आकाशश्चिकुरायते दशदिशाभोगो दुकूलायते
शीतांशुः प्रसवायते स्थिरतरानन्दः स्वरूपायते ।
वेदान्तो निलयायते सुविनयो यस्य स्वभावायते
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ६॥
कोणत्याही श्रेष्ठ व्यक्तीला देखील सर्वगुणसंपन्न असा शब्द आपण सहज वापरतो. भगवंताच्या ठिकाणी तर अशा सर्व सद्गुणांची मांदियाळी च एकटलेली असते.
बरे हे गुण त्यांच्यासाठी काही काळापुरते किंवा दाखवण्यापुरते नसतात. ते त्यांचे स्वरूप असते. अर्थात स्थाई भाव असतात.
अशा गुणांची संख्या अपार आहे. त्यापैकी काही गुणांचा विचार करून आचार्य श्री म्हणतात,
आकाशश्चिकुरायते – आकाश हेच त्यांच्या मस्तकावरील केस आहेत.
दशदिशाभोगो दुकूलायते – दशदिशा हेच त्यांचे वस्त्र आहेत.
अर्थात सर्वत्र तेच परब्रह्म तत्व व्यापलेले आहे. सर्वत्र भगवान शंकरच भरलेले आहेत.
शीतांशुः प्रसवायते- मस्तकावर धारण केलेला चंद्र हेच ज्यांचे आभूषण आहे.
सगळ्या जगाला शांती देणारी गोष्ट ज्यांच्याजवळ सहज विलास करते.
स्थिरतरानन्दः स्वरूपायते – कधीच विचलित न होणारा, परमस्थिर आनंद हे ज्यांचे स्वरूप आहे.
तो त्यांचा आनंद स्वतःसिद्ध असल्याने तो कशाने कमी होत नाही किंवा जास्त ही होत नाही.
वेदान्तो निलयायते – वेदांत अर्थात शास्त्र हेच यांचे घर आहे. त्यामध्ये जे निवास करतात.
सुविनयो यस्य स्वभावायते – सुविनय हा त्यांचा स्वभाव आहे. त्यांच्या प्रत्येक सहज कृतीतून तोच जाणवतो.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरणकमली माझे हृदय सुखाने निवास करो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply