काशी विश्वनाथ मंदिर हे आपली दिव्यता, प्रचंड गर्दी आणि छोट्या, अस्वच्छ गल्ल्यांमुळे ओखळलं जात होतं. महात्मा गांधी यांनी ४ फेब्रुवारी १९१६ ला वाराणसी हिंदू विश्वविद्यालयाच्या उद्घाटनासाठी आल्यानंतर काशीचा दौरा करताना त्याचा उल्लेख केला होता. मोदी यांनी पंतप्रधानपदाची जबाबदारी सांभाळल्यानंतर काशीच्या मुख्य गरजा आणि इन्फ्रास्ट्रक्चरवर काम करण्यास सुरुवात केली. ८ मार्च २०१९ रोजी पंतप्रधान मोदी यांनी काशी विश्वनाथ मंदिर परिसराच्या पुनर्विकास आणि पुनरुद्धारासाठी आपल्या सर्वात महत्वाकांक्षी योजना काशी विश्वनाथ कॉरिडॉर योजना सुरु केली.
पंतप्रधान मोदी यांचं लक्ष्य हे गंगा नदी आणि काशी विश्वनाथ मंदिरादरम्यान एक सहज संबंध स्थापित करणे हे होतं. कारण, भाविकांना मंदिरात गंगाजल चढवण्यासाठी नदीत स्नान करणे आणि पाणी घेऊन जाणे सोपं व्हावं. मंदिराच्या चारी बाजूला असलेल्या इमारती पाडल्यामुळे कमीत कमी ४० प्राचीन मंदिरं पुन्हा समोर आली. आज १३ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते त्याचा लोकार्पण सोहळा होत आहे.
काशी विश्वनाथ मंदिराचा परिसर पूर्वी ५ हजार चौ. फुटांएवढाही नव्हता, आता त्याची व्याप्ती काशी विश्वनाथ विस्तार आणि सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत विश्वनाथ धाम किंवा काशी विश्वनाथ कॉरिडॉरअंतर्गत ५ लाख २७ हजार ७३० चौरस फूट झाली आहे. येथे भाविकांच्या सोयीसाठी अनेक इमारती आहेत. २७ मंदिरांची साखळी तयार होत आहे. सुमारे ४०० कोटी रुपयांचे जमीन अधिग्रहण, ४०० कोटींचे बांधकाम असा सुमारे ८०० कोटी रुपयांच्या या प्रकल्पाचे काम मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे. पंतप्रधान मोदी १३ डिसेंबरला विश्वनाथ धाम देशवासीयांना समर्पित करणार आहेत आणि त्यानिमित्ताने १४ डिसेंबर ते १३ जानेवारी २०२२ या कालावधीत वाराणसीमध्ये ‘चलो काशी’ या नावाने पूर्ण महिना उत्सवही साजरा केला जाणार आहे.
अहिल्याबाई होळकर यांच्यानंतर अडीचशे वर्षांनंतर पुन्हा एकदा काशी विश्वनाथ धामचा जीर्णोद्धार झाला आहे. हा खूप महत्त्वाचा काळ आहे. जगभरातील शिवभक्तांच्या प्रबोधनासाठी आणि निमंत्रणासाठी, १४ डिसेंबर ते १३ जानेवारी या एक महिन्याच्या उत्सवाचे नियोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची प्रमुख आकर्षण म्हणजे काशी विश्वनाथ धाम आणि संगीत, साहित्य, पुस्तक मेळा, व्यापार मेळा, महोत्सव, महापौर संमेलन, कृषीआधारित संमेलन, वास्तुविशारद संमेलन, कला आणि साहित्य संमेलन, रांगोळी आणि छायाचित्रण स्पर्धा, क्रीडा आणि युवकांसाठी विविध कार्यक्रम असतील. हा उत्सव महिनाभर चालणार आहे.
मंदिर परिसराचे क्षेत्रफळ ५ लाख २७ हजार ७३० चौरस फूट करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने तीन गोष्टी बनवल्या जात असून त्यात मंदिर परिसर, चौक, पदपथ यांना जोडलेल्या २३ इमारती बांधल्या जात आहेत. यामध्ये ३ पर्यटन केंद्रे, पर्यटक मदत खिडकी, वाराणसी गॅलरी, म्युझियम, वैदिक सेंटर, मल्टीपर्पज हॉल, सुरक्षा कार्यालय, मुमुक्षु भवन, अतिथीगृह, शॉपिंग कॉम्प्लेक्स, भोजनालय यासारख्या महत्त्वाच्या इमारती आहेत. याशिवाय दिव्यांग, वृद्धांसाठी रॅम्प आणि एस्केलेटरचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
जमीन अधिग्रहणात अनेक मूर्ती आणि मंदिरे सापडली असून या मंदिरांच्या जीर्णोद्धाराचेही काम सुरू आहे. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे कामही तज्ज्ञांनी केले आहे. कोरीव काम राजस्थानातील कारागीरांकडून करण्यात आले आहे. मंदिराच्या सुवर्ण शिखराची स्वच्छताही तज्ज्ञांकडून केली जात आहे.
प्रसिद्ध पंचकोशी परिक्रमेला आंतरराष्ट्रीय स्वरूप देण्यासाठी योगी सरकार राज्यातील मंदिरे, कुंड आणि यात्री निवास यांचे सुशोभीकरण करणार आहे. सुमारे ७० किलोमीटर लांबीचा हा धार्मिक मार्ग विकसित झाल्याने नवीन रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध होणार आहेत. काशी विद्या परिषदेचे सरचिटणीस प्राध्यापक राम नारायण त्रिवेदी यांनी सांगितले की, भाविक सुमारे ७० किलोमीटरची पंचकोशी यात्रा अनवाणी करतात. यात कांडवा, भीमचंडी, रामेश्वर, पाच पांडव आणि कपिलधारा पाच थांबे आहेत. पाच दिवसांच्या प्रवासात एक रात्र विश्रांतीची सोय आहे. याशिवाय या धार्मिक मार्गावर मंदिरे, तळी, तलाव, तसेच प्रवासी निवासस्थानेदेखील आहेत. वाराणसी विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्षा ईशा दुहन यांनी सांगितले की, या यात्रेदरम्यान १०८ मुख्य मंदिरे, ४४ धर्मशाळा आणि कुंड आहेत. योजनेनुसार, विहिरी आणि चौपाल वास्तूंचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण केले जाईल. सरकारच्या या प्रकल्पावर ५५.९३ कोटी रुपये खर्च करण्याची योजना आहे, जी तीन टप्प्यांत पूर्ण केली जाईल. पहिल्या टप्प्यात ९.९२ कोटी रुपये, दुसऱ्या टप्प्यात २३.८६ कोटी रुपये आणि तिसऱ्या टप्प्यात २२.१५ कोटी रुपये धार्मिक स्थळांचे नूतनीकरण आणि सुशोभीकरण तसेच नदीकिनारी विकासासाठी खर्च केले जाणार आहेत.
काशीच्या सुमारे ८४ घाटांच्या दर्शनासह आता भाविकांना क्रूझ सफरीचा आनंदही घेता येणार आहे. काशीचे घाट पाहण्यासाठी केवळ देशीच नव्हे तर परदेशी पर्यटकही दररोज लाखोंच्या संख्येने काशीत येतात. आता एक अत्याधुनिक क्रूझ आणि सुमारे २०० लोकांची क्षमता असलेल्या स्वामी विवेकानंद आणि सॅम माणिक शाह नावाच्या दोन रो-रो बोटी पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत. याशिवाय स्थानिक बोटीही एलपीजीआधारित करण्यात आल्या आहेत. त्याचे ८० टक्के काम झाले असून घाटावर लवकरच एलपीजी स्टेशन उभारण्यात येणार आहे.
संकलन: संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
lekh mahiti purn v chan aahe