नवीन लेखन...

दौर बदलला आहे म्हणून

माना के इस जहाँ को न गुलज़ार कर सके
कुछ ख़ार कम ही कर गए,गुज़रे जिधर से हम
(मान्य आहे या जगाचं नंदनवन नाही करु शकलो पण जिथे कुठे गेलो,तेथील किमान काही काटे तर कमी केले.)

शंभर वर्षांची डेरेदार परंपरा असणाऱ्या समग्र चित्रपटसृष्टीच्या अंतरीची भावनाच साहिरच्या या ओळींतून व्यक्त होते अशी माझी सश्रद्ध धारणा आहे.

सुप्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक बी.आर.चोप्रा ‘कानून’ ही त्याची सर्वश्रेष्ठ कलाकृती मानत आलाय.
मानो बापडा.
त्याने निर्माण केलेल्या कलाकृतींबाबत बोलण्याचा त्याचा किमान इतकातरी अधिकार आपण मान्य करायला हवा.
मात्र गुणग्राही चित्रपटप्रेमींचं (उदा.राजू भारतन,खलिद मोहंमद,शिरीष कणेकर आणि कसचं कसचं) पहिलं नमन त्याच्या “नया दौर”ला आहे.
“नया दौर” मधे विशेष असं काय आहे हे सांगण्यापेक्षा त्यात (फक्त) काय नाही हे सांगणे अधिक सोपं आहे.
“नया दौर”मधे कोणालातरी कोणाच्या नरडीचा घोट घ्यायला उद्युक्त करणारी ‘सूडकथा’ नाही.(उदा. शोले.) अथवा ‘कोण म्हणतो खून केला ?’ च्या अंगाने जाणारा कोर्टरुम ड्रामा नाही.(उदा. चोप्राचाच वक्त.)

त्यात एक तरल,हळुवार प्रेमकथा तर आहेच,पण ती तर यशराज फिल्म्सच्या जवळपास प्रत्येक सिनेमात असते.
त्यात प्रेमाचा त्रिकोणही आहे,पण कधीकाळी शाहरुखच्या दोनपैकी एका सिनेमात तो असायचाच की.
बाकी सारं सोडा राव पण ऱ्हिदमकिंग ओपीच्या ‘यह देश है वीर जवानोंका’ या वीरश्रीपूर्ण गाण्याने सुरु झालेला सिनेमाचा सुरेल संगीतप्रवास ‘मांग के साथ तुम्हारा’ , ‘उडे जब जब झुल्फे तेरी’ , ‘आना है तो आ’ , ‘साथी हाथ बढाना’ , ‘रेशमी सलवार कुडता जालीका’ आणि ‘मै बंबई का बाबू’ अशा सात, बंदया रुपयासारख्या खणखणीत सदाबहार गाण्यांवर संपतो.
तरीही “नया दौर” ही ‘नागिन’ अथवा ‘बैजू बावरा’ प्रमाणे निव्वळ संगीतिका नाही.

सहज जाता जाता….
१९८८ साली आलेला ‘पाप की दुनिया’ (‘जवा नविन पोपट हा’ चालचोर फेम) ही एक सांगीतिक प्रेमकथा आहे हे कळल्यावर माझ्या उरणच्या सिनेरसिक आत्याला भोवळच आली होती.
(‘पतिता’मधील तलतचं ‘अंधे जहॉं के अंधे रास्ते’ ऐकवल्यावर ही शुद्धीवर आली असं आमचे आतोबा आल्यागेलेल्याला सांगायचे.)

चित्रपटाची बांधेसूद पटकथा,चपलख संवाद,अप्रतिम दिग्दर्शन,बहारदार संगीत, सर्वच मुख्य व सहाय्यक कलाकारांचा सरस अभिनय व एकंदरीतच चित्रपटातील प्रसन्न वातावरण यावर भरभरुन बोलता आणि लिहिता येईल.(आणि लिहिणार आहेच मी. सोडतो की काय ?)
पण मग या सिनेमाचं वेगळेपण नेमकं कशात आहे ?

चित्रपटाच्या सुरुवातीलाच गांधीजींचं एक विधान येतं.
” मानवी श्रमांचे विस्थापन करणाऱ्या आणि काही ठराविक कुटुंबांत आर्थिक शक्ती केंद्रित करणाऱ्या यंत्रसामुग्रीला भारतीय संस्कृतीत स्थान नाही.उलट यंत्रांनी भारतातील सात लाख खेड्यांमध्ये विखुरलेल्या करोडो श्रमिकांच्या प्रयत्नांना मदत करुन त्यांचे जीवन अधिक सुसह्य करणे अपेक्षित आहे.”
आणि हाच या सिनेमाचा आत्मा आहे.बाकी सारं तदनंतर.

चित्रपटात माणूस विरुद्ध मशिन असा झगडा तर केंद्रस्थानी आहेच पण त्यात श्रमसंस्कृतीचे महत्वही अधोरेखित केलेले आहे.
यात तंटामुक्त गावाचा हुंकार आहे पण सोबत जातीय सलोख्याचा विचारही आहे.
चित्रपटाला ‘गाव करील ते राव काय करील ?’ या उक्तीची धार आहे आणि हुंडाविरोधाची किनारही आहे.

गीतकार साहिरचा राजकीय लाल रंग काही कधीच लपून राहिलेला नव्हता.
त्याचा शोधपत्रकार (जॉनी वॉकर) उघडच म्हणतो…”आया हू मै बंधू रुस और चीन मे जाके !”
म्हणजेच तो रशियाला जाऊन जगातील पहिले कामगारांचे, कामगारांनी, कामगारांच्या हितासाठी चालविलेले सरकार बघून आलेला आहे.
मात्र ‘नया दौर’ आला त्याच वर्षी (१९५७) लोकशाही मार्गाने निवडुन आलेले जगातील पहिले कम्युनिस्ट सरकार ई.एम.एस.नंबुद्रीपाद यांच्या नेतृत्वाखाली केरळमध्ये स्थापन व्हावे या निव्वळ योगायोग असावा.
(इंदिरा गांधींच्या बालहट्टापायी पंडित नेहरुंनी आपल्या मनाविरुद्ध १९५९ साली नाईलाजाने ते बरखास्त केले.)

सिनेमातील खलनायक कुंदन (जीवन) हादेखील हिंदी सिनेमात दिसणारा टिपीकल खलनायक नाही.
नायिकेवर पापी नजर ठेवत नाही तो कसला बुळचट खलनायक ?
पण खरं तर आपला व्यवसाय वाढवायच्या खटपटीत नायिकेकडे किंवा गावातील इतर स्त्रियांकडे पहायला त्याला फुरसतच नाही.
(सहज जाता जाता…… नायिका व खलनायकाला एकमेकांसमोरही न आणणारा ‘नया दौर’ हा दुसराच व शेवटचा सिनेमा असावा.
१९५१ च्या ‘तराना’मधे नायिका मधुबाला व खलनायक गोप हे चित्रपटाच्या एकाही फ्रेममध्ये एकत्र दिसत नाहीत.)

कुंदन हा शहरात शिकून सवरुन आल्यामुळे त्याच्यावर औद्योगिकरणाचा जबरदस्त पगडा आहे.फक्त डोळ्यावर यंत्रप्रेमाचा जाड पडदा आल्यामुळे त्याच्या सामाजिक जाणिवा किंचित बोथट झाल्या आहेत व त्यावर भांडवलशाहीची धूळ जमा झाली आहे इतकंच.

जॉर्ज फर्नांडिस मुंबईचा अनभिषिक्त ‘बंद’सम्राट असताना एकदा मुंबई महानगरपालिकेत यांत्रिक झाडूचा प्रस्ताव आला होता.
त्याला विरोध करताना जॉर्ज म्हणाला ‘ज्या देशांत मनुष्यबळाची कमतरता आहे त्यांना हे ठीक आहे.
पण आपल्या देशात विपुल मनुष्यबळ असताना आणि मागितलेल्या हातांनाच काम मिळत नसताना सरसकट यंत्रांची गरज काय ?’
सिनेमात नायक शंकर कुंदनला क्रोधाने ऐकवतो ….”झगडा तो हाथ और मशिनका है बस !”

जॉर्जची आणि शंकरची जातकुळी एक नाही असं कोण म्हणेल ?
त्यावेळेस जॉर्जचा आणि कामगारांचा टोकाचा विरोध पाहून हा प्रस्ताव बासनात गुंडाळला गेला.
पण एकेकाळी साक्षात दुर्गा इंदिरा गांधींना , भर कोर्टात, हातातील बेड्या खळखळवत, ‘आप मुझे इन जंजिरोंमे बांध सकती है, मगर इस देश को नही !’ असं ठणकावणारा जॉर्ज जागतिकीकरणाच्या रेट्यानंतर परिघाबाहेर फेकला जाऊन कालौघात बाद ठरणार हे तर उघडच होतं.

‘शंकर, मुकाबले के वक्त हमारी लाशपरसे टांगा निकालके लेके जाना !’ असं सांगणारा सामान्य गावकरी आणि बायकोच्या कपाळावरचं कुंकू पुसून नव्हे पण पुसल्यागत डॉ.सामंतांच्या लढ्यात सहभागी होणारा गिरणी कामगार यांच्यात डावं-उजवं करणं मला तरी अशक्य आहे.

चित्रपट वेगाने शेवटाकडे धावत असताना कुंदनच्या तोंडून शापवाणी येते….”मशिनोंका एक रेला उठेगा और तुम सब कुचलके रख दिये जाओगे !” अडीच तास थिएटरच्या काळोखी कोपऱ्यात दबा धरुन बसलेली उलट्या काळजाची नियती तात्काळ आपला डाव साधते आणि निर्लज्जपणे ‘तथास्तु’ म्हणून मोकळी होते.

“आजतक आदमी मशिने बनाता आ रहा है,मशिनने किसी आदमी को नही बनाया !”
या भरतवाक्यावर चित्रपट संपतो आणि अंधाऱ्या वास्तवाची जाणीव करुन देणारे थिएटरमधील प्रखर दिवे लागतात.

आज गावोगावी, दिशाहीन तरुण बेकारांचे तांडे खांद्यावर वेगवेगळ्या रंगांचे झेंडे घेऊन स्वार्थी व भ्रष्ट नाना,भाई आणि दादांच्या मागून फरफटत जाताना पाहून बलदेव राज चोप्राची (१९१४-२००८),अहंकारी कुंदनच्या बसपुढे आपला टांगा घेऊन जाणाऱ्या त्याच्या जिगरबाज शंकरची आणि प्रवाहाविरुद्ध पोहोणाऱ्या झुंजार जॉर्ज फर्नांडिसची तीव्रतेने आठवण येते आहे.

पार्श्वभूमीवर मला साहिरचाच ‘फिर सुबह होगी’मधील आशावाद ऐकू येतोय….. तुम्हाला येतोय का ?

जब एक अनोखी दुनिया की बुनियाद उठाई जाएगी
उस सुबह को हम ही लाएँगे,वो सुबह हमीं से आएगी
वो सुबह कभी तो आएगी….

संदीप सामंत.
९८२०५२४५१०.
१२/०२/२०२२.

Avatar
About संदीप सामंत 18 Articles
संदीप सामंत हे फेसबुकवरील लोकप्रिय लेखक आहेत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..