विष्णुब्रह्मसुराधिपप्रभृतयः सर्वेऽपि देवा यदा संभूताज्जलधेर्विषात्परिभवं प्राप्तास्तदा सत्वरम् ।
तानार्ताञ्शरणागतानिति सुरान्योऽरक्षदर्धक्षणा- त्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ १०॥
भगवान शंकरांच्या अनेक लीलांपैकी एक परम वैभवशाली लीला म्हणजे हलाहल प्राशन.
अमृताच्या प्राप्तीसाठी देवतांनी आणि राक्षसांनी समुद्रमंथन केले. मंदर नावाच्या पर्वताला रवी तर वासुकी सर्पाला दोरी करण्यात आले. त्या घुसळणीमुळे वासुकीच्या विषाने समुद्रातून हलाहल नामक महाभयानक विष बाहेर आले.
त्या प्रसंगाचा संदर्भ घेत आचार्य श्री म्हणतात,
विष्णुब्रह्मसुराधिपप्रभृतयः सर्वेऽपि देवा यदा संभूताज्जलधेर्विषात्परिभवं प्राप्तास्तदा सत्वरम् –
जलधी अर्थात समुद्रातून निर्माण झालेल्या विषाने श्री विष्णू,ब्रह्मदेव इ. देवता देखील पराजित झाल्या. अर्थांत त्याला स्वीकारु शकल्या नाही.
त्या विषाची भयानकता इतकी होती की त्याच्या केवळ वाफेच्या स्पर्शाने पूर्वी शशिवर्ण असणारे भगवान श्री विष्णू काळे पडले.
मग बाकीच्यांचा प्रश्नच काय? सर्वच हतबल झाले.
त्यावेळी त्या सर्व देवता भगवान शंकरांना शरण आल्या.
तानार्ताञ्शरणागतानिति सुरान्योऽरक्षदर्धक्षणात् –
त्या शरण आलेल्या देवता समूहांना ज्यांनी अर्ध्या क्षणात संरक्षण दिले.
अर्थात त्यांनी अत्यंत कमी वेळात त्या विषाला प्राशन करून सगळ्यांची समस्या दूर केली. सगळ्यांना सुखी केले.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरण कमलाशी माझे हृदय कायम निवास करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply