१९८९ साली लक्ष्या बेर्डे व वर्षा उसगांवकरचा ‘हमाल दे धमाल’ चित्रपट सर्वत्र प्रदर्शित झाला. या चित्रपटाचे वितरण, अरविंद सामंत यांचेकडे होते. सहाजिकच, पेपरमधली डिझाईन आम्ही केलेली होती. त्यांच्या प्रिमिअर शोचं निमंत्रण कार्ड केलं होतं. ‘प्रिमिअर शो’ला निर्माते, दिग्दर्शक, सर्व कलाकार व तंत्रज्ञ आलेले होते. मला स्वतःला हा चित्रपट फारच आवडला. वेगळी मांडणी, उत्तम गीते व त्यांचं चित्रीकरणही सर्वोत्तम होतं. या चित्रपटाने तुफान व्यवसाय केला. या धमाल चित्रपटाच्या कथा-पटकथा-संवाद-गीते व दिग्दर्शकाचं नाव आहे, पुरुषोत्तम बेर्डे!
बेर्डे हे नाव समोर आलं की, लक्ष्मीकांत बेर्डेची आठवण ही होतेच.. लक्ष्मीकांतचे हे मोठे बंधू! १९७५ साली जे.जे. मधून कमर्शियल आर्ट्सचा डिप्लोमा घेऊन ते बाहेर पडले व एका जाहिरात संस्थेत आठ वर्षे त्यांनी काम केले. मात्र तिथे त्यांचं मन काही रमलं नाही.. ‘या मंडळी सादर करुया’ या संस्थेतर्फे पुरूषोत्तम यांनी सादर केलेल्या ‘अलवार डाकू’चं लेखन, दिग्दर्शन व संगीत सांभाळलं.. आणि इथपासून सुरुवात झाली, एका आगळ्या वेगळ्या कलंदर निर्माता, दिग्दर्शक व कलाकाराची!!
काॅलेज जीवनात त्यांची टूर, कर्नाटकला गेली होती. त्या टूरचं वर्णन आपल्या खास शैलीत पुरुषोत्तमनं नोटीस बोर्डवर झळकवलं.. ते सर्वांना आवडलं.. त्याचंच पुढे ‘टूर टूर’ मध्ये नाट्य रुपांतर केलं गेलं.. ‘टूर टूर’ चे शेकडो प्रयोग झाले.. दादर येथील शिवाजी मंदिरमध्ये ‘टूर टूर’चे प्रयोग लागायचे.. त्यावेळी पुरुषोत्तमला रस्त्यापलीकडील ‘प्लाझा’ चित्र मंदिराचे वेध लागले होते.. माझा चित्रपट ‘प्लाझा’ मध्ये लागलेला असेल, हे त्यांचं स्वप्न प्रत्यक्षात यायला, सहा वर्षे लागली..
नाटकातीलच अनेक कलाकारांना घेऊन ‘हमाल दे धमाल’ चित्रपट पूर्ण झाला. एका सर्वसामान्य हमालाला, एक जिद्दी मुलगी यशस्वी अभिनेता करुन दाखवते अशी चित्रपटाची वनलाईन होती. यातील सर्वच गाणी उत्तम होती. विशेषतः ‘मनमोहना तू राजा स्वप्नातला..’ या गीताचे चित्रीकरण अफलातून होते. त्यासाठी कलादिग्दर्शक प्रमोद गुरुजी यांनी विशेष परिश्रम घेतले होते. यातील दहीहंडीचे गाणे नृत्यदिग्दर्शक सुबल सरकार यांनी सर्वोत्कृष्ट साकारले होते. यामध्ये पाहुणा कलाकार म्हणून हिंदीतील, अनिल कपूरने काम केले होते. पुरुषोत्तम यांच्या या पहिल्याच चित्रपटाला लोकमान्यतेबरोबर राजमान्यताही मिळाली. महाराष्ट्र राज्य शासनाच्या चार पुरस्कारांनी या चित्रपटाला गौरविण्यात आले..
त्यानंतर पुरुषोत्तम यांनी आठ चित्रपट केले. ‘शेम टू शेम’ या विनोदी चित्रपटात ‘जुळ्यां’ची धमाल होती. ‘एक फुल चार हाफ’ मध्ये हिंदीतील किमी काटकरला घेतले होते. एन. चंद्रा यांच्या ‘घायाळ’ चित्रपटात जाॅनी लिव्हरला मराठीत पहिल्यांदाच संधी दिली होती.’जमलं हो जमलं’, ‘निशाणी डावा अंगठा’, ‘भस्म’, ‘श्यामची मम्मी’ व ‘हाच सुनबाईचा भाऊ’ या चित्रपटांनी पुरुषोत्तम यांचं नाव झालं.. ‘भस्म’ चित्रपट हा कमी बजेटचा होता, अशोक सराफ यांनी स्क्रिप्ट वाचून एक रुपयाही मानधन न घेता, चित्रपट केला. या चित्रपटाला राज्य सरकारचा, सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून सन्मान मिळाला..
पुरुषोत्तम बेर्डे यांनी आजपर्यंत दहा नाटकांचे लेखन, वीस नाटकांचे दिग्दर्शन, साठ नाटकांना संगीत, पाच नाटकांची व नऊ चित्रपटांची निर्मिती केलेली आहे.
पुरुषोत्तम यांनी, चाळीस वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीत अनेक चढ-उतार, यश-अपयश, मान-सन्मान पाहिलेला आहे.. या कलाप्रवासात त्यांना नगर येथील, क्षीरसागर महाराजांचा आशीर्वाद लाभलेला आहे..
मी देखील एक कलाकार आहे, मला सुद्धा चित्रपटांविषयी आकर्षण आहे.. मला जे काही करावसं वाटलं, तेच पुरुषोत्तम यांनी त्यांच्या निर्मितीतून सादर केलेलं आहे.. त्यामुळेच माझ्या मनात, त्यांना आदराचे स्थान आहे..
— सुरेश नावडकर.
मोबाईल: ९७३००३४२८४
२६-४-२२.
Leave a Reply