दवाचा शिंपीत सडा,
पहाट उमलत आली,
खेळ संपता तमाचा
पृथ्वीवर बागडू लागली,–!!!
पाने सारी भिजता,
झाडांना निराळी टवटवी,
रंग उठून दिसता,
वाटते विलक्षण तरतरी,–!!!
रस्ते थोडे भिजता,
अवनीला येई तरारी,
येऊ घातला भास्करराजा,
आंस तिच्या किती उरी,–!!!
भिजत्या भिजत्या पाकळ्या, थेंबांचे डंवरती मोती,
रंगीबेरंगी नाना फुलांना,
कसा मस्त उठाव देती,–!!!
पाकळी – पाकळी फुलता, कळीकळी ओलावली,
ऐट दाखवत पहा जगा,
कशी पानाआड मुसमुसली,–!!!
पहाटे संगे भणाणे वारा,
थंडी कशी गुलाबी,
रंग घेत उषेचा सारा,
पहाट मनसोक्त नाचली,–!!!
किरणांची आता किमया,
वसुंधरा तेजाळू लागली, अंधाराच्याच मुशीतुनी,
सोनेरी सकाळ उगवली,–!!!
©️ हिमगौरी कर्वे.
Leave a Reply