माणसाच्या शरीरात चालणारे मलेरिया परोपजीवांचे जीवनचक्र
१) डास मनुष्याला चावतो त्यावेळी डासाच्या लाळग्रंथीत तयार झालेल sporozoites लाळे मार्फत मनुष्याच्या कातडीखाली सोडले जातात. त्यांची वाढ अजून पूर्णपणे झालेली नसल्याने ते एकदम तांबड्या पेशींवर हल्ला करू शकत नाहीत. या परोपजीवांच्या अवस्थेला Pre Erythrocytic schizogony असे म्हणतात.
२) कातडीच्या खालील भागात शिरलेल sporozoites फिरत फिरत मनुष्याच्या यकृतात येऊन स्थिरावतात व तेथे त्यांची वाढ होते. त्या अवस्थेला schizont म्हणतात. P. Vivax वाढण्यास साधारण ५ ते ६ दिवस व Falciparum वाढण्यास अंदाजे ७ ते ९ दिवस लागतात. ही वाढ इतकी शांतपणे व बिनबोभाट होत असते की त्यावेळी मलेरिया रोगाची कोणतीही लक्षणे दिसत नाहीत, किंवा यकृताच्या पेशींमध्येसुद्धा कसलाही बिघाड दिसत नाही. इतकेच नव्हे तर तांबड्या रक्तपेशींतही परोपजीवी दिसत नाहीत. त्यांची वाढ पूर्ण झाल्यानंतर Schizont फुटून त्यातून असंख्य Merozoites रक्तात पसरतात.
३) तांबड्या रक्तपेशीत घडणारी स्थित्यंतरे
Merozoites तांबड्या रक्तपेशींवर तुफानी हल्ला चढवतात. आता परिस्थितीचा ताबा पूर्णपणे परोपजीवांच्या हातात असतो व एका पाठोपाठ नवीन तांबड्या रक्तपेशींच्या गटांवर हल्ला चालूच राहतो. आता यानंतर वाढ झालेल्या परोपजीवांच्या अवस्थेस Trophozoites म्हणतात. या वेळातच मलेरियाची लक्षणे दिसतात व त्याचवेळी घेतलेल्या रक्ताच्या काचपट्टीवरील नमुन्यात परोपजीवी दिसू लागतात. या अवस्थेतील वाढ अंदाजे ३ ते ४ दिवस चालू असते. त्यानंतर निसर्गनियमाप्रमाणे ही परोपजीवींची वाढ हळूहळू थांबते व त्यांचे आर्युमान संपावयास लागते.
४) Gametogony
तांबड्या रक्तपेशीत वाढणाऱ्या परोपजीवींची आर्युमर्यादा P. Vivax व P. Falciparum या मध्ये वेगवेगळी असल्याने दोघांमुळे येणाऱ्या तापाच्या पद्धतीत फरक असतो. परोपजीवांची वाढ होताना त्यापैकी काहींमध्येच बदल होऊन त्यांच्यातील काही नर व काही मादीच्या अवस्थेला जाऊन पोहोचतात. ही वाढ प्लीहा (Spleen) व अस्थिमज्जा (Bone Marrow) ह्यामधील बारीक रक्तवाहिन्यातील फिरणाऱ्या तांबड्या रक्तपेशीत होत असते. त्यांची वाढ जेव्हा पूर्णत: होते तेव्हाच त्यांचे कातडी खालील केशवाहिन्यात (Blood Capillaries) आगमन होते. ही वाढ ४ ते ६ दिवसात पूर्ण होते. या अवस्थेत असताना ताप किंवा इतर कोणतीही लक्षणे रुग्णात दिसत नाहीत तरीही परोपजीवींची ही अवस्था रक्त तपासणीत दिसू शकते. यानंतर डास जेव्हा माणसाला चावतो त्याक्षणी ते परोपजीवी माणसातून डासाच्या शरीरात प्रवेश करतात.
काही रुग्णांच्या रक्तात Gametocyte या अवस्थेतील परोपजीवी बरेच महिने ठाण मांडून बसतात. अशा रुग्णांना मलेरियाचे वाहक (Carrier) म्हणतात. या वाहकांमुळे पुढे मलेरियाचा प्रसार होण्यास मदत होते.
५) Exo Erythrocytic Schizogony
Plasmodium Vivax गटाच्या परोपजीवांमुळे झालेले मलेरियाचे बरेच रुग्ण पूर्णपणे रोगातून मुक्त होतात. परंतु काही रुग्णांत ताप जरी गेलेला असला तरीसुद्धा काही परोपजीवी यकृताच्या पेशीत सुप्तपणे घर करतात. जेव्हा या परोपजीवांना यकृतामधून बाहेर पडण्यासाठी योग्य वेळ वाटते त्यावेळी ते परत रक्तात मिसळतात आणि पुन्हा एकदा तांबड्या पेशींवर जोरदार हल्ला करतात आणि यावेळी परत मलेरियाच्या रोगाने रुग्ण ग्रस्त होतो. साधारणपणे ६ महिने ते २ वर्षे कालवधीत ते केव्हाही आपला प्रताप दाखवितात.
सुप्त परोपजीवी ठराविक काळानंतरच रक्तात का मिसळतात याबद्दल अचूक कारणे कोणती असावीत याचा उलगडा झालेला नाही. पुन्हा नव्याने सुरू झालेल्या मलेरियाच्या तापाला उलटलेला (Relapse) रोग असे म्हणतात. हा ताप नवीन डास चावल्याने न होता शरीरात लपून राहिलेल्या परोपजीवांमुळे होतो ही एक विशेष लक्षणीय बाब आह.
अशा तऱ्हेची परिस्थिती Plasmodium Falciparum झालेल्या मलेरियामध्ये आढळत नाही. हा या दोन गटांमध्ये फरक असल्याने रक्तात कोणत्या गटाचे मलेरियाचे परोपजीवी आढळतात हे पाहणे फार गरजेचे ठरते. हे निदान अचूकपणे झाल्यास त्याप्रमाणे रुग्णास औषधोपचार कसे करावेत हे ठरविले जाते. अगदी क्वचित कधीतरी मात्र दोन्ही गटाचे परोपजीवी एकाच वेळी डासाच्या चावण्यातून माणसात शिरू शकतात.
इतर जंतूंप्रमाणे मात्र मलेरियाचे परोपजीवी प्रयोगशाळेत वाढविणे फारच कठीण असते.
— डॉ. अविनाश वैद्य
Leave a Reply