MENU
नवीन लेखन...

मालगुडीचे दिवस

मला लेखक फार आवडतात, मग त्यांची भाषा कोणतीही असो. १९०६ साली चेन्नईमध्ये एका मोठ्या कुटुंबात नारायणचा जन्म झाला. त्याला एक भाऊ व सहा बहिणी होत्या. वडील शिक्षक होते. हा आजीचा अतिशय लाडका नातू. त्याला रोज ती नवीन गोष्टी सांगून झोपवत असे. त्या इंग्रजी राजवटीच्या काळात बालपणी त्यानं जे पाहिलं, अनुभवलं तेच त्याच्या लेखनातून कागदावर उतरलं…
शिक्षण पूर्ण झाल्यावर त्याने शिक्षकाची नोकरी धरली, परंतु त्यात त्याचं मन काही रमलं नाही. त्याला लिहिण्याचा छंद होता, तोच त्याने उपजिविका म्हणून स्वीकारला. शिक्षण पूर्ण झाल्यावर, वयाच्या एकोणतीसाव्या वर्षी आपल्या पहिल्या कादंबरीचं बाड भारतात कोणीही प्रकाशित करीत नाही म्हणून त्यानं ते इंग्लंडला मित्राकडं पाठवलं. तिथे सुद्धा मित्राला प्रकाशक भेटत नाही म्हटल्यावर, नारायणने ते हस्तलिखित थेम्स नदीत त्याला बुडवायला सांगितलं.. शेवटच्या क्षणी ते हस्तलिखित ग्रैहम ग्रीनच्या हातात गेलं. त्यानं ते वाचून काढलं आणि त्याच्यासाठी प्रकाशक शोधून ते प्रकाशित केलं.
त्या ‘स्वामी अ‍ॅण्ड फ्रेण्डस्’ पुस्तकाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. तेव्हा या लेखकाच्या रासीपुरम कृष्णास्वामी अय्यर नारायणस्वामी या मोठ्या नावाचं ‘आर. के. नारायण’ असं छोटं नाव केलं गेलं, जे आज भारतातील उत्कृष्ठ लेखकांच्या श्रेयनामावलीत अग्रेसर आहे..
ग्रैहम ग्रीननं आर. के. नारायण यांची चार पुस्तके प्रकाशित केली. ‘दि बॅचलर ऑफ आर्टस्’, ‘दि इंग्लिश टिचर’ यांचाही समावेश त्या पुस्तकांत आहे. त्या काळातील भारतातील तीन सुप्रसिद्ध इंग्रजी साहित्यिकांमध्ये आर. के. नारायण यांचा समावेश होता.
आर. के. नारायण यांनी मालगुडी या काल्पनिक गावाच्या पार्श्र्वभूमीवर अनेक कथा लिहिल्या. त्यामध्ये गावातील सर्वसामान्य अशा अनेक व्यक्तीरेखा घेऊन त्यांच्या जीवनातील चढ-उतार, आशा-निराशा, आनंद-दुःख, राग-लोभ अप्रतिमरित्या रेखाटले.
या ‘स्वामी अ‍ॅण्ड फ्रेण्डस्’ या पुस्तकावर आधारित ‘मालगुडी डेज’ ही टीव्ही सिरीयल फार गाजली. स्वामी हा दहा वर्षांचा मुलगा, त्याचे शाळेतील मित्र, शिक्षक, वडील, आजी, शेजारी-पाजारी यांच्याभोवती प्रत्येक कथानक फिरत रहाते.. त्यासाठी त्यांनी कल्पनेतले मालगुडी गाव उभे केले. दिग्दर्शक शंकर नाग, स्वामीच्या वडिलांचे काम करणारे गिरीश कर्नाड, इत्यादी कलाकारांनी ही मालिका साकारली.
आर. के. नारायण यांच्या ‘द वेंडर ऑफ स्वीट्स’ या कादंबरीवरुन ‘मिठाईवाला’ ही टेलिफिल्म तयार केलेली आहे. यामध्ये अनंत नाग याने वडिलांचे काम केलेले आहे. यु ट्युबवर ही फिल्म उपलब्ध आहे..
असंख्य वाचकांनी आर. के. नारायण यांचे साहित्य अक्षरशः डोक्यावर घेतले. त्यांच्या पुस्तकांचे अनेक भाषेत अनुवाद झाले. १९५८ साली त्यांनी लिहिलेल्या ‘दि गाईड’ या कादंबरीला ‘साहित्य अकादमी’चा पुरस्कार मिळाला. सात वर्षांनंतर याच कादंबरीवर आधारित ‘गाईड’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.‌
भारत सरकारने त्यांना पद्मभूषण व पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले. १९८९ साली त्यांच्या साहित्यातील योगदानाबद्दल राज्यसभेचे मानद सदस्यत्वही बहाल केले.
२४ मे २००१ रोजी, काल्पनिक मालगुडी हे खेडेगाव व त्यातील अनेक तऱ्हेवाईक व्यक्तीरेखा घराघरात पोहचविणारा लेखक अनंतात विलीन झाला..
आजही कधी ‘मालगुडी डेज’ची ट्युन कानावर पडली की, आर. के. नारायण आठवतात.. त्यांचा मला दहावीला असताना ‘फोर रुपीज’ हा धडा इंग्रजी पाठ्यपुस्तकात होता.. ‘गाईड’ चित्रपट तर अनेकदा पाहिलेला आहे.. ‘मालगुडी डेज’ ही मालिका ब्लॅक अँड व्हाईट टीव्हीवर पाहिलेली अजूनही लक्षात आहे.. ‘मिठाईवाला’ ही फिल्म अविस्मरणीय अशीच आहे..
आज लेखक आर. के. नारायण व चित्रकार आर. के. लक्ष्मण हे दोघेही बंधू या जगात नाहीत, मात्र त्यांचं योगदान, पिढ्यानपिढ्या कोणीही विसरु शकणार नाही…
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
१४-१०-२१.

सुरेश नावडकर
About सुरेश नावडकर 407 Articles
माझा जन्म सातारा जिल्ह्यात झाला. नंतर पुण्यात आलो. चित्रकलेची आवड असल्यामुळे कमर्शियल आर्टिस्ट म्हणून कामाला सुरुवात केली. नाटक, चित्रपटांच्या जाहिराती, पोस्टर डिझाईन, पुस्तकांची मुखपृष्ठ, अशी गेली पस्तीस वर्षे कामं केली. या निमित्ताने नाट्य-चित्रपट क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञांशी संपर्क झाला. भेटलेली माणसं वाचण्याच्या छंदामुळे ही माणसं लक्षात राहिली. कोरोनाच्या लाॅकडाऊनच्या काळात त्यांना, आठवणींना, कथांना शब्दरुप दिले. रोज एक लेख लिहिता लिहिता भरपूर लेखन झालं. मराठी विषय आवडीचा असल्यामुळे लेखनात आनंद मिळू लागला. वाचकांच्या प्रतिसादाने लेखन बहरत गेले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..