जीवनचक्र – संक्षिप्त मराठी सुची
१) Pre Erythrocytic Schizogony
(तांबड्या रक्त पेशीत शिरण्याच्या आधीची परोपजीवांची स्थिती)
२) Erythrocytic Schizogony and Gametogony (clinical Attack)
(तांबड्या रक्त पेशीत वाढणारे परोपजीवी (रुग्णाला ताप येताना दिसणारी स्थिती)
३) Exo Erythrocytic schizogony (Clinical Cure)
(परोपजीवी रक्तातून नाहिसे होण्याची स्थिती म्हणजेच रूग्ण तापमुक्त होण्याची स्थिती)
४) Exo Erythrocyti Schizogony and Gametogony (Relapse)
(तांबड्या रक्त पेशीतील परोपजीवी स्थिती (उलटणारा मलेरिया)
५) Infection of Mosquito
(डासाच्या शरीरात शिरणारे परोपजीवी)
६) Completion of Gametogony
(डासाच्या शरीरात पूणर्णपणे वाढलेले परोपजीवी)
७)Cycle of sporogony
(डासाच्या सोंडेतून बाहेर पडण्यास सज्ज असलेले परोपजीवी)
८) Infection of Man
(माणसाला डासाच्या चावण्यावाटे शिरणारे परोपजीवी)
मलेरियाच्या परोपजीवांचे जीवनचक्र
सजीव कीटक, प्राणी वा माणूस यांच्या शरीरातील घटकांवर जो स्वत:ची वाढ करुन घेतो त्याला परोपजीवी अस (Parasite) म्हणतात. या त्याच्या वैशिष्ट्यामुळे तो जंतूंपासून (Bacteria) वेगळा आहे. हे परोपजीवी मनुष्य, कीटक व प्राणी यांच्या शरीराच्या आश्रयाने रहतात. या आश्रयदात्यांना (Host) असे म्हणतात.
मलेरिया परोपजीवांच्या जीवनचक्रात डास हा प्राथमिक आश्रयदाता (Primary Host) व माणूस हा दुय्यम स्थानावरील आश्रयदाता (Secondary Host) असतो. मलेरियाच्या परोपजीवांच्या जीवनचक्राचे ढोबळ स्वरूप खालीलप्रमाणे असते.
मलेरिया झालेल्या रुग्णाला जेव्हा डास चावतो, त्यावेळी डासाच्या शरीरात माणसाच्या रक्ता बरोबर मलेरियाचे परोपजीवीही शिरतात. डासाच्या शरीरात त्यांची वाढ पूर्णत्वाच्या दिशेने घडत असते. नंतर हेच डास निरोगी माणसाला चावल्यावर त्या डासांच्या लाळेतून वाढ होत असलेले परोपजीवी निरोगी व्यक्तीच्या शरीरात शिरतात. तेथे त्यांची वाढ पूर्ण होते व मलेरियाची लक्षणे त्या निरोगी माणसात दिसू लागतात. अर्थातच आता तोच मलेरियाचा रुग्ण बनतो.
परोपजीवाच्या जीवनचक्रामध्ये क्रमाक्रमाने घडणाऱ्या स्थित्यंतराचा अभ्यास सामान्य वाचकांना कठीण व गुंतागुंतीचा वाटण्याची शक्यता आहे. तरीही जिज्ञासू व अभ्यासू वाचकांना यातून मलेरियाच्या रोगासंबधी अधिक माहिती मिळावी असा प्रयत्न येथे केला आहे.
डास व माणूस यांच्यामधील परोपजीवांमध्ये घडून येणाऱ्या अवस्थांची नांवे खालीलप्रमाणे आहेत.
डासांमधील अवस्थांचा क्रम
१) Male and Female Gametocyte
२) Zygote
३) Oocyst
४) Sporocyst
५) Sporozoites
माणसामधील अवस्थांचा क्रम
१) Sporozoites
२) Schizont
३) Merozoites
४) Trophozoites (Ring and amoeboid forms)
५) Male and Female Gametocytes
डासांच्या शरीरात चालणारे जीवनचक्र
परोपजीवांच्या नर व मादी यांच्या संयोगामुळे घडणारे जीवनचक्र
१) परोपजीवांच्या नर व मादी या स्थितीला गॅमेटोसाईटस् म्हणतात. ही त्यांची अवस्था मलेरिया झालेल्या रुग्णाच्या रक्तात झालेली असते. अशा रुग्णाला जेव्हा डास चावतो, तेव्हा रुग्णाच्या रक्तामधून हे गॅमेटोसाईटस् व इतर सर्व अवस्थांमधील परोपजीवींचे लटांबर डासामध्ये प्रवेश करतात परंतु आता या ठिकाणी निसर्गाची किमया किती अगाध आहे हे लक्षात येईल. परोपजीवांचे जीवनचक्र चालू राहण्यासाठी फक्त गॅमेटोसाईटस (नर व मादी) यांची गरज असते, त्याच्याबरोबर आलेल्या लटांबराची नाही ही वस्तुस्थिती असल्याने ते डासांच्या शरीरात नष्ट होतात. या लटांबरामधील परोपजीवांमुळेच मलेरिया रोगाची लक्षणे (उदा. ताप येणे वगैरे) मनुष्यात दिसून येतात. डासांच्या शरीरात मात्र यांची विल्हेवाट लावल्याने डासात मलेरियाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत व ते मलेरियामुळे मरतही नाहीत. त्यांचे जिवंत राहणे परोपजीवांचे जीवनचक्र चालू ठेवण्यासाठी आवश्यक असल्याने ती काळजी निसर्गाकडून घेतली जात असावी. आता फक्त एक किंवा दोन गॅमेटोसाईटस् Per Cubic Milimeter डासात शिरून उपयोगाचे नसते; तर रुग्णाच्या रक्तात निदान बारा गॅमेटोसाईटस असे प्रमाण असणे गरजेचे असते व त्यातही मादी गॅमेटोसाईटसची संख्या नर गॅमेटोसाईटस पेक्षा जास्त असावी लागते. तरच संयोग प्रक्रिया पूर्णत्वास जाऊ शकते. इथूनच मग जीवनचक्राचा पुढील टप्पा सुरू होतो अन्यथा हे चक्र पूर्ण थांबून जाते. हा प्रयोग वारंवार फसत नाही आणि म्हणूनच परोपजीवी डासांमध्ये वाढत असतात.
२) डासांच्या शरीरात शिरलेल्या नर व मादी गॅमेटोसाईटस्ची वाढ त्याच्या जठरात पूर्ण होते. आता नर व मादी यांचे मीलन वा संयोग आकर्षण पद्धतीने होते.
नर हा मादीकोशाच्या फुगीर भागात घुसतो व त्यातून Zygote निर्माण होतो. डासाने रूग्णाचे रक्त शोषून घेतल्यानंतर २० मिनिटे ते २० तासात ही क्रिया पुरी होते.
३) तयार झालेले Zygote वेगाने गोलाकार फिरत डासाच्या जठराच्या पोकळीतून जठराची भिंत भेदून बाहेर येतात व त्याच्या बाह्य आवरण पापुद्र्याला चिकटतात. Zygote च्या भोवती जाड कवच (cyst wall) तयार होते. त्यांचा आकार ६ ते १२u (मायक्रोन) म्हणजे एका बारीक टिंबाहूनही लहान असतो. हळूहळू त्यांचा आकार वाढत ६०॥ पर्यंत जातो व त्यात काळपट रंगाचे बारीक कण दिसू लागतात, या अवस्थेला oocyst म्हणतात. रॉसला डासांच्या विच्छेदनात हेच दिसल्याने त्याची पूर्ण खात्री झाली होती की हेच मलेरियाचे परोपजीवी असून ते डासांमधून पुन्हा माणसाच्या शरीरात शिरतात.
४) या oocyst ची वाढ होते असताना त्याच्या आतील पोकळीत विळ्याच्या आकाराचे असंख्य बारीक तंतू निर्माण होतात, ज्यांना sporozoites म्हणतात.
साधारणत: डासांच्या जठराच्या बाह्य आवरणाला २० ते ३० oocysts घट्टपणे चिकटलेले असतात. दहा दिवसात त्यांची पूर्ण वाढ झाल्यावर त्यांना sporocysts असे म्हणतात. हे sporocysts एखाद्या ताणलेल्या फुग्यासारखे दिसू लागले की एका क्षणाला फुटतात. व त्यातून शेकडोंच्या संख्येने तयार झालेले sporozoites डासांच्या संपूर्ण शरीरभर पसरतात. या ठिकाणी अपवाद फक्त स्त्री पिंडाचा असतो. ज्यामध्ये ते शिरत नाहीत. हळूहळू हे sporozoites मार्ग शोधीत लाळग्रंथीत जमा होतात. लाळग्रंथीतील द्रावात त्यांची वाढ पूर्ण होते व तेथून लाळनलिकेत ते आपले ठाण मांडतात. मलेरिया परोपजीवी माणसात पसरविण्यासाठी लागणारी तयारी आता झालेली असते. अखेर फक्त एक चावा आपले काम फत्ते करणार असतो.
माणसाच्या शरीरात मलेरिया परोपजीवांचे जीवनचक्र कसे चालते हे समजण्यासाठी प्रथम आपल्याला त्यांच्या विविध गटांची व अवस्थांची माहिती असणे आवश्यक आहे.
मलेरियाच्या परोपजीवांना Plasmodium या नावाने ओळखले जाते. यामध्ये अनेक उपगट असून त्यांच्यामधील विविध अवस्थांच्या रचनेत फरक आढळतो, ज्यावरून ते विविध उपगटांच्या नावाने ओळखले जातात.
जगभरामध्ये माणसात मुख्य चार प्रकारच्या गटांच्या परोपजीवांमुळे मलेरिया या रोगाची लक्षणे दिसून येतात. त्यांची नांव
१) Plasmodium Vivax
२) Plasmodium Falciparum
३) Plasmodium Malaria
४) Plasmodium Ovale.
माणसांप्रमाणे उच्च श्रेणीतील एप्स माकडे, विविध तऱ्हेचे पक्षी, (कावळे, चिमण्या, बदके इत्यादी) वटवाघळे तसेच थंड रक्ताचे सरपटणारे प्राणी उदा. साप, पाली वगैरे या सर्वांमध्ये मलेरिया परोपजीवी आढळतात व त्यांनाही मलेरिया सदृश लक्षणे दिसतात.
या सर्वांचा विचार करताना दोन मुख्य गटांचे डास मलेरिया पसरवितात असे आढळते. माणूस व माकडे यांच्यात मादी अॅनॉफेलीस तर पक्षात मादी क्युलेक्स डास जबाबदार असतात. मनुष्य व प्राणीमात्रात परोपजीवींचे जीवनचक्र साधारणपणे एकाच पद्धतीने होत असते. भारतात मुख्यत: Plasmodium Vivax व Plasmodium Falciparum हे दोनच मुख्य परोपजीवी गट आढळतात.
सबंध पुस्तकात याच दोन गटांना अनुसरून विषयाची मांडणी केली आहे.
-– डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply