रात्र तशी फार झालेली नव्हती, पण अंधारलं होत. वाट आडवळणाची होती. आजुबाजुच्या घरांची दारंही बंद होती. अंधारातून वाट काढत जात असताना कुठल्याशा गल्लीतून एक कुत्रं भुंकतच अंगावर आलं. सर्वांगाला दरदरून घाम फुटला, तेव्हा जोरात ठोकलेली धुम आजही स्मरणात आहे आणि कुत्र्यांबद्दलची मनातली दहशत तशीच आहे, कायमची…
कोणत्या ना कोणत्या प्रसंगातून दहशत मनात ठासुन भरली जाते. ती कुणी मनात भरत नाही. पण ती असते. कधीतरी काहीतरी घडते आणि दहशत निर्माण होते. ती घर करते. तिचे घर मनात इतके पक्के असते की पुढची अनेक वर्षे काही केल्या ते उदध्वस्त होत नाही. दहशतीचे किती प्रकार असावेत असा साधारण विचार डोकावून गेला. तर व्यक्ती प्रवृत्तीनुसार दहशतीचे प्रकार बदलत जातात. कुणाच्या मनात कुत्र्यांची दहशत असते, कुणाच्या मनात झुरळांची दहशत असते, कुणाच्या मनात साहेबाची दहशत असते, कुणाच्या मनात गल्लीतील गुंडाची दहशत असते, कुणाच्या मनात पोलिसांची दहशत असते, कुणाच्या मनात राजकारण्यांची दहशत असते… आणखी कशा-कशाची दहशत असते, कुणाच्या मनात काय सांगणार…..
दहशतीच्या सावटाखाली सापडलेल्या व्यक्तीची घाबरगुंडी उडते, दरदरून घाम येतो, काही वेळा बोलणेही सुचत नाही, या सारखे आणखी बरचे काही-काही होत असते. व्यक्तीची जशी प्रवृत्ती असते तशी त्याच्या दहशतीची पातळी वेगळी असते. गरीबाच्या मनात महागाईची दहशत असते, विद्यार्थ्याच्या मनात निकालाची दहशत असते, सुनेच्या मनात सासूची दहशत असते, सासुच्या मनात सुन कशी निघेल ही दहशत, काहींच्या मनात उद्याचा दिवस कसा निघेल, भविष्यात काय होईल या विचारांची दहशत असते. खोट्याच्या मनात सत्याची दहशत असते. दहशतीच्या या यादीला अंत नाही. वेगवेगळ्या प्रकारची दहशत मनात बाळगुन अनेक लोक आपल्या अवती-भोवती फिरत असतात. दहशतीच्या जाळ्यात आपण गुरफटत जातो. काही वेळा अजाणतेपणी दहशतीचे आपण शिकार होतो, काही वेळा जाणीवपुर्वक दहशतीचा सामना केला जातो.
एक गोष्ट मात्र नक्की ज्यांनी जाणीवपुर्वक दहशतीचा सामना केला, निडर मनाने दहशतीला जे सामोरे गेले त्यांनी इतिहास घडवला आहे. सामान्य माणुस इतिहास घडवू शकत नसला तरी तो निडरपणाने जगू शकतो, दहशतीचा सामना करून.. हे मात्र नक्की.
तर चला नवा संकल्प करू या निर्भय होऊन आपापल्या दहशतीचा सामना करू या.
— दिनेश दीक्षित, जळगाव
(9404955245)
Leave a Reply