साम्बो नः कुलदैवतं पशुपते साम्ब त्वदीया वयं साम्बं स्तौमि सुरासुरोरगगणाः साम्बेन संतारिताः ।
साम्बायास्तु नमो मया विरचितं साम्बात्परं नो भजे साम्बस्यानुचरोऽस्म्यहं मम रतिः साम्बे परब्रह्मणि ॥ १॥
भगवान श्रीशंकरांच्या दिव्य वैभवाचे वर्णन करणारे जगद्गुरु आदि शंकराचार्यांचे आणखी एक सुंदर स्तोत्र म्हणजे दशश्लोकीस्तुती. श्लोकसंख्येच्या विस्तारा वरून केलेले हे नामकरण.
आचार्य श्री म्हणतात,
साम्बो नः कुलदैवतं – अंबा श्रीपार्वतीसह असणारे भगवान सांब आमचे कुलदैवत आहेत.
पशुपते- सकल जीवांच्या संचालका,
साम्ब त्वदीया वयं – हे भगवान शंकरा !आम्ही तुझेच दास आहोत. साम्बं स्तौमि-मी भगवान शंकरांचे स्तवन करीत आहे. सुरासुरोरगगणाः – सुर, असुर आणि उरग असे तीन शब्द यात आहेत. सुर म्हणजे देवता. असुर म्हणजे राक्षस तर उरग म्हणजे नाग. उर म्हणजे छाती तिच्या आधारे तो पुढे जातो, म्हणजे सरपटत सरपटत पुढे जातो त्यामुळे त्याला उर-ग असे म्हणतात.
हे तीनही प्रकारचे जीव भगवान शंकरांचे गण आहेत. या सगळ्यांवर त्यांची सत्ता चालते.
साम्बेन संतारिताः – हे तीनही जीव भगवान शंकरांद्वारे तारले जातात. श्री शंकरच या सगळ्यांचा उद्धार करतात.
साम्बायास्तु नमो मया विरचितं – मी केलेला हा नमस्कार शंकरांना असो.
साम्बात्परं नो भजे- भगवान शंकरांपेक्षा श्रेष्ठ मला पूजण्यासाठी काहीही नाही. तेच परम सत्ता आहेत. साम्बस्यानुचरोऽस्म्यहं – मी भगवान शंकरांचा अनुचर अर्थात् दास आहे.
मम रतिः साम्बे परब्रह्मणि – परब्रह्मस्वरूप असणाऱ्या भगवान शंकरांच्याच ठाई माझी पूर्ण भक्ती जडलेली आहे.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply