मी त्यावेळी जपानच्या दौर्यावर होतो. भारत आणि जपानच्या सांस्कृतिक विभागांनी एकत्रितपणे त्याचं आयोजन केलं होतं. दहा-पंधरा दिवसांच्या कालावधीत हा देश भौगोलिकदृष्ट्या पाहणं शक्य होतं; पण सांस्कृतिकदृष्ट्या त्याचा परिचय होणं हे कठीण होतं. तरीही प्रयत्न सुरू होता. रोज किमान तीन भेटी असा कार्यक्रम असायचा. त्यातही प्रामुख्यानं संग्रहालये असत. काही भेटी मी भारतात असतानाच निश्चित केलेल्या होत्या अन् त्या ठरल्यावेळी पार पाडण्यावर तिथल्या लोकांचाही भर होता. आम्हा चौघा भारतीय पत्रकारांसाठी एका महिला गाईडची योजना होती. बुटकीशी पण लाघवी अन् भरपूर माहिती असणारी. चार दिवस होऊन गेले होते. हॉटेल ओतानी हे किती महागडं हॉटेल आहे, याची जाणीव झाली होती आणि विशेष म्हणजे या चार दिवसांत घरच्या जेवणाचं निमंत्रण कोणाकडूनही मिळालेलं नव्हतं. आता आपल्या गाईडलाच पकडायचं असं आम्ही चौघांनी ठरविलं. ‘‘आम्हाला तुझ्या घरी जेवायला यायचंय’’ असं स्पष्ट सांगितलं; पण ती सहजी तयार नव्हती. ‘‘मी माझ्या वतीनं तुम्हाला मेजवानी देते, बाहेर कुठे जाऊ,’’ असं तिचं म्हणणं होतं. जपानमध्ये पाहुण्यांना घरी बोलवायचा फारसा प्रघात नाहीये; अशी माहितीही तिनं दिली; पण आम्ही पिच्छा सोडायला तयार नव्हतो. अखेर संध्याकाळचं भोजन तिच्या घरी घ्यायचं ठरलं. ‘सुशी’ हा प्रकार तिनं केला होता. रॉ फिश असं त्याचं स्वरूप होतं. आमच्या जेवणाच्या तपशिलात जात नाही; पण त्यावेळी गप्पा चांगल्या रंगल्या. त्या ओघात तिनं सांगितलं की, मी राहते त्याच इमारतीत जपानची एक ज्येष्ठ अन् श्रेष्ठ कॅलियोग्राफर राहते. खूप छान आहे ती. तिचे अक्षरलेखन जपानच्या अभिमानाचा विषय आहे.म्हा चौघात एक चित्रकार होता सतीश गुप्ता. तो म्हणाला, ‘‘आपली भेट होईल? आता? आम्ही त्यांना भेटलंच पाहिजं. इतक्या जवळ आल्यानंतर तर ही भेट व्हायलाच हवी.’’ जपानमध्ये व्यक्तिगत जीवनाला, खासगी जीवनाला विशेष महत्त्व आहे. कोणीही कोणाला असं ऐनवेळी भेटत नाही अन् घरी तर सहसा नाहीच, असं बरंच काही सांगण्याचा आमच्या गाईडनं प्रयत्न केला; पण आमचा आग्रह मोठा होता. अखेर तिनं त्या अक्षरकलावंत महिलेला फोन करायचं ठरविलं. ती फोनवर बोलत होती तेव्हा आमची उत्सुकता ताणली गेली होती. भाषा कळत नव्हती; पण बहुधा काम झालं असावं, असं वाटत होतं. झालंही तसंच. ती म्हणाली, ‘‘आणखी वीस मिनिटांनी तुम्ही भेटू शकता असं म्हणालीय ती. खरंच हे आश्चर्यच आहे, की कोणी जपानी व्यक्तीनं इतक्या झटपट भेटीची वेळ द्यावी. पुढची वीस मिनिटे अन्य विषय बाद झाले. आम्ही त्या कलाकार महिलेचीच माहिती घेत राहिलो. वयाची सत्तरी तिनं पार केलेली आहे. तेव्हा तुमची भेट लवकर संपवा, अशी सूचनाही पुढे आली. अखेर आम्ही तिथं पोहोचलो.
छोटंसं घर, त्यात दहा बाय बाराचा हॉल. त्यांनी मोठ्या आदबीनं अन् सुहास्य वदनानं स्वागत केलं. उंची फार तर चार फूट दहा इंच. रंग पिवळसर गोरा. चेहर्यावर तांबूस चट्टे. कमरेत थोडा बाक आलेला आणि स्वागतासाठी, बोलण्यासाठी थोडंस वाकणं. सत्तरी पार केलेली, थकलेली तरी उत्साहानं भरलेली मुद्रा. हॉलमध्ये एक आयताकृती पाट आणि त्यावर कागद ठेवलेले. त्याभोवती आम्ही बसलो. अक्षरकलेच्या गप्पा सुरू झाल्या. शब्द, त्यामागचा वेग, ब्रशचा आकार, कलाकाराची मानसिक स्थिती, या सर्वांचा अक्षरांवर होणारा परिणाम या तुलनात्मक नव्या विषयावर ही चर्चा होती. अक्षरं काढतांना त्यामागचा कलाकार काय असू शकतो, कसा असावा याची जाणीव होत होती. गप्पांच्या ओघातच ‘काहीतरी प्रात्यक्षिक दाखवा,’ असा आग्रह सुरू झाला. तसा तो होणारच याची त्या कलावतीला जाणीव असावी. तो पाट आणि त्यावरील कागद त्याचीच साक्ष होते. अवघ्या मिनिटाभरता तिनं ब्रशनं त्या कागदावर ओणवं होऊन अक्षरं काढायला सुरुवात केली. एखादी ओळ झाली, की तो कागद टर्रकन फाडला जाई. त्याचा बोळा कोपर्यात भिरकावला जाई. एक-दोन-तीन असे दहा-बारा बोळे कोपर्यात जमा झाले होते. त्यानंतर मात्र सहा कागद लिहून बाजूला ठेवण्यात आले. आधीच्या कागदात काय कमतरता होती कोण जाणे? पण हे सहा कागद मात्र देखण्या चित्रासारखे होते. शब्दांचा अर्थ कळत नव्हता, तरी त्यांचा भाव लक्षात येत होता. आमच्या उज्ज्वल भवितव्यासाठी सूर्यदेवतेला केलेली ती प्रार्थना होती. ‘आता उठायला हवं,’ असं आमच्या गाईडनं सुचविलं; पण त्या उत्साहमूर्ती वृद्धेच्या ऊर्जा अनुभवण्यात एक वेगळाच आनंद होता. ‘‘हे जे अक्षरलेखन केलंय ते आम्हाला मिळेल का?’’ एकाच वेळी दोघांनी प्रश्न केला. हाप्रश्नही तिला अभिप्रेत असावा. ती म्हणाली, ‘‘हो, थांबा हं मी त्यावर माझं सील लावून देते.’’ एका अर्थानं त्या कलाकारानेआपल्या कलेविषयी समाधान पावल्यानंतर उठविलेली मोहर म्हणजे हे सील. या कलाकाराच्या दर्जा परिमाणाचा एक अविष्कार त्याला जपानमध्येच नव्हे, तर अन्यत्रही तेवढीच मान्यता. तिनं सील घेतलं खरं, पण त्यापैकी चार कागदांवरच ते उमटविलं.
एकेक कलाविष्कार आमच्या हाती ठेवला. ‘‘…आणि ती उरलेली दोन?’’ आमच्यापैकी एकानं विचारलंच. ती म्हणाली, ‘‘अक्षरकला म्हणून तीही छान जमलीत. ती तुम्ही घेऊनही जाऊ शकता; पण त्यावर सील नाही करणार. कारण जो दर्जा अपेक्षित आहे तो त्यात नाही देता आला.’’ आपली कथा, कविता, चित्रपट, गीत याविषयी बोलतांना कलाकार त्यांना अपत्याचं नाव देतो अन् त्यात भेदभाव कसा करणार? असा प्रश्न विचारतो. … मला हे त्यावेळी आठवलं. खरंच, कलाकार आपल्या कलाकृतीमधल्या दर्जाची चिकित्सा करू शकतो? तशी करता येत नाही, असं म्हणणारे खरोखर किती प्रामाणिक असतात? वयाची सत्तरी पार केलेली, स्पर्धेतून बाजूला झालेली ही कलाकार मात्र अजूनही आपल्या सीलचा दर्जा कायम राखण्याबद्दल तत्पर होती. त्यासाठी तिनं दोन चित्र बाजूला काढली होती. अक्षरकला, त्यामागचे कष्ट, त्यातलं कसब याविषयी फारसं ज्ञान नसलेल्या मला तिचं ती दर्जाविषयीची प्रामाणिक आत्मीयता खूप काही सांगून गेली. ती कलाकार तर मोठी होतीच; पण स्वतःवर टीका करण्याचं धाडस, क्षमताही तिच्यातल्या कलाकाराला अधिक मोठं करीत होती.
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply