नमस्कार मित्रांनो,
आजची कथा ही माझी सौभाग्यवती – सौ. सेवा गोखले हिच्या आयुष्यात आमच्या लग्नानंतर घडलेली आहे, म्हणजे अप्रत्यक्षपणे ती माझ्याही आयुष्यात घडलेली आहे, आणि थोडीशी मोठी आहे.
*****“दारासिंग ची पिंकी”*****
गोष्ट, खरं तर घटना आहे १९८६ मधली. आम्ही तेंव्हा बदलापूरला रहात होतो, आणि मी मुंबई पोर्ट ट्रस्टच्या वडाळा येथील एका कार्यालयात तीन शिफ्ट मधे काम करत होतो. ही घटना घडली त्या दिवशी मला सकाळी आठ ते रात्री आठ अशी दिवस पाळी होती. संध्याकाळचे सात वाजून गेले होते. दिवसभराच काम आटोपून आणि लॉगबुक पूर्ण करून मी फ्रेश होऊन मला सोडवायला येणाऱ्या सहकार्याची वाट पहात होतो. सोबतीला असलेल्या चार्जमनने केलेल्या चहाचे घुटके घेत चार्जमन बरोबर गप्पा मारत होतो.
इतक्यात फोन खणखणला. छातीत धस्स झालं. माझ्या सहकार्याला शेवटच्या क्षणी फोन करून “सॉरी मित्रा, मला उशीर होतोय” किंवा “सॉरी, आज मी येऊ शकत नाही, तू डबल कर” असं सांगायची वाईट सवय होती. पण काय करणार, तो आणि मी एकाच दिवशी एकाच सेक्शनला जॉईन झालो असल्याने आमची घनिष्ट मैत्री होती. त्यामुळे चरफडणे आणि त्याला तोंडावर शिव्या घालणे यापलिकडे मी काही करू शकत नसे.
भीतभीत फोन उचलून सवयीने “हॅलो, ओपीएल वडाळा!” म्हणून प्रत्त्युत्तरासाठी थांबलो. पलिकडे माझा मेहुणा – डॉ. चंद्रशेखर कुलकर्णी होता. माझा आवाज ओळखून तो म्हणाला –
“संजू, शेखर बोलतोय. तुला सुटायला अजून किती वेळ आहे?”
“अर्धा तास, का रे?”
“काही नाही, मी आत्ता कुर्ल्याला आहे. सोबत शुभदा (त्याची सौ. – राधिका कुलकर्णी), केतकी (त्याची सुमारे वर्षाची लेक) आणि माई (माझी सौ. – सेवा गोखले) आहेत. आम्ही सगळे आता कल्याणला माझ्या घरी जातोय. तू पण मुक्कामासाठी ये. घरी आलास की सगळं सांगतो. फक्त काळजी करू नको, कारण, तसं काही गंभीर कारण नाहिये”.
“बरं” म्हणून फोन ठेवला. रिलीव्हर आल्यावर कुर्ला मार्गे कल्याणला त्याच्या घरी गेलो. चहापान झाल्यावर शेखर ऐवजी सौ. सेवा सांगू लागली –
“तुमची आठ ते आठ ड्यूटी, घरी यायला रात्री पावणे अकरा वाजणार. आई पण मुंबईला गेलेल्या, त्या आज येणार नव्हत्या. म्हणून मग मी दुपारच्या एक-चाळीसच्या बदलापूर लोकलने कल्याणला नानाकडे (शेखरकडे) जायला निघाले. गाडीला गर्दी अजिबात नव्हती. मी ज्या कंपार्टमेंटमधे बसले त्यात मी एकटीच होते. वारा येणारी खिडकी मिळाली म्हणून खूष होते. पण झालं असं की गाडी सुटता सुटता दोन तीन तृतीयपंथी गाडीत चढले, आणि माझ्याच कंपार्टमेंटमधे आले. मला भीती वाटायला लागली.”
“अरे देवा, मग?”
“मग मी उठले तिथून आणि दुसऱ्या कंपार्टमेंटमधे गेले…तिथे कोणी बायका आहेत ते बघावं म्हणून.”
“मग होत्या का कोणी बायका तिथे?”
“बायका नव्हत्या, पण एक शाळकरी मुलगी होती.”
“चला, कोणाची का होईना, सोबत मिळाली.”
“हो ना. गाडीनं वेग घेतला तशी मी त्या मुलीचं निरिक्षण करू लागले. वय बारा-तेराच्या आसपास. मुलगी आठवी नववीतली असावी. अंगावर युनीफॉर्म होता, दप्तर होतं. पण मला काही तरी खटकत होतं. एक तर ती मुलगी गाडी येण्यापूर्वी प्लॅटफॉर्मवर दिसली नव्हती. दुसरं असं की ती शाळा भरण्याची किंवा सुटण्याची वेळ नव्हती.”
“मग?”
“मग मी तिची चौकशी करायला लागले. बोलता बोलता तिच्याकडून कळलं की तिचं नाव पिंकी होतं, ती कोळीवाड्याला रहात होती आणि कोळीवाड्याच्याच शाळेत होती. तिला बेलापूरला जायचं होतं, पण बेलापूर आणि बदलापूर या नावांत घोळ होऊन ती चुकुन बदलापूरला आली होती.”
एकटी मुलगी चुकून घरापासून इतक्या लांब आणि नवख्या भागात आलिये हे कळल्यावर सेवा एकदम सावध झाली. तिच्याकडे दुर्लक्ष करून सोडून दिलं तर ती गंभीर संकटात सापडू शकते याची तिला क्षणात जाणीव झाली, आणि अडचणीत सापडलेल्याला शक्य ती सगळी मदत करायची ह्या तिच्या वडिलांकडून (आप्पा कुलकर्णी) आलेल्या स्वभावाने तिने मुलीला सुखरूप घरी पोहोचवायचा मनोमन निश्चय केला.
निश्चय केला खरा, पण तिला तिच्या घरी न्यायचं कसं? जेमतेम २१ वर्षांचं वय, लग्न होईपर्यंत मुंबईशी कधी संबंध आलेला नाही, ती राहते तो भाग सुरक्षित आहे का नाही ते माहीत नाही…..या आणि अशा अडचणी तिला भेडसावू लागल्या. पण त्याने डगमगून माघार घेईल तर ती आप्पा कुलकर्णींची लेक कसली!
तोपर्यंत कल्याण जवळ आलं होतं. ती पिंकीला म्हणाली –
“पिंकी, मै तुम्हे तुम्हारे घर छोडती हूं, पर पहले मेरे साथ कल्याण उतरो. यहां मेरे भैया और भाभी रहते है, उनके घर जाएंगे, और फिर भाभीको साथ लेकर तुम्हारे घर जाएंगे.”
“पिंकी भीतीपोटी उतरायला तयार नव्हती. मग मी तिला पोलिसांची भीती दाखवली. मधल्या स्टेशनवर चढलेल्या बायका आमचं संभाषण ऐकत होत्या. त्यांना सुद्धा माझी कल्पना पटली. त्यांनी पण पिंकीला समजावलं, तेंव्हा ती नानाकडे यायला तयार झाली. मग आम्ही कल्याणला उतरून रिक्षाने घरी आलो.”
“छान. मग पुढे?”
“ वहिनीने पण तिची आस्थेनं चौकशी केली. तिला पोटभर जेऊ घातलं. तयार नव्हतीच ती, पण थोडं दटावल्यावर जेवली. आतापर्यंत आम्हा दोघींच्या बोलण्यातली आस्था, घरातलं वातावरण आणि चिमुकली केतकी पाहून तिला आमच्याबद्दल विश्वास वाटला असावा.”
“मग काय झालं?”
“मग मी आणि वहिनी तिला बरोबर घेऊन आणि केतकीला कडेवर घेऊन कुर्ल्याला आलो. खरं तर वर्षभराच्या लेकीला लोकलमधून कल्याणपासून कुर्ला किंवा कोळीवाड्यापर्यंत घेऊन जायचं तसं जोखिमीचंच होतं, पण प्रसंगाचं गांभिर्य ओळखून वहिनी लगेच तयार झाली.”
“कुर्ल्याला उतरून पी.सी.ओ. वरून फोन करून नानाला देवनारहून (गोवंडी देवनार स्लॉटर हाऊस) बोलावून घेतलं. अगदीच अनोळखी भागात जायचं होतं, त्याची सोबत असलेली बरी म्हणून.”
“भेटल्यावर काय म्हणाला नाना?”
“सगळी कथा त्याला सांगितली. त्यालाही कौतुक वाटलं. मग आम्ही सगळेच कोळीवाड्याला गेलो. स्टेशनच्या बाहेर पडल्यावर सुरवातीला ती आमच्याबरोर चालत होती. पण जशी तिची वस्ती जवळ आली तशी ती धावायला लागली. आम्हालाही तिच्याबरोबर धावावं लागलं. तिचं घर जवळ आलं असावं. कुणीतरी ओरडलं –
“ओ पिंकी आगई.”
आवाज ऐकून एका बैठ्या चाळीतल्या घरातून तिचे धिप्पाड वडील धावत आले. पिंकीला पाहून त्यांचा बांध फुटला आणि तिला कडकडून मिठी मारून ते रडू लागले.”
“भावनावेग कमी झाल्यावर ते आम्हाला घरात घेऊन गेले. बिचारे दुपारपासून ते वेड्यासारखे तिला शोधत होते. सगळ्या परिचितांची, नातलगांची घरं शोधून झाली होती. एवढंच काय, जवळपासची हॉस्पिटल्स पण शोधून झाली होती. ती सापडेल का नाही या चिंतेनं सगळं कुटुंब हवालदील झालं होतं.”
“घरात गेल्यावर वडिलांनी (दारा सिंग त्यांचं नाव – त्यांच्या देहयष्टीला अगदी साजेसं) तिला कुठे आणि का गेली होतीस म्हणून विचारलं.”
“त्यावर पिंकीनं जे (हिंदीत) सांगितलं, त्याचा सारांश असा” –
“गेला एक आठवडा टीचर माझ्या मागे लागल्या होत्या की वडिलांना घेऊन ये म्हणून. पण मला वडिलांना सांगायची खूप भीती वाटत होती. रोज काहीतरी कारण सांगून मी टाळत होते. पण आज वडिलांना आणल्याशिवाय वर्गात बसायंचच नाही असं ठणकावून सांगून मला परत पाठवलं. वडील घरीच होते, पण त्यांना सांगायची हिंमत होत नव्हती. मग बेलापूरला राहणार्या आत्याची मदत घ्यावी म्हणून बेलापूरला जाण्यासाठी कुर्ल्याला आले आणि बेलापूर ऐवजी चुकून बदलापूर गाडित बसले. गाडी सुटली, पण पुढचा सगळाच परिसर अनोळखी दिसत होता. पर्याय नव्हता म्हणून पुढे पुढे जात राहिले, आणि बदलापूरला पोहोचले. पुढचं तुम्हाला माहीत आहे.”
“मग पुढच्या घटना नानाने दारा सिंगला सांगितल्या आणि “तिला रागावू तर नकाच, पण मुलगी तुमच्याशी मोकळेपणी बोलू शकणार नाही एवढी दहशतही ठेवू नका” असं समजावून सांगितलं. त्यालाही ते पटलं.”
“कृतज्ञता म्हणून त्याने सर्वांवाठी कोल्ड ड्रिंक मागवलं, आणि नको नको म्हणत असतानाही छोट्या केतकीच्या हाती शंभर रुपयांची नोट घातली.”
आज पिंकीचीही पन्नाशी उलटली असेल. कदाचित् ती ही घटना विसरूनही गेली असेल, पण आम्हा सर्वांच्या मनात ही घटना कायमची कोरली गेली एवढं मात्र नक्की!
अडलेल्याला निरपेक्षपणे मदत करण्याचं जे व्रत कै.एकनाथ रामकृष्ण उर्फ आप्पा कुलकर्णींनी आयुष्यभर पाळलं, ते त्यांच्या मुलांनीही पुढे आयुष्यभरसाठी अंगिकारलं ही अत्यंत आनंदाचीच गोष्ट, नाही का?
— संजीव गोखले, पुणे.
– दि. ०७ मे २०२३.
Leave a Reply