दरवर्षी प्रमाणे यंदाही महागु बुढयानं काठाणीच्या पात्रात डांगराची वाडी लावली होती. वाडीत डांगरं लटालट लागली होती. वैशाखीच्या रणरणत्या उन्हात तहानेने व्याकुळ झालेला एखादा वाटसरू महागु बुढ्याच्या डांगरवाडीतील थंडगार पाणी पिऊन क्षणभर विश्रांती घेई शिवाय जातांना एखादं डांगरू जरूर विकत घेई. महागु बुढ्याच्या वाडीतील डांगरं खरोखरच खूप गोड होती. एखाद्या पोटच्या पोराप्रमाणे बुढा डांगरांची काळजी घेत होता. काठाणीच्या सुपीक उपजाऊ काठावर त्याने कोबी…. वांगी… भेंडी… चवळी … दोडकी आदिंच्या भाज्या लावल्या होत्या. तिथंच एका आंब्याच्या झाडाखाली त्याने गवताची झोपडी बांधली होती. या झोपडीत राहूनच बुढा वाडीची राखण नि देखरेख करीत होता. बुढ्याचं एकुलतं एक तरूण पोरगं कोरोनाची बाधा होऊन मागील वर्षीच दगावलं! आता तो आणि त्याची म्हातारी तुळजा बुढी दोघंच घरात उरले होते! मुली लग्न होऊन सासरी गेल्या होत्या. सणासुदीला भेटायला यायच्या. महागु बुढा आता खूप म्हातारा झाला होता. पूर्वीसारखी अंगात ताकत राहिली नव्हती. थोडंफार काम केलं की धाप लागायची. पण तरीही पोटासाठी दगदग करावीच लागे! पोराचा खूप आधार होता पण तोही अवेळी देवानं हिरावून घेतला.
बुढा दिवस रात्र वाडीची राखण करे. बुढी गडचिरोलीच्या हाटात ( बाजारात ) भाजीपाला नि डांगरं विकून आणे. बुढ्याचं गाव नदीपासून थोड्याच अंतरावर होतं. बुढी बुढ्यासाठी रोजच सकाळ संध्याकाळ शिदोरी घेऊन यायची. बुढा खाण्याचा खूप शौकीन होता. त्याला बेसन…वरण आळण आदी आवडत नव्हतं. हप्त्यातून दोनतीन वेळातरी मुर्गामटन किंवा मासे खायला हमखास लागायचे. भुजल्या (भाजलेल्या ) मासोळीची ठुशी नि कढी त्याची आवडती भाजी होती.
बुढा मोठ्या हिंमतीचा माणूस होता. भुताखेताला तो अजिबात घाबरत नव्हता. काठाणीच्या पात्रात रोज कितीतरी प्रेतं जाळण्या पुरण्यासाठी यायची पण त्याला त्याचं काही एक वाटत नव्हतं. प्रेत जाळायला आलं की बुढा लोकात मिसळायचा. कोण मेलं…. काहून मेलं… किती वर्षाचा होता…. विवाहित होता की अविवाहित होता असले फालतुचे प्रश्न विचारल्याशिवाय त्याला अजिबात चैन पडत नव्हती. या निमित्ताने त्याचाही थोडाफार टाइमपास व्हायचा. अंत्यविधी टोपून लोक आपापल्या घरी निघून गेले की, नदीत परत निरव शांतता पसरायची. बुढ्यालाही कधी कधी घरी जायची खूप इच्छा व्हायची पण त्याचा नाईलाज होता. वाडी सोडून तो कुठेच जाऊ शकत नव्हता. मावळतीला सूर्य कलल्यावर थोडं ऊन कमी होई. अशावेळी बुढा वाडीत फेरफटका मारून येई. इवल्या इवल्या डांगरांना हळुवार हाताने स्नेहाने कुरवा ळल्यावर बुढा मनोमनी खूप खूष व्हायचा….. आनंदित व्हायचा….. नातवाला गोंजारल्यासारखं त्याला वाटायचं! कधी कधी मूड चांगला असला की, तो टाळ्या पिटून हमखास गोंधळ…. दंडारीतील एखादं गाणं मोठमोठयाने गुणगुणायचा! अशावेळी एखादेवेळी तुळजा बुढी हजर असली की त्याला अधिकच चेव यायचा! बुढीला दंडारीतील संवाद ऐकवून तिला मोठमोठयाने हसवायचा. त्या दिवशी नेहमीसारखाच सूर्य डोक्यावर आला होता. एक वाजला तरी बुढीची शिदोरी आली नव्हती. पोटात कावळे ओरडत होते. भुकेमुळे जीव खूप व्याकुळ झाला होता. बुढी नेहमी बाराच्या सुमारास शिदोरी घेऊन यायची. आज एक वाजायला आलातरी….. तिचा थांगपत्ता लागत नव्हता. सुरवातीला बुढ्याला बुढीचा खूप राग आला पण हळूहळू तिची चिंता वाटायला लागली. डोक्यात नाना प्रकारचे विचार यायला लागलेत. ” बुढीला तापबीप तर आला नसेल! शिदोरी आणतांना घसरून तर पडली नसेल!” एक विचार येत नाही तोच दुसरा विचार भंडावून सोडायचा. बुढ्या ची तगमग काही केल्या थांबत नव्हती. शेवटी त्याने वाडीला वाऱ्यावर सोडून थेट घराचा रस्ता धरला. ऊन खूप तापत होतं. पाय खूप भाजत होते तरी त्यानं कशाचीच फिकीर केली नाही. घराची ताटी बाजूला सारून त्याने, ” तुळजे! ” म्हणून मोठयाने आवाज दिला. त्याच्या हाकेला बुढीचा अजिबात ओ आला नाही. त्याचं काळीज वरखाली होऊ लागलं.
त्यानं निरखून पाहिलं. बुढी खाटेवर (बाजेवर ) कन्हत कुंथत पडली होती. तिचं संपूर्ण शरीर तापाने फणफणत होतं. विस्तवागत तापलं होतं. बुढा आतून धास्तवला होता पण वरवर हिंमत दाखवत होता. बुढीला धीर देत होता. त्याने गावातील एका कामचलाऊ डॉक्टरला बोलावून आणलं. डॉक्टरने दोन इंजेक्शनं टोचली. शिवाय गोळ्या लिहून दिल्या. आराम पडला नाहीतर गडचिरोलीला घेऊन जायला सांगितलं. बुढ्याने एका ओळखीच्या बाईला लक्ष ठेवायला सांगून थेट गडचिरोलीचा रस्ता धरला. रस्त्यात काठाणीचं पात्र अन त्याची वाडी पडत होती. त्यानं सहज वाडी आणि पात्रात पाहिलं. लोक कुणाचंतरी प्रेत घेऊन आले होते. काही तरूण पोरं त्याच्या गैर हाजरीत वाडीत घुसून डांगराची खूप नासधुस करीत होते. बुढ्याचा पारा एकदम भडकला. पोरं ऐकालाच तयार नव्हती तेव्हा त्यानं मागचा पुढचा विचार न करता सरळ आई बहिणीवरून शिव्यांची लाखोली वाहिली! तरूण पोरं खवळली. त्यांनी बुढ्याच्या वयागियाचा विचार न करता बुढ्याला हातापायांनी मस्त बकलून काढलं. बुढा पडक्या भिंतीवाणी खाली कोसळून पडला. त्याच्या नाकातोंडातून रक्त यायला लागलं. घशाला कोरड पडली. ” पाणी… पाणी ” म्हणून बुढा जिवाच्या आकांताने ओरडत होता. काही बदमाश पोरांनी, ” हे घे पाणी. ” म्हणून त्याच्या तोंडात अक्षरशः सू केली. अशाही स्थितीत त्याला बुढी आठवली! तिचा दिनवाणा चेहरा आठवला! तिचं कन्हणं कुंथणं आठवलं! त्याने उठण्याचा जोरदार प्रयत्न केला पण अंगात त्राणच उरलं नव्हतं! इतक्यात जोरात एक वावटळ आली नि डॉक्टरांनी लिहून दिलेला औषधीचा कागद हातातून निसटून क्षणात दृष्टीआड झाला. महागु बुढा उडत जाणाऱ्या कागदाकडे हताश होऊन केवळ बघत राहिला.
( कथा पूर्णतः काल्पनिक आहे. )
कथाकार…
श्रीनिवास गेडाम
आम्ही साहित्यिक फेसबुक ग्रुप चे लेखक
Leave a Reply