अभिजात पाश्चात्य संगीतातलं एक सुप्रसिद्ध नाव म्हणजे लुडविग वॅन बिथोवेन. इ.स. १७७०मध्ये बॉन येथे जन्मलेल्या या अत्युच्च प्रतिभेच्या जर्मन संगीतकारानं, आपल्या सुमारे पंचेचाळीस वर्षांच्या सांगीतिक कारकिर्दीत, विविध प्रकारच्या सातशेहून अधिक रचनांची निर्मिती केली. यातल्या अनेक रचना या आता अभिजात संगीताचा अविभाज्य घटक ठरल्या आहेत. बिथोवेननं केलेल्या या संगीत रचनांत ‘सिंफनी’ या प्रकारातील रचनांचाही समावेश आहे. सिंफनी हा संगीतप्रकार मोठ्या वाद्यवृंदाद्वारे सादर केला जातो. बिथोवेननं आपल्या आयुष्यात एकूण नऊ सिंफनी रचल्या. बिथोवेन वयाच्या सत्तावन्नाव्या वर्षी मृत्यू पावला. मृत्यूच्या सुमारे तीन वर्षं अगोदर त्यानं आपल्या दहाव्या सिंफनीच्या निर्मितीला सुरुवात केली होती. मात्र प्रकृती अस्वास्थ्यामुळे तो ही सिंफनी पूर्ण करू शकला नाही. ही दहावी सिंफनी पूर्ण होण्याच्या आतच त्याला मृत्यू आला आणि ही सिंफनी अपूर्णच राहिली. जर ही सिंफनी पूर्ण झाली असती तर तिचं पुढचं स्वरूप कसं असतं, याबद्दल अनेक संगीतप्रेमींना प्रचंड उत्सुकता आहे. काही संगीतप्रेमींच्या मते, ही सिंफनी कदाचित बिथोवेनच्या उत्तम निर्मितींपैकी एक ठरली असती.
बिथोवेननं ज्या दहाव्या सिंफनीच्या निर्मितीला सुरुवात केली होती, तिचं स्वरूप फारच अपूर्ण आहे. स्वररचनेची काही रेखाटनं आणि त्याबरोबरच्या लिखित स्वरूपातल्या काही नोंदी… फक्त इतकंच! बिथोवेनची ही सिंफनी पूर्ण करण्याचे काही प्रयत्न यापूर्वी केले गेले होते. याचं एक उदाहरण म्हणजे, बॅरी कूपर या ब्रिटिश संगीतकाराचा १९८०-९०च्या दशकातला प्रयत्न. सिंफनी ही साधारणपणे चार भागांची बनलेली असते. हे चारही भाग जरी एकमेकांशी संबंधित असले, तरी या चारही भागांचं स्वरूप स्वतंत्र असतं; तसंच या प्रत्येक भागात हजारो स्वर असू शकतात. बॅरी कूपर यांनी या चार भागांपैकी पहिला भाग पूर्ण केला. परंतु, बॅरी कूपर यांना त्यापुढील भाग पूर्ण करणं, हे काही जमलं नाही. अत्यंत अपुऱ्या माहितीवरून ही सिंफनी पूर्ण करायची म्हणजे हे एक मोठं आव्हानच ठरलं होतं. आता मात्र ही अपूर्ण राहिलेली बिथोवेनची सिंफनी पूर्ण केली गेली आहे. यासाठी मदत घेतली गेली आहे ती, कृत्रिम बुद्धिमत्तेची!
बिथोवेनची दहावी सिंफनी पूर्ण करण्यासाठी ऑस्ट्रिआतील साल्झबर्ग येथील ‘कारायन इन्स्टिट्यूट’ या संस्थेनं पुढाकार घेतला होता. या प्रकल्पाचं नेतृत्व होतं, अहमद एल्गामाल या जर्मनीतल्या रुटगेर्स विद्यापीठातील संगणकतज्ज्ञाकडे. अहमद एल्गामाल यांना संगणक आणि संगीत यांची सांगड घालण्याच्या कामाचा मोठा अनुभव आहे. बिथोवेनच्या सिंफनीवरील या प्रकल्पात, संगीतज्ञ, संगीतकार, संगीताच्या इतिहासाचे अभ्यासक, वादक, संगणकतज्ज्ञ, अशा संगीताच्या आणि संगणकाच्या क्षेत्रातील अनेक तज्ज्ञांना सहभागी करून घेतलं गेलं होतं. कारण, या निर्मितीत दोन महत्त्वाचे घटक होते. यांतला एक घटक होता संगीत आणि दुसरा घटक होता संगणक! ही सिंफनी पूर्ण करण्यासाठी बिथोवेनच्या संगीताचं, त्याच्या शैलीचं, पूर्ण विश्लेषण अत्यंत आवश्यक होतं, कारण बिथोवेनच्या शैलीनुसारच ही रचना निर्माण व्हायला हवी होती. हा घटक संगीततज्ज्ञांच्या कार्यकक्षेत येत होता. दुसरा घटक होता तो संगणकाचा. कारण बिथोवेनची ही शैली संगणकाला पुरवायची होती आणि कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे संगणकाकडून सिंफनीचा अपूर्ण भाग पूर्ण करून घ्यायचा होता. या प्रकल्पातील संगीताची जबाबदारी ऑस्ट्रिअन संगीतकार वाल्टेर वेरझोवा आणि त्यांच्या चमूनं सांभाळली तर, संगणकाचा भाग अहमद एल्गामाल आणि त्यांच्या चमूनं सांभाळला.
कृत्रिम बुद्धिमत्तेचा पाया योग्य संगणक प्रणाली हा असतो. एखादा प्रश्न सोडवण्यासाठी माणूस जसा विचार करेल, त्याच पद्धतीचं तर्कशास्त्र कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे प्रश्न सोडवण्यासाठी संगणकाच्या प्रणालीत वापरलं जातं. प्रश्न सोडवण्यासाठी माणूस प्रथम उपलब्ध माहितीचं विश्लेषण करतो व त्या विश्लेषणानुसार तो पुढील मार्ग शोधतो. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी संगणकाद्वारे अशीच पद्धत अवलंबली जाते. त्यासाठी उपलब्ध माहितीचं योग्य विश्लेषण करणारी संगणक प्रणाली लिहिली जाते. या प्रणालीला योग्य ती माहिती पुरवली जाते. या माहितीचं ही प्रणाली विश्लेषण करून पुढील सूचना करते. याचं एक साधं उदाहरण म्हणजे संगणकाद्वारे पत्र लिहिणं. एखादं वाक्य लिहायला सुरुवात केली की, संगणक लिहिलेल्या शब्दांना अनुसरून, मजकूराच्या विषयाला पूरक ठरणारे, तसंच भाषेच्या व्याकरणात बसणारे, पुढचे काही शब्द सुचवतो. आपण त्यातला एखादा शब्द निवडला की, संगणक आपली ही निवड लक्षात घेऊन, त्यानंतरच्या शब्दासाठी आणखी पुढचे काही शब्द सुचवतो. अशा रीतीनं शब्दामागून शब्द लिहिले जाऊन, ते वाक्य पूर्ण होण्यास मदत होत जाते. अखेर अशी अनेक वाक्यं पूर्ण होत-होत संपूर्ण मजकूर तयार होतो. मात्र यासाठी संगणकाकडे, शब्द निवडण्यासाठी योग्य त्या तर्कांवर आधारलेली प्रणाली हवी आणि आपल्याला हव्या असलेल्या विषयाला अनुरूप शब्दांचा पुरेसा साठा हवा. बिथोवेनची दहावी सिंफनी पूर्ण करण्यासाठी अशाच प्रकारचा मार्ग चोखाळण्यात आला.
प्रथम संगणकाला अठराव्या शतकातील, योहान्न बाख, वोल्फगांग मोझार्ट यांसारख्या आघाडीच्या संगीतकारांच्या स्वररचना पुरवण्यात आल्या. त्यामुळे संगणकाला बिथोवेनच्या काळातल्या संगीताची ओळख झाली. त्यानंतर संगणकाला खुद्द बिथोवेनच्या सर्व रचना पुरवून, बिथोवेनच्या शैलीचीही ओळख करून दिली गेली. संगणक अशा प्रकारे बिथोवेनसारखा विचार करण्यासाठी सज्ज झाल्यानंतर, दहाव्या सिंफनीच्या अपूर्ण नोंदींना पूरक ठरतील अशा, दोन-दोन ओळींच्या छोट्या स्वरावल्या संगणकाकडून सुचवून घेतल्या गेल्या. संगणकानं सुचवलेल्या स्वरावल्या या, बिथोवेनची शैली, त्यातील स्वरांचं सातत्य, अर्धवट लिहिली गेलेली दहावी सिंफनी, या सर्वांवर आधारलेल्या होत्या. संगणकानं सुचवलेल्या अशा अनेक स्वरावल्यांतून, दहाव्या सिंफनीच्या अपूर्ण भागाला जास्तीत जास्त अनुरूप ठरेल, अशी स्वरावली संगीततज्ज्ञांकडून निवडली गेली.
यानंतर दुसऱ्या एका संगणक प्रणालीकडून या स्वरावलीला अनुरूप असं, वाद्यवृंदाला वाजवता येणारं, सर्व वाद्यांचा समावेश असणारं संगीत निर्माण करून घेतलं गेलं. वाद्यवृंदाकडून या स्वरावलीचं प्रात्यक्षिक केलं जाऊन, जाणकारांद्वारे या स्वरावलीच्या चाचण्या घेण्यात आल्या. ही स्वरावली स्वीकारार्ह ठरल्यानंतर, या स्वरावलीच्या पुढच्या स्वरावलीची अशाच प्रकारे निर्मिती केली गेली. अशा रीतीनं टप्प्याटप्प्यानं पुढं जात, या सिंफनीचा एकेक भाग पूर्ण केला गेला आणि अखेर या सिंफनीचे चारही भाग पूर्ण झाले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून निर्माण केली गेलेली ही बिथोवेनची दहावी सिंफनी, दिनांक ९ ऑक्टोबर २०२१ रोजी जर्मनीतील बॉन येथे ‘बिथोवेन ऑर्केस्ट्रा’ या वाद्यवृंदाद्वारे संगीतप्रेमींसमोर सादर करून तिचं प्रकाशन केलं गेलं. बिथोवेनच्या जन्माला नुकतीच अडीचशे वर्षं झाली असतानाच ही निर्मिती होणं, हे नक्कीच यथोचित ठरलं आहे.
बिथोवेनच्या स्वररचनेची ही निर्मिती म्हणजे एक मोठं आव्हान होतं – संगीताच्या दृष्टीने आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या दृष्टीनंही. हे आव्हान अहमद एल्गामाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी यशस्वीरित्या पेललं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून जुन्या काळातील संगीतकारांच्या शैलीतल्या स्वररचनांची निर्मिती पूर्वी केली गेली आहे. अहमद एल्गामाल यांनी स्वतः कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बाखच्या शैलीतील संगीतरचनांची निर्मिती केली आहे. परंतु, या रचनांसाठी त्या-त्या संंगीतकाराच्या फक्त शैलीचा वापर केला गेला होता. प्रत्यक्षात त्या स्वतंत्रपणे निर्माण केल्या गेलेल्या स्वररचना होत्या. मात्र अत्यंत अपुऱ्या माहितीवरून आतापर्यंत अशी कोणतीही स्वररचना निर्माण केली गेली नव्हती. त्यामुळेच प्रतिभावान बिथोवेनची ही दहावी सिंफनी पूर्ण करताना कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षमतेचाही कस लागला.
आता शेवटी एक महत्त्वाची गोष्ट… या दहाव्या सिंफनीतली, बिथोवनला अपेक्षित असलेली उर्वरित संगीत रचना नक्की कशी होती, हे कोणालाही माहीत नाही. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केलेली ही निर्मिती बिथोवेनला अभिप्रेत असलेल्या रचनेच्या किती जवळ जाऊ शकते, हे सांगता येत नाही. बिथोवेनची ही संगीतरचना ‘कशी होती‘ हे सांगता येत नसलं तरी, ती ‘कशी असू शकते’, याची कल्पना मात्र या, कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे केलेल्या निर्मितीमुळे नक्कीच आली आहे. आणि त्यातच कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारलेल्या या स्वररचनेच्या निर्मितीचं यश सामावलं आहे!
— डॉ. राजीव चिटणीस.
छायाचित्र सौजन्य:Circe Denyer.
Leave a Reply