दारूबंदी शब्द ऐकुनी भिऊ लागली दारू
चर्चेनंतर प्याले भरता पुन्हा हासली दारू
कितीजणांच्या संसाराची धूळ उडाली आहे
पण पाठीशी शासन म्हणुनी पहा माजली दारू
मला म्हणाले संयोजक घ्या तुम्ही मानधन थोडे
पण संमेलन झाल्यानंतर खूप वाटली दारू
गझला माझ्या ऐकत श्रोते जसे लागले डोलू
अता तुझी ही नशा मला दे म्हणू लागली दारू
नारळपाणी प्यावे किवा चहा कधीही प्यावा
चुकूनही हे म्हणू नये की -असे चांगली दारू
गडे तुझ्या या येण्याआधी खुणवत होती मजला
तुझे पाहिले डोळे तेव्हा किती लाजली दारू
सत्काराचे हार म्हणाले, हे विजयी नेत्यांनो
सांगा रात्री मतदारांना किती वाटली दारू
तुम्ही बातम्या पहाल रंगित तेव्हा नक्की समजा
इथे रंगल्या पाट्यार् आणिक इथे रंगली दारू
इंग्रज गेले तरी तिचे हे इंग्लिश पक्के आहे
पण सांगा ही शुध्द मराठी कधी बोलली दारू
कुठे जिजाऊ, कुठे सावित्री,कुठे अरे ती झाशी
आईसोबत अता पिती ही मुले आपली दारू
याच्या त्याच्या हाताने मी कशास घेऊ प्याला
ख्रिस्ताने प्रेमाची जेव्हा मला पाजली दारू
— प्रदीप निफाडकर
Leave a Reply