सोलापूरचे दाते पंचांग कर्ते लक्ष्मणशास्त्री दाते उर्फ ल. गो. उर्फ नानाशास्त्री दाते यांचा जन्म २९ सप्टेंबर १८९० रोजी झाला.
सोलापूरच्या नावलौकिकात ज्यांनी भर टाकली आहे त्यात पंचांगकर्ते दाते यांचे नाव कित्येक वर्षापासून अग्रणी आहे. सोलापूर शहर आणि ‘दाते पंचांग’ यांचा ऋणानुबंध जवळजवळ १०५ वर्षाचा. नानाशास्त्री दाते यांनी सुरवातीच्या काळात वर्षासाठीचं पंचांग काढलं तेव्हा ते पंचक्रोशीपुरतं मर्यादित होतं.
दळणवळणाची साधनं वाढल्यानंतर पंचांगाने पंचक्रोशीची हद्द ओलांडली. त्यातील वेळांच्या कोष्टकाचा उपयोग करून अन्य शहरांसाठीही ते उपयुक्त ठरू लागले. नानाशास्त्री दाते यांनी पंचांग सुरू केलं तेव्हा पंचांगामधील गणितामध्ये एकवाक्यता नव्हती. लोकमान्य टिळक म्हणायचे, पंचांग हे आकाशाचा आरसा असला पाहिजे, लोकमान्यांचं हे विधान नानाशास्त्रींना प्रेरणा देऊन गेले. नानाशास्त्री यांनी १९१६-१७ या वर्षासाठीचं पंचांग काढलं, ते कोल्हापुरातल्या आर्यभूषण प्रेसमधून छापून घेतलं. १०३ वर्षापूर्वी पंचांगकार्याची मुहूर्तमेढ नानाशास्त्री दाते यांनी रोवली. पंचांग बनवताना पंचांगाचे गणित सोडवताना नानाशास्त्री दाते यांची मान आणि कंबर दुखत असे; मग त्यांनी भिंतीवर गणित सोडवायला सुरुवात केली. भिंतीचा कागद केला. नानांचे सुपुत्र धुंडीराजशास्त्री दाते यांनी या कामात लक्ष घालायला सुरुवात केली तेव्हा आधुनिकतेचं पाऊल टाकलं.
लक्ष्मणशास्त्री दाते यांनी लावलेल्या वृक्षाने आज विशाल रूप धारण केले आहे. लक्ष्मणशास्त्री दाते, धुंडीराजशास्त्री दाते, श्रीधर लक्ष्मण दाते यांनी लोकप्रिय केलेले ‘दाते पंचांग’ आता नानाशास्त्री दाते यांचे नातू आणि पंचांगकर्ते धुंडीराजशास्त्री दाते यांचे पुत्र मोहन दाते यांनी आणखी लोकप्रिय केले आहे. १९७७ सालापासून मोहन दाते या व्यवसायात आहेत. मोहनराव दाते यांनी ‘दाते पंचांग’ लोकप्रिय करण्याबरोबरच २००० सालापासून पंचांगाच्या जोडीला पॉकेट पंचांग, कन्नड, हिंदी आणि मराठी दिनदर्शिकेच्या माध्यमातून सर्वत्र प्रसिद्धी मिळविली आहे. हेच पंचांग इंटरनेटचे युग सुरू झाल्यानंतर ग्लोबल झाले अन् आता मोबाइल, अॅप्स् तसेच पेपरलेसच्या जमान्यात दाते पंचांग पर्सनल झाले.
आज पाच लाखाहून इतका खप असलेले ‘दाते पंचांग’ अनेकांच्या जीवनाचा अविभाज्य भाग झाले आहे. भारत सरकारचे ‘राष्ट्रीय पंचांग’ तपासण्यासाठी दाते यांच्याकडे येत असते. मोहन दाते यांचे समवेत त्यांचे पुत्र ओंकार आणि श्रीधर दाते यांचे पुत्र विनय हेही या क्षेत्रात आहेत. पंचांगक्षेत्रात दाते घराण्याचे असे चार पिढय़ांचे योगदान आहे.
लक्ष्मणशास्त्री दाते यांचे २५ जानेवारी १९८० रोजी निधन झाले.
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply