येनापादितमङ्गजाङ्गभसितं दिव्याङ्गरागैः समं येन स्वीकृतमब्जसंभवशिरः सौवर्णपात्रैः समम् ।
येनाङ्गीकृतमच्युतस्य नयनं पूजारविन्दैः समं तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ४॥
भगवान शंकरांच्या उपासनेचे, चरित्राची सर्वच साधने लोकविलक्षण आहेत.
सामान्य जीवनात आपण ज्याचा विचार देखील करू शकत नाही अशा गोष्टी भगवान शंकरांच्या ठायी एकवटलेल्या आहेत हे सांगताना भगवान शंकराचार्य स्वामी महाराज म्हणतात,
येनापादितमङ्गजाङ्गभसितं दिव्याङ्गरागैः समं – ज्यांनी भगवान मदनाचे भस्म अंगरागाप्रमाणे अर्थात शरीराला अजित करणाऱ्या एखाद्या पावडर प्रमाणे धारण केलेले आहे असे.
अंग म्हणजे शरीराचे भस्म , चिताभस्म हे इतर वेळी अपवित्र मानले जाते. मात्र भगवान शंकरांचा स्पर्श झाल्यावर ते देखील पवित्र होते. इतर वेळी त्याज्य असणारी ती गोष्ट आभूषण ठरते.
येन स्वीकृतमब्जसंभवशिरः सौवर्णपात्रैः समम् –
अब्ज संभाव म्हणजे भगवान ब्रह्मदेव. ते कमळातून प्रगट झाले आहेत. त्यांचे विश्वाच्या आरंभी असणारे पाचवे मस्तक असत्य भाषण केल्याने भगवान शंकरांनी कापले. ते ब्रह्मकपाल जे सुवर्ण पात्र प्रमाणे हातात धारण करतात. त्यातच अन्नग्रहण करतात.
इतर वेळी जी कवटी त्याज्य असते ती भगवंताच्या स्पर्शा नंतर भोजन पात्र होते. येनाङ्गीकृतमच्युतस्य नयनं पूजारविन्दैः समं – ज्यांनी पूजेतील कमळाप्रमाणे भगवान विष्णूचे नेत्र अंगीकारले आहेत असे. किती सुंदर वर्णन आहे हे?
भगवान श्री विष्णूंचे नेत्र कायम भगवंताच्या चरणी स्थिर झालेले असतात. पूजेचे फुल जसे इतरत्र कुठेही जात नाही तशा अविचल दृष्टीने भगवान विष्णू त्यांच्या चरणाचे ध्यान करतात, असा अतीव दिव्य अर्थ आचार्य श्री व्यक्त करीत आहेत.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि- त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या ठिकाणी माझे मन रममाण होवो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply