नवीन लेखन...

दयार्द्र पिलू

“भरुनी राहिलीस तूच माझिया नेत्रांमधुनी
       निद्रेमधुनि, स्वप्नामधुनी, जागृतीतुनी
कळले आता असून डोळे नव्हती दृष्टी नव्हते दर्शन
इतुके आलो जवळ जवळ की जवळपणाचे झाले बंधन”
कविवर्य मंगेश पाडगावकरांच्या एका अप्रतिम प्रणयी कवितेतील काही ओळी. अर्धोन्मिलित अवस्थेत असताना, निद्रीस्तावस्थेत जाणवणाऱ्या मुग्ध प्रणयाची सुंदर छटा आपल्याला या ओळींतून प्रतीत होते.
आदल्या रात्रीच्या जागरणाने डोळ्यांवर गुंगी यावी पण झोप दूर असावी, आसमंत निरव शांत असावा, आकाश निरभ्र असावे आणि कानावर “पिलू” रागाचे स्वर यावेत!! आपोआप डोळे मिटण्याची क्रिया सुरु होते. पिलू रागच असा आहे,, स्वर ऐकताना मनावर गुंगीचे साम्राज्य पसरते. “रिषभ” वर्जित स्वर (आरोही सप्तकात) परंतु “गंधार”,”मध्यम” आणि “निषाद” दोन्ही प्रकारे लागतात. “धैवत” स्वराचा किंचित वापर. शास्त्रात हा राग “औडव-संपूर्ण” असा दर्शविला आहे आणि तो केवळ, या “धैवत” स्वराच्या स्पर्शाने!! “गंधार” आणि “निषाद” हे वादी-संवादी स्वर. अर्थात हा झाला रागाचा  तांत्रिक भाग. रागाचे स्वर आणि लिपी कितीही अर्थवाही असली तरी त्याला एक ठराविक मर्यादा असते. म्हणजे ज्यांना स्वरज्ञान आहे, त्यांनाच ही भाषा समजून घेता येते अन्यथा इतरांना ही भाषा अगम्य असते. खरतर पिलू रागाचे “टेक्श्चर” बघायला गेले तर इथे प्रणय, करुणा, भक्ती समर्पण इत्यादी सगळ्या भावनांचा कल्लोळ ऐकायला मिळतो.
गमतीचा भाग असा आहे, हा राग फारसा मैफिलीत गायला जात नाही म्हणजे जसे यमन, भूप हे राग सलग तासभर आळवले जातात, तशा प्रकारचे सादरीकरण या रागाचे होत नाही, बहुतांशी, ठुमरी, दादरा, होरी अशा उपशास्त्रीय संगीत प्रकारातून हा राग मांडला जातो. अर्थात, चित्रपट गीत आणि भावगीत, यांत मात्र अपरिमित पसरलेला आहे.
बेगम परवीन सुलताना यांची एक रचना आहे. “तुम राधे बन श्याम” ही रचना राग पिलू रागात बांधलेली आहे. बेगम साहिबांचा आवाज म्हणजे तानेला कुठेही अटकाव म्हणून नाही. तरीही तार सप्तकात अधिक आनंद घेणारी गायकी. ज्या सहजतेने, ताना आणि त्याच्या जोडीने हरकती येतात, ते खास ऐकण्यासारखे आहे. एकतर तार स्वरात सहज जाणे, हीच गळ्याची एक कसोटी मानली जाते पण इथे तर, तार स्वरात जाताना आणि तिथे ठेहराव घेताना, त्यालाच जोडून एखादी हरकत घेण्याची असामान्य करामत करण्याची क्षमता थक्क करते. या रागात आणखी एक मजा आढळून येते. मैफिलीत हा राग, फारसा गायला जात नाही, वादक मात्र वाजवताना आढळतात. अर्थात केवळ तार सप्तकात गायन करणे, इतकीच या गायिकेची खासियत नसून, मंद्र सप्तकात तसेच शुद्ध स्वरी सप्तकात, स्वरांचे तितकेच विलोभनीय दर्शन आपल्याला घडते. स्वरांवर घट्ट पकड पण तरीही गायनात मृदुपणा आणायचा, गाताना लयीच्या अंगाने ताना किंवा बोलताना घ्यायच्या अशी काही खास वैशिष्ट्ये सांगता येतील.
इथे आपण उस्ताद बडे गुलाम अली खान साहेबांची या रागातील एक रचना ऐकुया. उस्तादांचा लडिवाळ स्वर तसेच सगळ्या सप्तकात सहज फिरणारा गळा, त्यामुळे ही रचना केवळ संस्मरणीय झाली आहे. क्षणात मंद्र सप्तकात तर पुढल्या क्षणी तार सप्तकात जाउन, परत समेवर ठेहराव घेण्याची पद्धत तर लाजवाब!! “सैय्या बोलो” ही रचना म्हणजे पिलू रागाची ओळख, इतकी प्रसिद्ध रचना झाली आहे, ती काही उगीच नव्हे. उस्तादांच्या गायकीची सगळी वैशिष्ट्ये या सादरीकरणात ऐकायला मिळतात. या रचनेतील, हरकती तर इतक्या विलोभनीय आहेत की प्रत्येक वेळेस, फार बारकाईने ऐकाव्या लागतात. तेंव्हाच स्वरांचा “डौल” समजून घेता येतो. “पतियाळा” घराण्याची सगळी सगळी “खासियत” या गायनातून स्पष्टपणे ऐकायला मिळते.
आत्ता मी ज्या गाण्याबद्दल लिहिणार आहे,ते एकूणच “पिलू” रागाच्या स्वभावात बसणारे नाही. “ऐ मेरी जोहराजबी” हे “वक्त” या चित्रपटातील गाणे.  खरतर हीच खासियत, सुगम संगीताची आहे. रागातील एखादी हरकत,  एखादा स्वर, संगीतकाराला नेमका भावून जातो आणि गाण्याची “तर्ज” निर्माण होते. त्यामुळेच गाण्याची चाल आणि त्याचे “मूळ” शोधणे, बरेचवेळा आवाक्याबाहेरचा शोध होतो. मुळात, मन्ना डे यांचा अत्यंत सुरेल स्वर आणि त्याला मिळालेली कव्वालीबाजाची चाल. त्यामुळे हे गाणे फारच सुरेख जमून गेलेले आहे. गाण्याच्या पहिल्या आलापीतील हुंकारापासून हे गाणे सुंदरपणे “चढत” जाते. प्रत्येक स्वर खणखणीत, सुरेल आणि योग्य त्या शब्दावर अचूक वजन, त्यामुळे कव्वाली असली तरी अतिशय खेळकर रचना होऊन जाते. वास्तविक “कव्वाली” सारखी रचना बहुतांशी द्रुत लयीत चालत असते. अशा प्रकारच्या रचनेत रागाची लक्षणे शोधणे तसे फार दुरापास्त असते आणि एका दृष्टीने विचार केल्यास, तशी लक्षणे शोधणे व्यर्थ असते.
लगान चित्रपटातील गाणे आहे. गाण्याचा बाज, लोकसंगीतावर आधारित आहे. तसे थोडे बारकाईने बघितले तर, पिलू रागात, चैती, ठुमरी, होरी किंवा पुरबी सारख्या असंख्य रचना ऐकायला मिळतात. एका दृष्टीने बघितल्यास, चैती, पुरबी किंवा होरी, ह्या सगळ्या उत्तर भारतातील लोकसंगीतातून पुढे शास्त्रीय स्वरूपात, स्थानापन्न झालेल्या आहेत. त्यामुळे, पिलू रागात, या रचनांचा “मूलस्त्रोत” सापडणे साहजिक आहे. अर्थात, गाण्याची चाल रेहमानची आहे आणी अर्थात, त्याच्या प्रकृतीनुसार गाण्याची  बांधणी केली आहे. सुरवातच लोकसंगीताच्या आधारावर झाली आहे. गाण्यात, रेहमान, अलका याज्ञिक, उदित नारायण, सुखविंदर सिंग, शंकर महादेवन असे दिग्गज आवाज आहेत. गाण्याच्या पहिल्या अंतऱ्यानंतर पिलू रागाची सावली ऐकायला मिळते.
गाणे केरवा तालात आहे पण तालाचे वादन अगदी अनोखे आहे. वास्तविक आपण, भारतीय ताल म्हणजे पारंपारिक तबला नजरेसमोर ठेऊन अदमास घेत असतो परंतु संगीतकार , जर व्यासंगी, अभ्यासू असेल तर, गाण्यात वेगवेगळे प्रयोग करत असतो आणि या गाण्यात रेहमानचे हेच वैशिष्ट्य ऐकायला मिळते. साधारणपणे समूह गीत म्हटले की वैय्यक्तिक गायकीला अवसर कमीच मिळतो पण इथे संगीतकाराने त्याची योग्य ती काळजी घेतली असल्याने गाणे श्रवणीय होते.
पिलू रागातील हे आणखी असेच आनंददायी गाणे. चित्रपटातील प्रसंग ध्यानात घेऊन, त्यानुरूप गाण्याची रचना  करण्यात, जे फार थोडे संगीतकार आहेत, त्या यादीत एस. डी. बर्मन यांचा  क्रमांक लावावा लागेल. विशेषत: हाती असलेली चाल, फुलवायची कशी याचे असामान्य भान या संगीतकाराकडे होते त्या दृष्टीने, हा  संगीतकार,हाडाचा चित्रपट गीतांचा संगीतकार होता, असे म्हटले तर फारसे वावगे ठरू नये. आता “अब के बरस” हे “बंदिनी” चित्रपटातील गाणे बघा. सुरवातीला किती लडिवाळ आलाप आहे आणि हा हा जो आलाप आहे, तों शब्दांना जोडून घेतलेला आहे. आशा भोसले यांच्या गायनाची साक्ष देणारे गाणे. त्यातूनच पिलू रागाचे सूचन होते. पुढे चाल वेगळी सरते आणि स्वतंत्र जन्म घेते, हा भाग वेगळा. गाण्यातील सतारीची गत देखील फार वेधक आहे. गाणे तसे ठाय लयीत सुरु होते पण, पुढे चाल विस्तारित होताना, लय देखील त्याच ठाय लयीत बदल घेते आणि पार्श्वभागी असणारा वाद्यमेळ देखील. अर्थात असे कितीही वेगवेगळे बदल झाले तरी समेवर येताना, जो सूर पकडून गाणे परतते, तो भाग विलक्षण सुंदर आहे. वास्तविक गाण्यावर बंगाली लोकसंगीताचा ठसा आहे, गाणे अतिशय विरही, व्याकूळ करणारे आहे परंतु चाल कुठेही रेंगाळत नाही.
गाण्याची जी प्रकृती आहे, ती प्रकृती उत्तरोत्तर अधिक दाट होत जाते आणि ही किमया आशा भोसल्यांच्या गायनाची. अर्थात, संथ लयीच्या गाण्यांना असा एक फायदा नेहमी मिळतो. चाल लगेच मनात उतरत नाही पण जेंव्हा चालीचे मर्म ध्यानात येते त्यावेळी, ती चाल मनात खोलवर रुतून बसते. अशी गाणी कधीच मन:पटलावरून नाहीशी होत नाहीत. हा लोकसंगीताच्या गोडव्याचा भाग देखील म्हणता येईल.
आता पर्यंत आपण या रागाची काही रूपे बघितली, काही रागाच्या स्वरावलीशी थोडे फटकून तरीही श्रवणीय रचना ऐकल्या. या लेखाच्या सुरवातीला, मी म्हटले होते, या रागाचे स्थूल स्वरूप हे शांत, रमणीय असे आहे. प्रणयी भावना या रागात फार खुलून येते. अशीच अतिशय शांत आणि केवळ अजोड रचना म्हणावी, असे एक गाणे ऐकणार आहोत. ही गाणे म्हणजे हिंदी चित्रपट संगीतातील अंगाईगीतातील “मानदंड” आहे आणि आज इतकी वर्षे झाली तरीही या गाण्याची खुमारी रतिभर देखील ओसरत नाही. गाण्यातील, लय, गोडवा इतका अश्रूत आहे की, आपणही या गाण्यात कधी गुंगून जातो, याचा पत्ताच लागत नाही.
“धीरे से  आजा री अखियन मी निंदिया” हेच ते अजरामर गाणे. या गाण्याचा ठेका – दादरा आहे पण, तालाचे बोल आणि वापर किती वैशिष्ट्यपूर्ण आहे बघा. अंगाईगीत आहे तेंव्हा गाण्याचा ताल देखील डोक्यावर हळुवार थोपटल्यासारखा आहे, जेणे करून झोपी जाणारी व्यक्ती विनासायास झोपेच्या आधीन होईल. गाण्याचे शब्द देखील सहज, सुंदर, कुणालाही कळण्यासारखे आहेत. “निंदिया” आणि “निन्दियन” या शब्दातील श्लेष बघण्यासारखा आहे. पिलू राग किती अप्रतिम आहे, याचे हे गाणे म्हणजे अप्रतिम उदाहरण ठरेल. तसे पाहिले तर, पिलू रागाचे स्वर, चलन हे, या गाण्यापासून फारकत घेणारे आहे पण तरीही नाते जोडणारे आहे. चाल, गायन, वाद्यमेळ या सगळ्याच दृष्टीने हे गाणे अभ्यासनीय आहे.हिंदी चित्रपट गीतांतील हे गाणे खऱ्या अर्थाने अजरामर गाणे.
पिलू रागाची आणखी एक वेगळी ओळख आपल्याला “मैने शायद तुम्हे पहले भी कभी” या गाण्यातून घेत येईल. “बरसात की रात” या चीत्रापातैल हे गाणे संगीर्कार रोशन यांनी स्वरबद्ध केले आहे. या गाण्यात मात्र पिलू रागाची बऱ्याच अंशी ओळख मिळते परंतु तरीही रागापासून दूर जाउन देखील, रागाशी नाते राखण्याची प्रशंसनीय क्षमता, रोशन यांच्या रचनेतून नेहमी आढळते. मोजकीच वाद्ये पण तरीही वाद्यातून निरनिराळे स्वनरंग पैदा करण्याचे कौशल्य. या गाण्यात आणखी एक मज आहे. गाण्याची सम किंचित वेगळ्या स्तरावर केली आहे, म्हणजे जर का लयीच्या अंगाने गाणे ऐकायला घेतले तर जिथे “सम” येईल असे वाटत असते, तिथे न घेता, पुढील शब्दावर घेऊन, गाण्यात वेगळाच रंग निर्माण केला आहे. रोशन यांची प्रकृती मुळातच अति शांत, संथ रचना करण्याकडे असल्याने, इथे देखील जरी प्रणयी ढंगाचे गाणे असले तरी प्रेमाची वाच्यता, भर मैफिलीत करीत असल्याने, तिथे संयत भावना आवश्यक असते आणि तोच भाग या गाण्यातून दिसतो आणि हा संयत, मुग्ध प्रेमाचा भाव दर्शविण्यासाठी पिलू रागाने अनंत छटा आपल्याला बहाल केलेल्या आहेत.
— अनिल गोविलकर

Avatar
About अनिल गोविलकर 92 Articles
मी अनिल गोविलकर. उभरता लेखक असे म्हणता येईल. माझा ब्लॉग आहे – www.govilkaranil.blogspot.com ही वेबसाईट आहे. या वर्षी, माझ्या ब्लॉगला ABP माझा स्पर्धेत २रे पारितोषिक मिळाले आहे. तसेच "रागरंग" नावाचे पुस्तक – रागदारी संगीतावरील ललित आणि तांत्रिक, लेखांवर आधारित- प्रसिद्ध झाले आहे. मी १९९४ ते २०११, दक्षिण आफ्रिकेत नोकरीनिमित्ताने वास्तव्याला होतो. त्याचा परिणाम म्हणून त्या देशावरील ललित लेख – जवळपास ३५ ते ४० लेख लिहिले आहेत तसेच संगीतावर आधारित ( जागतिक स्तरावरील संगीत) १०० पेक्षा जास्त लेख लिहून झाले आहेत. काही आवडलेल्या पुस्तकांची परीक्षणे लिहिली आहेत .

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..