दया प्रेम हे भाव मनी,
जागृत कर तू भगवंता ।
तुला जाणण्या कामी येईल,
हृदयामधली आद्रता ।।१।।
शुष्क मन हे कुणा न जाणे,
धगधगणारे राही सदा ।
शोधत असता ओलावा हा,
निराश होई अनेकदा ।।२।।
पाझर फुटण्या प्रेमाचा ,
भाव लागती एकवटूनी ।
उचंबळणारे ह्रदय तेथे,
चटकन येईल मग दाटूनी ।।३।।
दया प्रेम या भावांमध्ये,
दडला आहे ईश्वर ।
मनांत येता हेच भाव ,
घडवी त्याचे दर्शन ।।४।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply