आज माझ्या बाबांनी आयुष्याची ८९ वर्षे पूर्ण केली व त्यांनी नव्वदीत प्रवेश केला.
दत्ता आरेकर म्हणजे कायदा, असेच त्यांच्या बाबत समीकरण आहे.
माझ्या बाबांचे माझ्यावर लहानपणापासून प्रेम आहे. त्यांच्या गळी एखादी गोष्ट उतरवायची असेल तर मला सांगावं, असा समज आहे, तो खराही आहे म्हणा!
बाबा हे नऊ भावंडात चौथे. आमचे आजोबा हे इनामदार होते. त्यांच्या वडलांनी मातीला हात लावला की सोनं व्हायचे व आजोबांनी सोन्याला हात लावला की त्याची चांदी व्हायची असला काही योग होता. मंगळदास मार्केटमध्ये आमचे पैठणीचे दुकान होते, आजोबा एकुलते एक, पण त्यांना तो वारसा धोरणीपणे सांभाळता आला नाही. अर्थात, ते इनामदार लोकांचे पुढारी होते. त्यांना सोनोपंत आरेकर म्हणत. आय सी एस चिनमूलगुंद साहेब त्यांचे मित्र होते. आजोबांचा व विसुभाऊकाकांचा डेक्कन क्वीन गाडीचा पास क्रमांक 1 व 2 होता. ते दररोज सेकंड एक्स्प्रेसने मुंबईला जात व डेक्कनने परतत. समाजसेवा हा त्यांचा पिंड होता, जो त्यांच्या सर्व मुलांत पाझरला. बाळासाहेबकाका हे कळस. त्यांनी स्वतःला लोकसेवेत वाहून घेतले, विसुभाऊकाका मुंबईत नोकरीसाठी गेले. त्यांची खूप भटकंती झाली. एके दिवशी स्थिरावले. मोठी काकू त्यांना, मुंबईत एका जागेवर ठामपणे घेऊन बसली व कर्जतला बाबा! मुंबईला सुरेश बिल्डिंगमध्ये आधी बाबा रहात, त्यांच्याबरोबर प्रभा आत्या असे. आठवणी असं सांगतात की बाबा खूप रसिक होते, शास्त्रीय गाणं अगदी मैफिलीत शरीक होऊन ऐकत, नाटकात काम करत, ललित कला केंद्र त्यांनी काढलेलं. पण हे सारं ऐकीव. आम्ही मुलांनी त्यांचे ते रूप कधी पाहिले नाही.
आजोबांचे घराकडे फार लक्ष नसे, ते आपले त्यांच्या विविध कामात, बाळासाहेब काका राजकारण- समाजसेवेत, मधूकाका गाई गुरात व तबल्यात, मनाकाका, मनुताई आत्या, प्रभा आत्या, लिलू आत्या व रविकाका हे लहान.
मग बाबांनी मुंबई जकात नाक्यावर कारकुनाची नोकरी धरली व कायदा शिकायला गेले. तत्पूर्वी, विसुभाऊकाका व बाबा संघाचे काम करत होते, त्यांना वाडिया कॉलेजने रस्टीकेट केले, नंतर अटकही झालेली. गोळवलकर गुरुजींनी ४२च्या आंदोलनात सहभाग घेण्यास नकार दिल्यावर बाळासाहेब काका व बाबांनी संघाचे काम सोडले. बाळासाहेबकाका स्वातंत्र्य चळवळीत तर बाबा व विसुभाऊकाका घर सांभाळण्याच्या खटपटीला लागले. बाबांबरोबर कर्जतला मनुताई आत्या घर सांभाळत होती, तिला जोड प्रभा आत्याची. लिलू आत्या शिकत होती व रविकाका लहान होता. मुंबईतल्या ब्लॉकच्या तीन खोल्यात कर्जतची येणारी जाणारी माणसं मोठी काकू सांभाळी.
बाबा वकील झाले, व त्यांनी घराची पूर्ण जबाबदारी उचलली. त्यांच्या स्वभावातली उपजत रसिकता त्यांनी मुरडली व मान मोडून काम करू लागले. हातात रोख पैसे खेळू लागले. बहिणींची लग्ने लावावी लागली. दोन्ही भावांनी जबाबदारी नीट पार पाडली. मनुताई आत्या व प्रभा आत्याचे लग्न झाले. त्यासाठी काही जमीन विकावी लागली, असं आजी सांगे. मग बाबांचे लग्न झाले प्रा विलासिनी निमकरशी. आई Willingdon कॉलेज, सांगलीला प्राध्यापक होती. सुरुवातीला तिने नोकरी केली. ईश्वरच्या जन्मानंतर ती सोडली. काही काळाने उल्हासनगरच्या आर के टी कॉलेजला तिला नोकरी चालून आली, पण घरात कोणी नाही, म्हणून तिनं ती नोकरी केली नाही. दोन्ही सुना व भावंडे घरात जुंपली गेली.
वकिली पेशामुळे, बाबांचा स्वभाव कडक बनत गेला. आमच्या दुमजली घरातील जिन्यावर त्यांच्या चपलांचा आवाज आला की, सगळं चुप होत असत. चुकून कधी आजोबा जिन्यात आले की, “सॉरी वकील साहेब” असं म्हणून बाजूला सरत. बाबाही, त्यांच्याकडे एक कटाक्ष टाकून जात. आजोबांनी त्यांच्या जबाबदाऱ्या नीट पाळल्या नाहीत, असा त्यांचा समज होता. दोघांनी आपापलं अंतर जपलं, शेवटपर्यंत. पण, आजोबांना पहाटे अडीच वाजता पाण्याचा शेवटचा घोट त्यांनीच पाजला.
मनाकाकांच्यासाठी आई व बाबांनी बिल्ल्यांचा कारखाना काढला, तो एकदा बंद पडला, मग बाबांनी पुन्हा महाराष्ट्र दौरा काढून त्यासाठी ऑर्डर मिळवल्या, (मग तो जो सुरु झाला तो आजपर्यंत.) नंतर रविकाकाने मनाकाकाना जोड दिली.
मनुताई आत्या व बाबा ही खास जोडी होती. तिने पडत्या काळात घर उभं करायला साथ दिली. परिणामी तिचे लग्न उशीरा झाले. प्रभा आत्या शिकली, शिक्षिका झाली. घर मार्गी लागलं. लिलुआत्याही शिक्षिका झाली.
प्रभाआत्या व बाबांचे वेगळे गुळपीठ होते. तिच्याशिवाय ते चतुर्थीचा उपास सोडत नसत.
बाबांचा सर्वाना वचक वाटत असे. ते चौथ्या क्रमांकाचे असूनही सर्वच त्यांचे ऐकत. (परदेश प्रवासाला जाताना, सर्वात मोठ्या बाळासाहेब काकांनी त्यांना बाप म्हणून खाली वाकून नमस्कार केलेला मी पाहिलाय.) त्यामुळे, ते थोडे आग्रही झाले, खरं तर सारेच वकील असे आग्रही असतात. पण ते जरा जास्त झाले. पण, माझ्या समजुतीप्रमाणे, ते नेहमी आईचे व मोठ्या काकूचे ऐकतात. वासंतीकाकू ही त्यांची जिव्हाळ्याची जागा. तीही त्यांचे लाड पुरवते. लिलूआत्याला मात्र त्यांची माया थोडी कमी मिळाली असावी. सूर्यकांत सावले (मनुताई आत्याचे यजमान) हे खूप कडक होते. ते आल्यावर, “त्यांना नीट सांभाळा” असे बाबा सांगत, पण नाना कुलकर्णी म्हणजे बाबांचा घट्ट मित्र. दोघेही एकच सिगारेट ओढत. बाबांना खरं खुलताना पाहिलं ते नानांबरोबर. त्यांची धमाल चाले. बाबा शिव्या देतात, हे मला नाना आले की कळे. भाई कुलकर्णींच्या कलेबद्दल त्यांना विलक्षण आदर होता. पण त्यांची दोघांची फारशी तार जुळली नाही.
मायाताई, हा बाबांचा विक पॉईंट. ‘मायडू’, म्हणत ते तिला दूध भाताचा घास तयार करून भरवत, ताईचे लग्न झाले तरी. तसा घास आम्हाला कधी मिळाला नाही.
बाकीची भाचवंडे त्यांच्यापासून थोडी दूर राहिली. सविता व प्रसाद हे त्यांचे तसे लाडके. प्रसादवर तर त्यांचे अफाट प्रेम होते. ते त्यांनी कधी व्यक्त केले नाही, पण तो गेल्यावर बाबांनी कित्येक रात्री जागून काढल्या. बाबा सणावाराचे जेवताना आजोबा, आजी, मरण पावलेले सर्व भाऊ, प्रभा आत्या, मनुताई आत्या, प्रसाद यांचा घास बाजूला काढून ठेवतात. नातवंडात ते गुंतले आहेत, पण त्यांच्या routin मध्ये ते येत नाहीत.
ज्याला त्याला ते आपापली space देतात.
एक वकील म्हणून ते महान आहेत. बिल्ला-रंगा-शमसुद्दीन यांचा खटला, करीम लाला-दाऊद इब्राहिम खटला, भिवंडी दंगली चे खटले, International Video Conferencing ची पहिली घटना व तो ऐतिहासिक निकाल, एक ना हजार खटले सांगता येतील. अनेक वकील, न्यायाधीश त्यांना गुरु स्थानी मानतात, अधिकाराची जागा घेण्यापूर्वी त्यांचे आशीर्वाद घ्यायला कर्जतला येतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय. माझ्या लग्नाला उच्च न्यायालयातील न्यायमूर्तींची मांदियाळी आली होती.
मला व ईश्वरला मुंबईत बाबा पहिल्यांदा घेऊन गेले ते मुंबई हाय कोर्टात व ज्या न्यायालयात लोकमान्यांनी गर्जना केली ते न्यायालय व ज्या पायऱ्यावरून त्यांना घेऊन गेले तो चिंचोळा जिना त्यांनी दाखवला होता. आमच्या मुंजीत त्यांनी अष्ट वर्ग म्हणून कर्जत रिमांड होममधील मुलांना जेवायला बोलावलं होतं. मी व माधवी, दोघेही विद्यापीठात अनुक्रमे दुसरे व पहिले होतो, बाबांनी हे लक्षात ठेवून मुंबई विद्यापीठाला शिष्यवृत्ती दिली. ते कायम उपक्रमशील आहेत व नव्याचा ध्यास धरणारे आहेत.
बाबांना वेळ मिळाला की ते वाचतात. सतत वाचतच असतात. स्वयंपाक करायला त्यांना आवडतं. वेगवेगळ्या पद्धती शिकून ते लोकांना आजही आवडीनं खायला घालतात. त्यांची व्हेज बिर्यानी व सुरणाचे काप हा एक हिट आयटम आहे. ते त्यांनीच करावेत.
कोणाचीही काळजी कशी करावी तर ती बाबांसारखी. आईला वयाच्या ४४व्या वर्षी मधुमेह झाला. तो कळायला उशीर झाला. आईच्या हाताची पायाची बोटे ताठच्या ताठ रहात, चालता येत नसे. बाबा तिला जुन्या वाड्याच्या उभ्या जिन्यावरून उचलून खाली आणत. तिचा आजार नक्की झाला व मग बाबांनी तिची अशी काही काळजी घेतली की, आज आई जिवंत आहे ती त्यांच्यामुळेच! त्या दोघांचे सह जीवन अगदी अद्भुत आहे. लागावं एकाला व पाणी दुसऱ्याच्या डोळ्यात यावं! त्या दोघांच्या जगात अगदी, आम्ही मुलांनी आलेलंही त्यांना खपत नाही. बाबांना हृदयविकाराचा झटका आला व हॉस्पिटलमधून ते परतल्यावर त्यांनी आईला वाकून नमस्कार केला, “तुझ्यामुळे मी परतलो”, असे म्हणाले. आईला अर्धांग वायूचा झटका आल्यावर ती स्वतःच्या पायावर कशी उभी राहील हे त्यांनी पाहिलं. त्यात एकदा, आई पडली आणि तिचा आत्मविश्वास हरवला, पण जेव्हा केव्हा बाबा समोर असतात, तेव्हा ती confident असते.
बाबा हा आमचा शक्तीस्रोत आहे. ते अजून अकरा वर्षांनी शंभरी पूर्ण करणार, याची खात्री आहे. माझ्या साठीला आशीर्वाद द्यायला हे दोघे असणार! बाबा, देवाने तुमच्या पोटी जन्म दिला हे आमचे भाग्य. तुमचा वारसा आम्ही कसा चालवतो हे माहीत नाही, पण एवढे नक्की की उतणार नाही, मातणार नाही, घेतला वसा टाकणार नाही.
नीतिन आरेकर
कर्जत
Leave a Reply