यस्यासन्धरणीजलाग्निपवनव्योमार्कचन्द्रादयो विख्यातास्तनवोऽष्टधा परिणता नान्यत्ततो वर्तते ।
ओंकारार्थविवेचनी श्रुतिरियं चाचष्ट तुर्यं शिवं तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि ॥ ९॥
भगवान श्रीशंकरांच्या अष्टतनुधारी तथा सर्वश्रेष्ठ, तुरीय स्वरूपाचे वर्णन करताना या श्लोकात आचार्य श्री म्हणतात,
यस्यासन्धरणीजलाग्निपवनव्योमार्कचन्द्रादयो विख्यातास्तनवोऽष्टधा परिणता – धरणी म्हणजे पृथ्वी, जल, अग्नी, पवन म्हणजे वायू, व्योम म्हणजे आकाश, सूर्य आणि चंद्र, या सात गोष्टींसह या सगळ्यांचा आनंद घेणारा जीवात्मा, ही भगवान शंकरांची आठ रुपे आहेत. या आठही स्वरूपात भगवान शंकराच प्रगट झालेले आहेत. त्यामुळे त्यांना अष्ट तनूघारी असे म्हणतात.
शास्त्रात भगवान शंकरांच्या आत्मानंदमग्न नटराज स्वरूपाचे जसे वर्णन केलेले आहे तसेच त्यांच्या विश्वव्यापक अष्टतनुधारी स्वरूपाचेही वर्णन केले आहे.
महाकवी कालिदासांनी याच स्वरूपाला नांदीत वंदन केले आहे.
नान्यत्ततो वर्तते – त्यांच्यापेक्षा भिन्न अन्य काहीही नाही. सर्वत्र तेच व्याप्त आहेत. ओंकारार्थविवेचनी श्रुतिरियं चाचष्ट तुर्यं शिवं – ओंकाराच्या अर्थाचे निरूपण करणारी श्रुती तुरीय अर्थात सर्वश्रेष्ठ शिव स्वरूपात ज्यांचे वर्णन करते, अर्थात उपनिषदे ज्यांच्यापेक्षा श्रेष्ठ काही नाही असे स्पष्ट शब्दात सांगते.
तस्मिन्मे हृदयं सुखेन रमतां साम्बे परब्रह्मणि – त्या परब्रह्मस्वरूप भगवान शंकरांच्या चरणकमलाशी माझे मन सुखाने नांदत राहो.
— प्रा. स्वानंद गजानन पुंड
Leave a Reply