय माहित आहे का तुला?, सगळ्या खोंगळ्या खांगळ्या व्हत्या, तू एवढा एवढा व्हता तव्हा तुझ्या आईनं अन् म्या सर्जा राजाला धरून केण्या हाकल्यात तवा कुठं पाणी थांबायला लागलं वावरात . काही करता काहीच पिकं येत नव्हती .अरे तुझ्याई किती जपायची सर्जा राजाला! लई जीव लावला तीनं, आपली वावरं झाल्यावर तुह्या मऱ्हळच्या मामाचे बी दोन बीघे त्यांनी तयार केले सर्जा राजाकून , तव्हा तुह्या रंगा मामानं संगमनेरच्या शनिवार बाजारवरून त्या साली ह्या शेंब्या करून दिल्या व्हत्या पोळ्याला ! त्या मी अजिबात मोडू देणार नाही तुम्हाला आता तरी काय व्हैन ते व्हैन .” नंदू ही सगळी गोष्ट खाली मान घालून ऐकत होता. बराच वेळ झाला तरी आतून झुंबरचा आवाजच येत नव्हता.गेल्या नऊ दहा वर्षापासून त्या एका फडक्यात बांधून ठकाईनं वर आढ्याला ठेवल्या होत्या. रानबा बाहेरच्या ओट्यावरून आज सपरात येवून पाहतो तर वर आढ्याला बांधलेल्या शेंब्याच त्याला दिसल्या नाही. झुंबरकडं बघत रानबा बराच तनफन करू लागला ,“झुंबरे, कुठं गेल्या असतीन त्या शेंब्या? नंदू आरे त्वा पाहिल्या का?” बराच वेळ झुंबर नंदूकडं डोळे वटारून पहात “ मला काय माहिती? मला माझंच काम लई हाये, त्या शेंब्या पाहायला कुठं टाईम घालवीन मी?” असं बरंच रहाकाळ चाललं चाललं अन् थांबून गेलं.
बऱ्याच दिवसापासून रानबाचं वर आढ्याला लक्षच गेलं नव्हतं. पण अचानक ठकाईला पोटात काहीतरी दुखणं लागलं अन् चार-पाच महिन्यात तीनं रानबाला सोडलं. लई मिस्त्री लावायची ती रोज.तीनं जायच्या आधीच तिच्या दोन्ही पोरींना बोलून रानबासमोर एका चमकी फडक्यात “ हरणे तू अन् सीता दोघीजणी वाटून घ्या माह्ये डाग सगळे मी मेल्यावर!” असं म्हणून हरणाबाईच्या हातात ते फडक्याचं गाठोड ठकाईनं तिच्या हातात दिलं. हरणाबाईनं जसं घेतलं तसं ते घरातल्या ठकाईच्या पेटीत एका कोपऱ्यात जसंच्या तसं ठेवून दिलं. नंतर ठकाई पंधरा दिवसात गेली! तिचा दहावा तेरावा या गडबडीत दिवस निघून गेले. तिच्या हस्त्या एका मडक्यात भरून नंदूनं विहिरीवरच्या आंब्याला अडकवून ठेवल्या होत्या. “नंतर कधीतरी सवडीअन्त्री पंचवटीला जाऊन सोडू अशा दोघीही लेकी हरणाबाई अन् सीता म्हणल्या.” दुसऱ्या दिवशी त्या जड अंतकरणाने आपल्या सासरी निघून गेल्या.
हस्त्या गंगेला सोडेपर्यंत ठकाईचे दागिने वाटायचं कोणी नावच घेतलं नाही. इकडं रोज सकाळी उठल्यापासून वावरत कामाला बिलगायचा, नंदूला अन् झुंबरला अजून काही पोर सोर नव्हतं. ते सुद्धा रानबाला जरा जास्तच जड जायचं. त्याचा एकदा पाळणा हलला असता म्हणजे बारीक पोरगं बोलायला चालायला असंल म्हणजे याला करमून गेलं असतं. पण काय करणार सहा सात वर्ष होऊनही रानबा नाताची वाट पाहत होता. आतापर्यंत नाही नाही ते अंगारे धुपारे करून सर्वजण थकले होते. झुंबरचे काका नाशिकला प्रेस मध्ये कामाला होते. दोन वर्षांपूर्वी त्यांना तिच्या मावशी जरा गळ घातली अन् पंधरा दिवस नाशिकला चांगला दवाखाना केला पण झुंबरला त्या गोळ्या सहन झाल्या नाही. म्हणून मावशीने नाईलाजाने दवाखाना बंद करून तिला सुट्टीचा दिवस पाहून तिच्या काकासोबत सासरी पाठवून दिलं. इकडं रानबाला वाट पाहण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता. त्याला इकडे आड अन् तिकडे विहीर असं झालं होतं. वावरातलं काम संपल्यानंतर दुपारी तो नेमाने आंब्याखाली त्याच्या धर्मपत्नीला ठकुला भेटायला यायचा. दररोज द्या हस्त्या ठेवलेल्या मडक्याकडं पाहून विचार करत बसायचा. पाच सहा महिन्यानंतर त्यानं दुपारी सहज नंदूला विषय काढला,“ नंदू, तेवढ्या तुझ्याआईच्या हस्त्या चार दोन रोजात सोडून देवू गंगेला, पंचवटीत मागं ठरल्याप्रमाणं.” नंदून लगेच मुंडकं हलवत होकार देत “ हरणाआक्का,अन् सीताआक्काला घेवू बोलवून दोन दिसात.येत्या शुक्रवारी सोडू गंगेत, वार बी देवीचा चांगला हाये, नानीला लक्ष्मीआईचं लई येड व्हतं , तिचाच वार हये तो.” असं म्हणून त्यांना लगेच निरोप पाठवून दिले.
दोन दिसात हरणाबाई अन् सीता माहेरी आल्या होत्या, संध्याकाळी जेवण झाल्यावर ते सगळे ओट्यावर बसून ठकाईच्या आठवणी काढून चर्चा करायचे. बऱ्याच वेळा त्या दोघी आईच्या आठवणीत एकट्याच रडत बसायच्या. रानबा आतल्या आत त्याचं दुःख गिळून घ्यायचा. सांगणार तरी कोणाला? त्याची हक्काची ऐकणारीन या जगात राहिलीच नव्हती! तोच तिच्या रस्त्याला कधी लागंल याची वाट पाहायचा. दुसऱ्या दिवशी सगळे नाशिकला पंचवटीला गेले, बामणानं पुजा अर्चा सुरू केली, हस्त्यांची घाडग्यातून बाहेर काढल्या, त्यानं काही गोष्टी सांगायला सुरुवात केली त्यात माणसाच्या काही जीवाच्या वस्तूचे वाटे कधीच पडत नाही असं सांगितलं होतं. कारण कोणत्याही जीवाच्या वस्तूचं त्या माणसाच्या मनात घर असतं. तेव्हा त्याचे वाटे तरी कसे पडणार? सर्वांनी माना डोलवल्या अन् पूजा संपवून रानबा ,नंदू, हरणाबाई अन् सीता परत संध्याकाळी घरी निघून आले. झुंबर घरी एकलीच राहिली होती. ठकाईचे दोन्ही भाऊ तिथूनच त्यांच्या घरी निघून गेले. त्या दिवशी खऱ्या अर्थानं ठकाई ते घर सोडून गेली होती फक्तं दागिने तेवढे बाकी होते.त्या रात्री बराच वेळ त्यांनी आईच्या आठवणीवर गप्पा मारून झोपी गेल्या.
त्या दोघी दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांच्या सासरी जाणार होत्या. सकाळी उठल्या उठल्या रानबानं “हरणे, घ्या तुमच्या दोघींच्या सल्ल्यानं ते डाग वाटून.” बराच वेळ सीता अन् हरणाबाई नंदूकड बघत होत्या. त्याच्या तोंडातून एकही शब्द बाहेर पडत नव्हता. शेवटी हरणाबाईच उठली अन् पेटीतून ते चमकी फडकं आणलं व ओट्यावर बसलेल्या सर्वांसमोर ठेवलं . खूपच जड लागत होतं ते ! एवढं सोनं इला आलंच कुठून? अशा विचारात रानबा अन् नंदू एकमेकांकडे बघत होते. झुंबर बराच वेळापासून भांडे एकमेकांवर आदळून तिचा संताप दाखवीत होती. दोन हातात आणलेलं गाठोड तीन तिरप्या नजरेनं पाहिलं अन् तीला आणखीच चेव सुटला होता. शेवटी रानबा हरणाबाईला म्हणाला,“ सीती लहान हाये, तिच्याकडं दे ते सोडायला, तिचा हक्क आहे पहिला” असं म्हणून ते गाठोड सिताकडं सरकवलं. तिची बी हात लावायची काय इच्छा नव्हती पण शेवटी आई सांगून गेली होती म्हणून तिनं गाठण सोडली अन् त्यात …!!!!सर्जा राजाच्या चार शेंब्या निघाल्या !!!! ठकाईचं दुखायला लागल्यापासून तीनं पुतळ्या, एक पोत अन् कानातलं हे सगळं त्याच्यात बांधून पेटीत ठेवलं होतं.
सर्जा राजाच्या शेंब्या पाहून रानबाला खूपच दाटून आलं होतं. शेवटी ठकाईनं शेंब्यांना दागिन्याबरोबरची जागा दिली होती,जसे हे बाकीचे दागिने तिचे तसे शेंब्या बैलांच्या शिंगातले दागिने होते. हे जे ठकाईचे जे दागिने होते ते वावरातल्या पीका पाण्याच्या उत्पन्नावर आले होते व सगळी वावरं सर्जा राजाची घामाची मेहनत होती अन् शेंब्या त्यांचा दागिना होता म्हणून तिनं सर्जा राजाची जोडी मेल्यानंतर सुद्धा जपून ठेवल्या होत्या. तीनं तिच्या दागिन्यांबरोबर त्या शेंब्या जिवापाड जपल्या होत्या अन् आज तिची सून त्यांचं चहाचं भगुलं करायला निघाली होती…या सगळ्या वस्तू तीनं जीवापाड जपल्या होत्या म्हणून हस्त्या सोडताना गुरूने सांगितल्याप्रमाणे तिचे वाटे पाडायचे नाहीत असं हरणाबाई अन् सीता सांगून सासरी निघाल्या होत्या. दोघींना एक -एक मुलगी होती त्यांच्या लग्नात हे सोनं कन्यादान करून टाकू असं रानबानं एका शब्दात नंदूकडं बघून म्हणला अन् सुनेला ,“ झुंबरे, ह्या शेंब्या सोन्यापेक्षा जास्त किमतीच्या हायेत मंग पाह्य काय करायचं ते .” झुंबर हे सगळं ऐकत दोघी नणंदांच्या पायाला हात लावत शेवटी सासऱ्याच्या पाया पडताना तीनं रडत शेंब्या दोन्ही हातात घेतल्या. टाकल्या.नंदूच्याबी डोळ्याला पाणी आलं होतं. शेंब्या परत आढ्याला त्यांच्या जुन्या ठकाईनं बांधलेल्या जागेवर झुंबरनं बांधून टाकल्या.त्यादिवशी दोघी बहिणी सासरी निघून गेल्यामुळं घर एकदम सूनं सूनं वाटू लागलं. ती रात्र रानबाला अजिबात कठली नाही. दुसऱ्या दिवशी परत सकाळी ठरल्याप्रमाणे रानबा बाहेर उन्हाला बसला होता. आतून झुंबर नंदूला म्हणत होती, “ येत्या मंगळवारी वावीच्या बाजारातून जमलं तर दोन खोंडं घेऊन या आपल्याला, मी करीन मोठं त्यांला.” वर बांधलेल्या शेंब्यांकडं बोट करून ती नंदूला म्हणत होती “त्यांचं नाव बी सर्जा राजाच ठेऊ अन् हे दागिने ते मोठें झाल्यावं घालू त्यांला…!!!” बाहेरून रानबा सगळं ऐकत होता. त्याला बी हुंदका दाटून आला होता अन् तो एकटाच समोर बांधलेल्या शेळ्यांकडं बघत घरात झुंबरला आवाज देत म्हणाला, “झुंबरे अरे चहा आण ना मला.” चुली जवळ बसलेली झुंबर जर्मलच्या पातेल्यातून कपबशीत चहा ओतत पितळाच्या पातेल्याचा विचार करत होती.. अन् शेवटी तीच मनात पुटपुटली ,“बरं झालं ,शेंब्या मोडल्या नही त्या, माझ्या सर्जा राजाचा दागिना हाये त्यो…!!. .. … ….”
निवृत्ती सयाजी जोरी,
मंडळ कृषी अधिकारी,
फुलंब्री ,जि. छत्रपती संभाजीनगर.
(मु.पो. खांबे ता. संगमनेर
जि. अहमदनगर)
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुपचे लेखक
Leave a Reply