गझल
जाती: समजाती-पद्मावर्तनी-अनलज्वाला
मात्रा: ८+८+८=२४मात्रा
*********************************
दहशत इतकी चहूकडे वादळ वा-याची
की, न धजावत पेटाया पणती प्रेमाची
रात भयावह जातपात अन् विद्वेषाची
कधी व्हायची सकाळ येथे सौहार्दाची
डोळस हे आंधळे भाळती काजव्यांवरी
कुठे कुणाला कदर नभा, तुझिया ता-याची
कुठे अस्मिता, कुठली नीती, कसली मूल्ये
माणसे अता दिसती सारी बिनबाण्याची
सेवा, निष्ठा, कळकळ, तळमळ वरपांगी ही
किती किती दिसतात वेष्ठणे बिनाकामाची
नोंद कुणी घेवो ना घेवो सत्कृत्यांची
झाड लाव, पण अपेक्षा करू नये फळाची
कमी असो वा जास्त, अंतरे स्वीकारावी
कशी वाटते गोडी मग बघ हर नात्याची
वाटेवर आणिक पायांवर श्रद्धा आहे
मला न चिंता कधी सतावत गन्तव्याची
पलीकडे मी गेलो आहे या सगळ्याच्या
भुरळ न मानाची, ना हळहळ अवमानाची
म्हणून मी आनंदी आहे, कृतार्थ आहे
पूर्तता सतत करतो आहे कर्तव्याची
प्रा.सतीश देवपूरकर