क्षोणी यस्य रथो रथाङ्गयुगलं चन्द्रार्कबिम्बद्वयं कोदण्डः कनकाचलो हरिरभूद्बाणो विधिः सारथिः ।
तूणीरो जलधिर्हयाः श्रुतिचयो मौर्वी भुजङ्गाधिप- स्तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ३॥
त्रिपुरासुर वधाची लीला करताना भगवान शंकरांनी जे विश्वव्यापक रूप धारण केले त्याचा संदर्भ चिंतनात घेऊन आचार्य श्री प्रस्तुत श्लोक सादर करीत आहेत. ते म्हणतात,
क्षोणी यस्य रथो – क्षोणी अर्थात पृथ्वी हाच भगवंताचा रथ आहे.
रथाङ्गयुगलं चन्द्रार्कबिम्बद्वयं – रथाचे दोन अंग म्हणजे त्याची दोन चाके. त्या आधारे रथ चालत असतो. सूर्य आणि चंद्र बिंब हीच भगवान शंकरांच्या रथाची दोन चाके आहेत. यात एक तर त्यांच्या गोल आकाराचा विचार आहे. दुसरा म्हणजे त्यांच्याद्वारे काळ निश्चित होत असल्याने त्याद्वारे पृथ्वीवरील सर्व क्रियांचे संचालन होत असते, पृथ्वीवरील सर्व जीवांची जीवनलीला पुढे जात असते या अर्थाने त्यांना चाके म्हटले आहे.
कोदण्डः कनकाचलो – कनक म्हणजे सोन्याने बनलेला अचल म्हणजे पर्वत. अर्थात मेरू पर्वत. तो पर्वत ज्यांचे धनुष्य आहे.
हरिरभूद्बाणो – भगवान विष्णू हेच त्यांचे बाण झाले आहेत. बाण चालवणाऱ्या इच्छेप्रमाणे जाऊन आपले कार्य करतो, त्याप्रमाणे भगवान विष्णू त्या भगवान शंकरांच्या इच्छेने जगाचे संचालन करतात असा भाव.
विधिः सारथिः – या युद्धात भगवान ब्रह्मदेव हेच या दिव्य रथाचे सारथी झालेले आहेत.
तूणीरो जलधि:- सागर हाच त्यांचा भाता आहे. सागरातील लहरी जशा कधीच समाप्त होत नाहीत तसे ज्यांच्या भात्यातील बाण कधीच संपत नाहीत असा भाव. हया: श्रुति च – श्रुती अर्थात वेद हेच ज्यांची चार अश्व आहेत.
यो मौर्वीभुजङ्गाधिप:- भुजंगाधिप अर्थात भगवान शेषनाग हेच ज्यांच्या धनुष्याची मौवी अर्थात प्रत्यंच्या, दोरी आहेत.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि- त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरणी माझे मन सदैव रममाण होवो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply