सक्काळी दार उघडलं आणि अंगणातील झाड खाली झुकून म्हणालं – ” हाती येतील तेवढी फुले खुशाल खुडून घे. वृथा उड्या बिड्या मारून उंचावरची तोडायचा प्रयत्न करू नकोस. ती राहू दे माझ्या अंगावर ! थोडं फुललेलं झाड छान दिसतं मग दिवसभर ! ”
सोसायटीच्या गेटवरचा नवा वॉचमन हसून स्वागत करता झाला आणि त्याने अदबीने बॅरिकेड वर केलं. मीही त्याला ” काय म्हणतंय धुकं आणि थंडीची रात्र कशी गेली ? ” असं विचारलं. त्याने होकारात मान हलवली.
मंदिराच्या वाटेवर फळवाला दिवसासाठी फळांची रचना करीत होता. त्यानेही रामराम केलं. कोरोनाने हिरावलेलं त्याच्या आणि त्याच्या व्यवसायाच्या चेहेऱ्यावरचं हसू हळूहळू परतत होतं.
आरतीनंतर एक अनोळखी गृहस्थ जवळ येऊन माझी व्यक्तिगत चौकशी करू लागले- अगदी अहेतूक!
घरी आलो तर भ्रमणध्वनीवर एक अपरिचित क्रमांक.
” सर, मी ——- बोलतोय. आज सकाळी रेडिओवर ——— या विषयावर एक व्याख्यान आहे. म्हटलं हा विषय तुमच्या अभ्यासाचा आणि आवडीचा आहे म्हणून ——— सरांकडून तुमचा नंबर मिळविला. शक्य असेल तर जरूर ऐका.”
मी ते व्याख्यान ऐकलं आणि त्यांना आभाराचा संदेश आठवणीने पाठविला.
नंतर ग्रंथालयात गेलो तर त्यांनी आठवणीने माझ्यासाठी बाजूला ठेवलेला दिवाळी अंक हाती दिला. कधीतरी मी चौकशी केलेली आणि विसरून गेलो होतो.
काही मित्र-मैत्रिणी ठरवून भेटलो आणि दिलखुलास गप्पा झाल्या.
सकाळपासून निर्हेतुक बरसणारे दव जगरहाटीनुसार हळूहळू वाढत्या सूर्यप्रकाशात दिसेनासे झाले पण मनात जाऊन दडले.
— डॉ. नितीन हनुमंत देशपांडे
Leave a Reply