भावनांची व्यक्तिगत अथवा व्यावसायिक जीवनात काय भूमिका असते?
भावनाहीन व्यक्तीबरोबर काम करणे, गप्पा मारणे असह्य आणि टाळाटाळ करण्यास निमंत्रण देणारे असते. आपल्या आसपासची माणसे काम करताना झोकून देत, त्याचा आनंद उपभोगत बघताना मौज असते. नेमून दिलेले काम करताना एखाद्याच्या मनात नेमके काय सुरु असते? असं काही वादळ त्या व्यक्तीच्या मनात सुरु असते कां ज्याचा परिणाम कामावर होत असतो? अशा चौकटीच्या बाहेरील प्रसंगांमध्ये त्या मंडळींचे निवांतपणे ऐकून घेत थोडासा भार हलका करता आला तर बघावं हे उचित !
भावनांचे हे आरसे लख्खपणे दिसत असतील तर माणसं एकमेकांच्या जवळ येण्यास मदत होते. पण क्वचित त्यांचा विस्फोट झाला तर?
याउलट बरीच मंडळी आपल्याला वाटणाऱ्या जाणिवा/संवेदना उघडकीस येऊ नयेत यासाठी आटोकाट प्रयत्न करीत असतात. भावनांचे शक्यतो प्रदर्शन करू नये ही बालपणी मिळालेली शिकवण प्रयत्नपूर्वक पुढे ढकलत जगत असतात. अशी माणसे मग दारूची बंदिस्त कोठारे ठरू शकतात. त्यांच्यातील दाबून ठेवलेल्या ज्वालामुखींचे केव्हा,कसे आणि किती रिश्टरचे विस्फोट होतील याची कल्पनाही करवत नाही. अशावेळी ही आग, हा लाव्हा संपर्कात येणाऱ्या सर्व गोष्टींचे दहन करू शकतो. ते परिणाम टाळण्यासाठी माणसे एकतर भावनांचे सोयीस्कर कप्पे तरी करतात किंवा वरकरणी स्मिताचे मुखवटे मिरवत अंतर्यामी भावनांशी झुंजत असतात. हे दमन भावनिकदृष्ट्या त्रासदायक ठरू शकते. भावनांच्या हिंदोळ्यावर सतत झुलणाऱ्या व्यक्तीबरोबर काम करताना, त्यांचे केव्हा,कोणते रूप समोर आदळेल याचा अंदाज भल्याभल्यांना लागत नाही. भावनांच्या नियमनावर लक्ष केंद्रित केले नाही तर विश्वासार्हतेला तडा जाऊ शकतो.
अवघड परिस्थितीशी दोन हात करताना भावनांची हाताळणी विशेष महत्वाची ठरते. भावनिक प्रतिक्रिया जर “अती ” कडे झुकत असेल तर अशा व्यक्तींवर विसंबून राहणे हे आव्हानात्मक असते आणि मग त्यांना कमी जोखमीची कामे दिली जातात. मोठाल्या प्रकल्पांपासून त्यांना हेतुपुरस्सर दूर राखले जाते. अशा व्यक्तींच्या विकासाच्या संधी मर्यादित होत जातात.
सर्वांनांच भावनिक हेलकाव्यांना सामोरे जावे लागत असते आणि ते क्षण परीक्षेचे असतात. रोजच्या आव्हानांना तोंड देता देता आपल्या दमनाचा परिणाम म्हणून आपले वर्तन प्रभावित व्हायला लागते. व्यक्तिगत आणि व्यावसायिक जीवनाच्या कप्प्यांना दूर राखावे लागते, मग कर्तृत्वावर आपल्या अंतर्विश्वाच्या खळबळींचा परिणाम होत नाही.
बरेचदा माणसे असंबद्ध विषयांच्या भावनांचे ओझे कार्यस्थळीही घेऊन येतात. सुरुवातीला करुणा वाटते पण हळूहळू कीव यायला सुरुवात होते. आणि सतत बदलत्या वर्तनाचा साचा आव्हानात्मक बनतो आणि शेवटी दमछाक करतो.
भावनांचे दमन ही काही कायम चांगली रणनीती नसते. तिला व्यक्त होण्याचा ,प्रवाहित होण्याचा मार्ग देणे आपल्या हाती असते. (होळीच्या वेळी आपण जशी अनिर्बंधपणे “बोंब” ठोकतो आणि स्वतःला आतून मोकळे करतो तसे). कामाच्या ठिकाणी येताना स्वतःला “पूर्णपणे ” आणणे अभिप्रेत असते मग स्वाभाविक, सातत्यपूर्ण मनोवृत्ती ही त्या व्यक्तीचा दागिना ठरते. अन्यथा प्रसंगांना, परिस्थितीला सामोरे जाताना व्यक्तीच्या प्रतिक्रिया विजोड/असंतुलित आणि म्हणून विसंगत वाटायला सुरुवात होते. त्यांना टाळण्याकडे कल झुकतो.
भावनांना मानवी जीवनात (व्यक्तिगत, व्यावसायिक) महत्वाचे स्थान आहेच. पण त्यांचे दमन न करता नियमन करणे जमले पाहिजे. अन्यथा सोबतीची मंडळी कानकोंडी होतात. त्यांना कसे वागावे हे कोडे पडते.
कामावरून घरी आल्यावर व्यावसायिक आव्हाने,अडचणी उंबऱ्याबाहेर ठेवून मगच घरात पती,पिता असे पेहराव घेऊनच आत प्रवेश करावा लागतो. अन्यथा बाहेरचे ताणतणाव घरातील जेवणाच्या वेळचे वादविवाद ठरू शकतात. काम/नोकरी आणि त्याबाहेरचे जीवन यांत फिल्टर लावणे गरजेचे असते.
सध्याची दमछाक या दमनानंतरच्या विस्फोटांची नांदी वाटते.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply