एकंदरीतच वृद्धांची अवस्था बघुन मन भरून येते. आपल्या देशात आई-वडिलांना देवासारखा मान दिला जातो. पण काही घरात त्यांना अगदी परक्या सारखी वागणुक दिल्याचे बघुन मन अस्वस्थ होतं. खरच आपण इतके निष्ठूर, बेजबाबदार, असहीस्णू, कठोर, दगडाच्या काळजाचे झालो आहोत का? ज्या आई-वडिलांमुळे देवाने निर्माण केलेले हे सुंदर जग बघण्याचे भाग्य लाभले. तेच आई-वडिल आपल्याला जड व्हावेत यासारखे दुसरे दुर्दैव नाही.
कुटुंबियांसाठी ज्यांनी आपल्या रक्ताचे पाणी केले त्याच घराच्या एका कोपर्यात त्यांना पडलेले पाहून मन दु:खी होते. आई-वडिल अशी आशा करतात की त्यांची मुले म्हातरपणी त्यांचा आधार वाव्हीत. वृद्धांना स्वाभीमानाने फक्त दोन वेळचे जेवण व मुलां-नातवंडांचे प्रेम पाहिजे असते.
१९ ऑक्टोबर, २०१५च्या दैनिक प्रत्यक्षमध्ये घरकुल सदरात कल्पना नाईक यांनी लिहिलेला “हरवलेलं गवसलं” हा वरील दोन परिच्छेदातील विषयाशी मिळताजुळता लेख वाचनात आला. कोकणातील एका दशावतारी कलाकाराच्या वार्धक्याच्या काळात त्याला पेन्शन सुरु झाल्यानंतर त्याच्याशी त्याची सून आणि मुलाच्या वागण्यातील फरक आणि पेन्शन सुरु होण्याआधीची त्याची व्यथा लेखातून खूप सुंदर रीतीने मांडली आहे. कोकणातील दशावतारी कलेची काही वर्षांपूर्वी कशी परिस्थिती होती ते थोडक्यात समजून घेणाचा प्रयत्न करूया म्हणजे कलाकारांच्या व्यथा समजण्यास सोपे जाईल.
भविष्यात दशावतारी कलेचे काय होईल अशी परिस्थिती निर्माण झाली होती. बऱ्याच पूर्वीच्या चळवळींमुळेच आज गावोगावी ही कला आपल्याला पाहावयास मिळते. राज्याने आता या दशावतारी कलावंतांना निवृत्तिवेतन देण्यास सुरवात केली आहे. दर वर्षी यात वाढही होत आहे मात्र ज्या प्रमाणात हे वेतन दिले जाते ते अत्यल्प आहे असे काही जाणकारांचे म्हणणे आहे.
शासनाने या कलेचे कौतुक केले आहे मात्र त्याला मर्यादा पडल्या आहेत. व्यावसायिक नाटके सादर करणाऱ्या संस्थांना तीनअंकी नाटक सादर करण्यास शासन अनुदान देते मात्र दशावतारी कलेला असे अनुदान मिळत नाही. ही कला सादर करताना या कलाकारांसमोर अनेक समस्या असतात. अनेक कलाकारांना जोडून ठेवावे लागते. आगाऊ पैसेही द्यावे लागतात. या सर्व बाबींचा विचार करता शासनाकडून या दशावतारी कलेलाही अनुदान उपलब्ध व्हायला हवे असं काही कलाकारांचं म्हणणं आहे. दशावतार कलेचा अभ्यास करणारी, पाठपुरावा करणारी माणसे नाहीत, असे खेदावे म्हणावे लागते. दशावतारी कलावंत हे हुशार आहेत. कोणत्याही नाट्यशाळेशिवाय, दिग्दर्शनाशिवाय केवळ कलाकार एकत्र येऊन ही कला सादर केली करतात.
दशावतार ही कला चिरतरुण असून, कायम राहणार आहे. आज गावा-गावांत अनेक दशावतारी मंडळे निर्माण होत आहेत. त्यामुळे या कलेला मरण नाही. या कलाकारांचे कौतुक जेवढे व्हायला हवे तेवढे होताना दिसत नाही. शासनाच्या पुरस्कारांची संख्या कमी आहे. ती वाढविणे आवश्यक आहे. ज्या लोककला आहेत, त्यात वरचढ दशावतार ही कला आहे. या दशावताराला तोड नाही.
या लेखाद्वारे सरकारने सुरु केलेल्या लोककलांच्या पेन्शनची माहिती देशातील लोककला जपणाऱ्या कलाकारांना व्हावी हा शुद्ध हेतू ह्यातून स्पष्ट होतो. लाभधारकांना या कलेतून सरकारकडून मिळणारे पेन्शन आणि त्यांच्या संसाराला लागलेला आर्थिक हातभार यामुळे इतरांकडे पैशासाठी हात पसरावयाची पाळी न लागल्यामुळे लोककलेला मिळालेलं स्थैर्य देशातील इतर लोक-कलाकारांना नक्कीच प्रोस्ताहित करणारे आहे.
लेखातील कुमार आणि कंपनीला वाटते की रामलीला सारखी लोककला जपणाऱ्या काही मंडळींना लाभ मिळतो आणि त्यातून त्यांची जिज्ञासा जागी होऊन महाराष्ट्रातील लोककला आणि विशेष म्हणजे कोकणातील दशावतारी कला आणि त्यांची सध्याची कळा याबद्दल ते शोध घेतात.
वरील गोष्टींच्या माहितीने प्रेरित होऊन गोष्टीतील कुमार आणि त्याचे सहकारी मित्र कोकणातील दशावतार या लोककलाकरांना मानधन मिळत का हे बघण्यासाठी ओफिस मधून आठ दिवसांची रजा काढून कोकणात येतात. हे सर्व फक्त कोकणावर आणि दशावतारी कलाकारांवर असलेल्या निस्सीम प्रेमाखातर करत असतात. पुढे या माहितीचा तपशील जाणताना तहसील कार्यालयात चालणारी कामातील अनागोंदी, अंमलबजावणीतील त्रुटी आणि गावकऱ्यांचा शिक्षणातील अभाव जनतेसमोर मांडला आहे. तरीही त्यावर मात करत कुमार आणि कंपनीच्या मेहनतीने गावातील चौदा-पंधरा कलाकारांना पेन्शन सुरु होतं.
या लेखातील सर्वात शेवटचा परिच्छेद मन खूपच हळव करून गेला. कुमार एकदा असाच ऑफिसमध्ये काम करत असताना अचानक एक दिवस एक आजोबा पेढ्याचा पुडा घेऊन येतात. त्यांच्या चेहेऱ्यावर एक वेगळीच समाधानाची लकेर उमटलेली असते. ते सांगतात तुमच्या मेहनतीने आम्हांला पेन्शन सुरु झाले. आम्हांला वर्तमानपत्रातून फोटोसहित प्रसिद्धी मिळाली. पण पेढे देण्याचे कारण सांगताना ते म्हणतात की “बाळांनो तुमच्या मेहनतीने पेन्शन सुरु झालेच पण माझा नातू माझ्या मांडीवर खेळायला लागला. माझी सून मला विचारू लागली. माझा लेक मला हाक देऊ लागला. मला खरंतर कधीच त्यांच्याकडून काहीच नको होतं, पण त्यांना भय वाटत होतं की, आपल्याला बाबांचं करावं लागेल. मी पैसे मागेन म्हणून माझ्याकडे बघायचे पण नाहीत. माझं पेन्शन चालू झाल्यावर त्यांच भय गेलं आणि माझी हरवलेली माणसं मला मिळाली म्हणून पेढे घेऊन आलो”
यातून असे नाईलाजाने म्हणावेसे वाटते की अश्या दशावतारी कालाकावर अशी पाळी का आली? एका वयस्कर पेन्शनरची व्यथा का कुटुंब व्यवस्थेला एक सणसणीत चपराक आहे हा ज्याचा त्यांनी या कथेतून बोध घ्यावा.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply