नवीन लेखन...

ब्युटीपार्लरमध्ये अनोळखी मृतदेह

यशवंत सकाळच्या न्याहरीसाठी आले, तोच सदू निरोप घेऊन आला की क्राईम ब्रॅंचचे इन्स्पेक्टर हिरवे त्यांना भेटायला आले आहेत.
यशवंत मनाशीच हंसले आणि म्हणाले, ‘त्यांना आतच पाठव न्याहरीला.”
इन्स्पेक्टर हिरवे आपल्याला भेटायला येणार, हे यशवंताना अपेक्षितच होतं.
काल पेपरांत “ब्युटी पार्लरमध्ये अनोळखी मृतदेह” ह्या मथळ्याखाली आलेली बातमी वाचली, तेव्हाच त्यांच्या लक्षांत आलं होतं की हे प्रकरण गुंतागुंतीच असणार आणि इन्स्पेक्टर हिरवे आपल्याकडे येणार.
एव्हाना इन्स्पेक्टर तिथे आलेच.
यशवंत म्हणाले, “हिरवे साहेब, बसा.
आत्याबाईंनी आज शिरा केलाय, तो खा.”
आज इन्स्पेक्टर हिरवेंना शिरा गोड लागणार नव्हता.
ते म्हणाले, “यशवंतराव, माझा ब्रेकफास्ट झालाय. मला…”
यशवंत म्हणाले, “ठीक आहे, माझेही आटोपलेच.
आपण स्टडीत बसूया आणि तुम्ही मला आतापर्यंत काय काय माहिती मिळाली ते सांगा.”
इन्स्पेक्टर म्हणाले, “चाळीशीच्या आसपास असणाऱ्या, सांवळ्या रंगाच्या, पांच फूट दहा इंच उंचीच्या, सशक्त, कुठलीही ओळखीची निशाणी जवळ नसणाऱ्या अपरिचित माणसाचा मृतदेह, एम.के. रोडवरील “तिलोत्तमा” नांवाच्या लेडीज ब्युटी पार्लरमधे मंगळवारी सकाळी ९ वाजतां दार उघडून आंत प्रवेश करणाऱ्या, तिथल्या साफसफाई करणाऱ्या बाई आणि पार्लर चालवणारी अंकीता यांना समोरच पडलेला दिसला.
घाबरून दार परत बंद करत त्या ओरडल्या.
त्यांचा आवाज ऐकून जमलेल्यापैकी एका समजदार व्यक्तीने आम्हाला कळवलं.”
“इनस्पेक्टर, मी हा वृतांत पेपरांत वाचलाय.
त्याने सरबत घेतलं असावं व सरबतातील विषाने त्याचा तात्काळ मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
चेहरा निळसर झालाय.
त्याचे खिसे रिकामे होते, कपड्यांवर कोणतीही खूण नाही, पायांत कांही नाही. हो ना !”
इन्सपेक्टरनी मान डोलावली.
“आणि तुम्ही पार्लरची झडती घेतलीच असेल. त्यांत कांही मिळाले कां ?”
हिरवे म्हणाले, “आम्ही तपासणी केली पण त्यांत कांही मिळाले नाही.”
यशवंत म्हणाले, “पार्लरला एकच दार आहे. त्याची तोडफोड झालेली नाही. असे असतांना तो आंत आला म्हणजे पार्लरची चावी जवळ असणाऱ्या कोणीतरी दार उघडून त्याला आंत घेतला.
पार्लरच्या किती चाव्या होत्या आणि त्या कुणाकडे असतात ?”
हिरवे म्हणाले, “एक चावी शेजारीच असणाऱ्या डे अँड नाईट केमिस्टकडे असते.
एक चावी मालकाच्या घरी असते.
पार्लरमध्ये अंकीता आणि दोन मुली सरीता आणि शिवानी तिघी काम करतात.
जी प्रथम येईल ती केमिस्टकडली चावी घेऊन पार्लर उघडते.
मालकांकडली चावी त्यांच्याकडेच असते व ते गांवी गेले होते.
खुनाचे कळल्यानंतर लागलीच ते परत आले.”
यशवंत म्हणाले, “हिरवे साहेब ! कोणीतरी ह्या चावीची डुप्लिकेट करून ती वापरली असण्याचीही शक्यता आहे.
डुप्लिकेट चाव्या बनवणाऱ्यांकडे अलिकडेच कोणी ह्या चावीची डुप्लिकेट करून घेतली होती कां ह्याची चौकशी करा ?
केमिस्टकडे कोण कोण काम करतात ?
त्यांची व तिन्ही मुलींची जबानी तुम्ही घेतलीच असेल.
ती आणि पोस्ट मॅार्टेम रिपोर्ट मला पाठवून द्या.
मालकावरही नजर ठेवा.
त्याची पूर्ण माहिती काढा.”
पोस्ट मॅार्टेममधे मृत्यू सरबतातील विषानेच झाला, हे नक्की झालं.
विष कोणत्या प्रकारचं असावं, त्याचा अंदाजही त्यांत होता.
सरबताचा ग्लास हा पार्लरमधीलच ग्लास होता.
पार्लरमध्ये छान सरबत देण्याची पध्दत होती.
तीन चार सरबताच्या पॅकबंद बाटल्या कपाटांत होत्या.
सरबतात विष मिळाल्याने केमिस्टकडील कोणाचे तरी काम असावे, असा पोलिसांचा कयास होता.
परंतु त्या व्यक्तीची ओळख आणि खूनाचा उद्देश ठाऊक नसल्याने पोलिसांनी कुणालाही संशयावरून ताब्यात घेतले नव्हते.
पार्लरमध्ये काम करणाऱ्या तिघींचीही स्वतंत्र जबानी घेतली होती.
तिघीही त्या गृहस्थाला ओळखत नव्हत्या.
आदल्या दिवशी पार्लर बंद केल्यावर सरीता व शिवानी लोकलने सरळ आपापल्या घरी गेल्या होत्या.
त्यांच्या घरूनही त्यांच्या ह्या विधानाला दुजोरा मिळाला होता.
संध्याकाळी अंकीताला न्यायला तिचा मित्र नरेश टू व्हीलरवरून येत असे.
दोघं तिथून फिरायला जात.
मग तो तिला घरी सोडत असे.
नरेशचा व तिचा विवाह व्हायचा होता परंतु तिच्या आई-वडिलांची अट होती की नरेशने प्रथम व्यवसाय अथवा नोकरी करायला हवी.
नरेशला जुगार, दारू, इ. च व्यसन नव्हतं पण अधून मधून हातात पैसे आले तर तो ते त्यांत घालवी.
कधी कधी अंकीताकडूनही त्यासाठी पैसे घेत असे.
पोलिस त्याची कसून चौकशी करत होते.
दार उघडल्यावर चावी ज्या खणांत गल्ला होता, त्याच खणाला बाजूला असलेल्या कप्प्यात ठेवत आणि संध्याकाळी केमिस्टकडे परत देत.
केमिस्टकडे तिघेजण काम करत.
एक पन्नाशीपुढचे सिनीयर केमिस्ट दहा ते रात्री आठपर्यंत तर इतर दोघे पंचवीशीच्या आंतले तरूण पाळीपाळीने सकाळी आठ ते सहा आणि बारा ते दहा दुकानात असत.
दुकानाचा पंजाबी मालक चंदिगडला रहात असे.
दोन्ही दुकानांत काम करणाऱ्यापैकी कोणीही मृताला ओळखत नव्हते.
मालक दुकानापासून जवळच रहात.
त्यांनीही आपण त्याला ओळखत नसल्याचे म्हटले होते.
मालक त्याआधी पंधरा दिवस गांवी गेले होते.
खूनाचे वृत्त त्यांना फोनवर कळल्यानंतर एस.टी. ने संध्याकाळी ते येऊन पोहोचले होते.
पोलिसांना दिलेल्या जबानीत त्यांनी सांगितलं होतं की त्यांनी दोन, तीन व्यवसायात गुंतवणूक केली होती.
पार्लर हा त्यापैकी एक.
त्यांना स्वत:ला पार्लरची कांही माहिती नव्हती.
त्यांनी ते अंकीताला चालवायला दिलं होतं.
ती दरमहिना एक ठराविक रक्कम त्यांना देत असे.
बाकी नफा तिचा.
मालक म्हणून एक चावी त्यांच्याकडे होती.
ते एकटेच तिथे रहात व ते गांवी गेले, तेव्हां ती चावी घरीच होती.
परत आले तेव्हांही चावी जागेवरच होती.
पोलिसांनी केमिस्टकडील नोकरांवर, नरेशवर आणि मालकावर पाळत ठेवली होती परंतु अद्याप संशयास्पद कांही आढळलं नव्हतं.
पार्लर चार दिवस बंद होतं.
दोन्ही चाव्या पोलिसांकडेच होत्या.
इन्सपेक्टर हिरवे रोज यशवंतना खबर देत होते परंतु त्यांत कांही महत्वाचं नसे.
सहाव्या दिवशी मालकाने अर्ज दिला की पार्लर बंद ठेवल्याने त्याचे नुकसान होत आहे तर चाव्या त्याला परत देण्यांत याव्यात.
त्याने म्हटले होते, ‘खुनाच्या बातमीमुळे आधीच माझे खूप नुकसान झाले आहे.’
पोलिसांनाही पार्लर बंद ठेवण्याचे कारण दिसत नव्हते.
तरीही इनस्पेक्टर हिरवेंना यशवंतांच्या कानावर ही बातमी घालावी असे वाटले.
यशवंत म्हणाले, “कांहीच हरकत नाही. पार्लर घेऊ दे त्याला ताब्यांत. मात्र चोव्वीस तास पार्लरवर साध्या वेशांतील पोलिसांची पाळत ठेवा.
विशेषत: कोण कोण तिथे केव्हा येतं, त्यावर लक्ष ठेवा.”
इन्स्पेक्टरनी तशी व्यवस्था करून चाव्या परत दिल्या.
पार्लर पुन्हा सुरू झाले पण आता ते पूर्वीसारखे चालत नव्हते.
केमिस्टकडे काम करणारे प्रौढ गृहस्थ इतके घाबरलेले होते की ते घराबाहेर पडायलाही घाबरत होते.
दुकान ते घर आणि घर ते दुकान, एवढे चालणं त्यांच्याकडून कसंबसं होत होतं.
त्यांच्यावर पाळत ठेऊन असणारे पोलिस कंटाळून गेले होते.
दोन्ही तरूणांच वागणही सर्वसामान्य होतं.
नरेश पोलिसांना जबानी दिल्यानंतर सरळ गुत्त्यावरच गेला होता.
दोन दिवस त्याची अवस्था वाईट होती.
अंकीताला भेटायलाही आला नाही.
तिसऱ्या दिवशी मित्राबरोबर सिनेमा पहायला गेला.
पोलिसांना जबानी दिल्यानंतर घरीही त्याला चौकशीला सामोरं जावं लागलं होतं.
वडिलांनाही आपल्या मुलाच्या हातूनच हे कृत्य घडलं असावं असं वाटत होतं.
तेही खोदून खोदून प्रश्न विचारत होते. मालक फारसा कुठे फिरत नव्हता परंतु रोज साडेदहाच्या सुमारास बाहेर फेरफटका मारून तासाभराने परत येत होता.
पोलिसांना एवढ्या लोकांवर जास्त दिवस पाळत ठेवणे शक्य नव्हते.
चार दिवसानंतर त्यांनी सर्वांवर ठेवलेली खास पाळत बंद केली.
पोस्ट मॅार्टेमचा रिपोर्ट आला होता.
ते विष ज्या प्रकारचं होतं, ते केमिस्टकडे मिळणार नव्हतं.
परदेशातून आलेलं असावं.
त्या मृताचा फोटो काढून सर्व पोलिस स्टेशन्सना पाठवला होता पण कुठूनही त्याच्याबद्दल कांही माहिती मिळत नव्हती.
पोलिसांना वाटत होतं की हे प्रकरण फाईलवरच रहाणार.
चंदू यशवंतांच्या सांगण्यावरून मालकाच्या गांवी जाऊन मालकाचे घर पाहून आणि त्याच्या मित्रांना भेटून आला होता.
यशवंतना आपल्या भेटीचे फलित सांगत होता.
मालकाच्या एका मित्राने सांगितले की मालक कसल्या तरी चिंतेत होता.
सारखी त्याच्या फोनची बेल वाजायची.
मेसेज यायचे.
शेवटी सोमवारी सकाळी तो तिथून एस.टी.ने निघाला.
चंदू त्या मित्राला म्हणाला, “सोमवारी नाही, मंगळवारी निघाला असेल.”
तर तो चंदूचा मित्र म्हणाला, “छ्या, सोमवारीच गेलो ता.
माजो उपास ना त्या दिशी. मी कसा इसरनार.”
यशवंत म्हणाले, “म्हणजे जबानीत खोटं सांगितलय तर !
चंदू, पोलिसांनी मालकावर पाळत ठेवली होती.
आता जरा कांही दिवस तू पाळत ठेव.”
चंदूने मान डोलावली.
चंदूने तीन दिवस मालकावर नजर ठेवली आणि यशवंतना सांगितलं की मालक एका कॅालेजजवळ तीनही दिवस एका ठराविक वेळीच एका गृहस्थाला भेटत होते.
त्यांच्यात कांही वादही होत असावा कारण त्या गृहस्थाच्या चेहऱ्यावर राग असे तर मालकाच्या चेहऱ्यावर भीती असे.
बाकी मालक कुठेच जात नव्हता.
यशवंतनी मालकाच्या फोनचा लॅाग तपासला.
गेले दोन महिने त्यांना एकाच नंबरवरून अनेक फोन आले होते.
यशवंतानी त्याच दिवशी इन्स्पेक्टर हिरवे ह्यांना बोलावून घेतले.
यशवंत हिरवेंना म्हणाले, “हिरवे साहेब, मला दाट संशय आहे की हा कांही ड्रग्जचा मामला आहे.
मालक ड्रग्ज पुरवणाऱ्या साखळींतला एक दुवा असावा.
तो कॅालेजजवळ कुणाला तरी भेटत असतो व बहुदा ड्रग्ज देत असतो.”
इन्सपेक्टर म्हणाले, “शक्य आहे. ज्याचा मृतदेह पार्लरमधे आढळला तोही ह्या अवैध धंद्याचाच भाग असावा.
त्याला मारून टाकण्याची जबाबदारी मालकावर आली असावी.”
यशवंत म्हणाले, “इन्सपेक्टर हिरवे, सध्या तुम्ही त्याला खूनाचा संशयित म्हणून अटक कां नाही करत ?”
इन्सपेक्टर म्हणाले, “त्यासाठी पुरेसा पुरावा नाही.
तुम्ही पहातां ना ! हल्ली कोर्ट पोलिसांनाच धारेवर धरतं.”
हिरवेंनी आपल्या पोलिसांना मालकावरची पाळत कडक करण्याचा इशारा दिला.
त्याच दिवशी रात्री बाराच्या सुमारास पार्लरवर पाळत ठेवून असलेल्या पोलिसाचा इन्सपेक्टर हिरवेंना फोन आला, “साहेब, पार्लरमधे कोणीतरी आलेलं दिसतयं!”
“कोणी बाहेर आलं तर अटक करा त्याला. मी तिकडेच येतो.”
ॲार्डरनुसार पोलिस दबा धरून बसले.
अर्ध्या तासांत इन्स्पेक्टर हिरवे एका टेक्निशियनसह तिथे पोहोचले.
टेक्निशियनने कुलुपाचा अंदाज घेत दहा मिनिटांत डुप्लिकेट चावी बनवली.
इन्स्पेक्टर हिरवे दार उघडून आंत शिरले आणि समोरचे दृश्य पाहून अचंभित झाले.
मंद प्रकाशांत पार्लरचा मालक जमिनीवर उताणा पडलेला होता.
बाजूलाच सरबताचा ग्लास होता.
इन्सपेक्टर हिरवेंनी दिवे लावले.
पंचनामा करण्याआधी यशवंत धुरंधरना फोन केला.
यशवंत म्हणाले, “इन्स्पेक्टर हिरवे, आपल्याला दुकानाची परत झडती घ्यावी लागेल.
त्यासाठी ड्रग्ज शोधू शकणारे श्वान पथक बोलावून घ्या.”
यशवंत आणि चंदू तिथे पोहोचेपर्यंत पंचनामा पूर्ण झाला होता.
श्वानपथक येण्याची पोलिस वाट पहात होते.
यशवंतनी आपली तीक्ष्ण नजर चौफेर फिरवली.
ते म्हणाले, “इन्सपेक्टर, मला दाट संशय आहे की हे ठीकाण ड्रग्जचा सांठा ठेवण्यासाठी वापरलं जात होत व ते साठवण्याचे काम हा मालक करत होता.
ज्याचा मृतदेह पूर्वी इथे सापडला, तोही ह्या धंद्यातील एक दुवा होता.
तो मालकाला धमकावायला आला होता पण मालकाने हुशारीने त्यालाच मारले होते.
गांवी जाण्याच्या आधीपासून त्यांना सतत धमक्या येत होत्या असाव्यात.
म्हणूनच ते गांवी पळून गेले होते.
नंतर त्या अनोळखी माणसाला मारल्यामुळे त्यांनी ड्रग्ज टोळीशीच पंगा घेतला होता.
धमक्यांना कंटाळून मालकाने शेवटी स्वत:चा शेवट करून घेतला.
मालकाने ड्रग्जचा सांठा कुठे ठेवलाय, हे त्यांना माहित नसावं.
आता आपल्याला तेंच शोधून काढायचं आहे.”
इन्सपेक्टर हिरवे म्हणाले, “इतक्या ठामपणे तुम्ही ड्रग्जचा संबंध कसा लावला इथे ?”
“मालकावर पाळत ठेवणाऱ्या पोलिसांना एक लहान गोष्ट महत्वाची वाटली नसावी.
हा मालक गेल्या कांही दिवसांत कॅालेजजवळ एकाच विशिष्ट व्यक्तीला भेटत असे.
कॅालेजेसमधून ड्रग्जचा प्रचार/प्रसार होतोय अलिकडे.
आपण ती संपूर्ण टोळी एकदम नाही संपवू शकत पण बरेच साठे आणि दुवे नष्ट करू शकतो.”
एव्हढ्यांत श्वानपथक तिथे दाखल झालं.
यशवंताच्या अपेक्षेप्रमाणे पार्लरमधील समोरासमोर असणाऱ्या सहा आरशांपैकी दोन आरशांजवळ जाऊन कुत्रे भुंकू लागले.
बारकाईने पहातांच भिंतीतील कपाटं उघडण्याची कळ खणामागे सांपडली.
इनस्पेक्टर हिरवेंनी कपाटं उघडली.
त्यांत ड्रग्जच्या पांढऱ्या पिशव्यांनी खचाखच भरलेली खोकी दाटीवाटीने ठेवलेली होती.
त्यांची किंमत अदमासे दहा हजार कोटी रूपये होती.

– अरविंद खानोलकर.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..