तिसर्या पहारची येळ व्हती. अजून शिरू झोपडीकडं आला नवता.त्याची कारभारीन ईमली भाकर आन कोरड्यासं घेऊन केधोळची आलती .त्यालं शोधायलं तिनं सगळं रान धुंडाळून काढलं व्हतं, पण शिरू काय गावला नाही.“कुठं गेल असतील वं मायं ते ? सगळ्या ईळापसुनं दिसलं नाईतं….शेवंता माय आमचं हे दिसलंत का वं !”, तीनं चालत चालतचं हारबर्याची भाजी खुडणार्या शेंवताई आजीलं ईचारलं.तसं शेवंता मनाली की,
“लिंबारीवाल्या कुंडलीकाच्या शेताकडं जातांनी पाह्यलं माय घंटाकभर आंधी…!”
तिलं चिंता वाटू लागली.पहाटं पसनं शिरू शेतात आलता.आज त्यांनं न्याहारी पण केली नवती. उपाशी तापाशी पोटी नवरा शेतात आला म्हणून तिनबी समदे कामं गडबडीनं आटपुन पाच दहा भाकऱ्या थापल्या व लगबगीनं वावराकडं निंघली व्हती.तसं तं तीबी पहाट पसून जेवली नवतीच.तिचा धनी उपाशी तापाशी रानातं गेल्यावर तिलं तरी जेवणाचा घास नड्याखाली उतरलं का? शेतात येऊन पाहिलं तर शिरू कुठंच गावत नवता. तिनं जवळपासच्या पाच-सात शेतायच्या आखाड्यावरपण जाऊन पाह्यलं, पण शिरू काय गावला नाय.सूर्य पश्चिमेकडे कलाया लागला व्हता. तिसरा पाहार सरतं आलता. तेवढ्यात थकून भागून धापा टाकत टाकत शिरू आपल्या खोपटा जवळ आला. त्याचा घसा कोड्डा पडला व्हता.त्यालं खूप तहान लागली व्हती. पहाट पासून येड्या-पिश्यावाणी दुसऱ्या दोन-चार शेतकर्यासंगट भनंभनं फिरत व्हता. काल रातीलं लाईटीचा फाल्ट झालता. राती पिकालं पाणी देता आलं नाही.आज रातचं तरी पाणी देताईल या आशेनं सदू नाना, मुकिंदा, रामकिसन तात्या काट्याकुट्या तुडवतं शिवारभर फिरून फाल्ट काढायं फिरत व्हते.शिरूच्या घशालं कोरड पडली व्हती. तेव आंब्यालं टेकुन झोपडी जवळ बसला. इमलीनं त्यालं पियालं पाणी दिलं, तसं शिरूनं ते पाणी आघुर्यासारखं ढसंढसं पिऊन टाकलं.ईमली त्याच्या हातून पेला हिसकुनं घेत मनाली, “मायं तुम्हालं काय कळतं का नाय वं असं उन्हातान्हातून आल्या आल्या ढसंढसं पाणी पितात का? पाणी लागलं मंजी..!!!” तरी पाण्याचे दोन-तीन घोट पोटात गेल्यानं शिरूलं जरा बरं वाटलं. त्यांनं लांब स्वास सोडला अन् ईमलीलं मनला,“ईमले त्या लिंबारीवाल्या कुंडलिकाच्या शेतात फाल्टं घावला बघ! आज रातच्यालं तरी पाणी देताईल.”
शिरू कष्टाळू व्हता. त्याच्याकडं बापजाद्यांची चार एकर जमीन व्हती. तो दोन अडीच एकरात धान्याची पिकं घ्यायचा व अर्ध्या एक एकरात भाजीपाला करायचा. दोघं नवराबायको नेटानं संसाराचं रहाटगाडगं हाकत व्हते. दोघंबी काबाडकष्ट करायचे. आपल्या लेकरायचे तरी आपल्यासारके हाल नको असं तेह्यलं वाटायचं. तेह्यनं लेकरायलं शिकवायलं हास्टेलात ठेवलं व्हतं. शिरूच्या गप्पा ऐकत ऐकत ईमलीनं टोपल्यातून भाकर काढली.शिरूनं हातावरच भाकरं घेतली.लांब लांब मिश्यावाला लालजरदं कांदा एका बुक्कीत फोडला.शेतातल्या त्या जेवणाची तोड कशालचं नवती.डब्यातलं कोरड्यासंपण झंझनीत झालतं.पहाट पासून अन्नाचा कण पोटात नवता तो अधाश्यासारका भुरके मारू मारू जेऊ लागला. त्यानं इमलीकडं पाह्यलं अन् ईचारलं,
“तू जेवली का गं….अं…?”
तसं ईमली लटकेच रागाने मुरका मारत लाडीगोडीनं इमली शिरूलं मणली की,
“तुम्हालं नं बाई कुठं आमची काळजीचं नायं. आवं मव्हा धनी पहाट पसून नाय जेवला मणल्यावर मह्या नड्डयाखाली घास जाईलं का?”
तसं शिरूचं डोळंच भरून आलं. तोंडाकडं जाणारा घास त्यानं ईमलीलं भरवला. तिनंबी भाकरीचा तुकडा मोडला कालवनातं बुडवून शिरूलं भरवला. वर आंब्याच्या झाडावर राघू मैनेलं आपल्या चोचीनं पेरूची फोड भरवत व्हता..
शिरू अन् इमलीचा राजा राणीचा सुकाचा संसार चालू व्हता. जेवण आटपल्यावर शिरूनं तिथचं आंब्याच्या झाडाखाली आंग टाकलं. इमली त्याच्या उशालं भाजी निसत बसली व्हती. ते दोघं गुलुगुलु बोलत व्हते.शिरू ईमलीलं मनला , “ईमु यंदा जर गहू जरा चांगला झाला नं तं मी तुलं काकणं जोडी अन् बाजूबंद करीन बघ”.
नतसं ईमली लाजली ती मणाली, “अवं,ते काकणं राहु द्या, तुमच्यासारका सोन्यावानी नवरा असल्यावर मलं काय पडलं वं त्या काकणात! यंदा पह्यलं ते वसरीवरचे पत्रं गळाया लागलेती ते बदला आंधी.आवं मोठं यंदा दहावीत गेलया त्यालंपणं शिकायलं लय पैसा लागलं का नाही तव्हा काकणा-फिकनाचा नांद सोडा आण पोरांयच्या शिक्षणासाटी दोन पैसे गाठीलं बांधून ठेवा जरा…!” ईमलीच्या बोलण्यानं शिरूलं लय बर वाटलं. त्यालं वाटायचं आपली बायको लय साधी भोळी हय.पण ती तं आपल्यापक्शापण दुरचा ईचारं करते. ईचारा ईचारातं आंब्याच्या गार सावली खाली त्यालं कव्हा डोळा लागला कळलचं नाही .काल रातच्यालं रातभर शिरू जागी व्हता. आजबी त्याची रातपाळीच व्हती. कारण दिवसा शेतातली लाईट नसायची.त्यात काल फाल्टं झालता,त्यामुळं त्याचं भिजवनं झालं नाही. गहू पोटरला व्हता. आता त्यालं पाण्याची खूप गरजं व्हती. पोटरलेल्या अवस्तेत जर पिकालं एक पाणी अन् खत बसलं तं आपल्या मनाजोगतं उत्पन्न व्हईलं असं त्यालं वाटत व्हतं. इकडं हरबराबी घाटरला व्हता. घाटरलेल्या अवस्थेत हरबऱ्यालंबी एखांद पाणी बसलं तं दुपटीनं उत्पन्न व्हईल असा त्याचा आडाखा व्हता. तसं पाहिलं तं त्याच्या शेतातलं पीक इतकं जोमात व्हतं की कोणाचीबी नजर लागावी. त्यानं कष्टचं तसे केले व्हते..!!!
संद्याकाळी नऊ साडेनऊ वाजता शिरु, रामकिसन तात्या, सदू नाना ,मुकिंदा आजा, कुंडलिका हे सगळे जण कंदील घेऊन जागलीवर निघाले. राती अकराच्या सुमारास लाईन येत व्हती.ती पहाटच्या पाच वाजेपर्यंत टिकायची. शेतात जाऊन पाणी बराबर पिकालं जातं का नाही हे पाहायलं तेह्यलं रातभर जागी राहावं लागायचं. रातच्यालं अंधारातच ईच्चु-काड्याचं भेवबी वाटायचं.तरीपण बारे धरायसाटी जागी राहावं लागायचंच. एकदा एक दिवस शिरूनं हाराकिरं केली तं शेतात मोठी भडुळी पडून सगळं पाणी पाटाणं वाहून गेलंतं. इकडच्या तिकडच्या गप्पाटप्पा करत सगळे जागलकरी आंबराईच्या दिशेनं निंघले व्हते.आज तरी गहू भिजवायलं भेटलं मणून शिरू खुश होतां. सगळे जागलकरी ईहरीवर शेकुटी पेटवून गप्पाटप्पा करत लाईटची वाट पाहु लागले. शिरूनं घड्याळाकडं पाह्यलं. अकराला दहा मिनटं बाकी व्हते.मनात चलबिचल व्हतं व्हती.मनाची अस्वस्थता वाढतं व्हती.समद्यायची,
“ उत्कंठा दाटुन आलती. क्षणाक्षणालं आता लाईट येईलं…ऽऽ…आलीचं समजा…अं अं अंऽऽ जय भोलेनाथ….लवकरं लाईट येवुन आज टिकु दे रे बाप्पा…!” असं मनातल्या मनातं शिरू मनतं व्हता. अन भक्कन उजेड पडला व लगोलगचं ईझलाबी.थोड्यायेळानं लाईटं आली पनं डीम झाली व्हती. सगळे आपापल्या मोटरी चालू करायलं पळाले.जश्याही मोटरी चालू केल्या तश्या त्या गुंरऽऽआवाज देत व्हत्या….. जळाल्या……आटोस्टार्टर लावलेले व्हते. अचानक फुल व्हल्टेज मधी लाईट आलती,त्यामुळं जोराच्या व्हल्टेजचा धक्क्यानं सगळ्या मोटरी जळालत्या.शिरूनं डोक्यालं हाणून घेतलं.त्यालं आज पाणी देणं लय गरजेचं व्हतं. पोटरणीच्या स्थितितं गव्हालं पाणी नाही दिलं तं उतार हमखास कमी येतो,हे शिरूलं चांगलंच माहीतं होतं,तरी पण त्याचा काहीच ईलाज चालतं नवता. त्यानं जोरात जमिनीवर काठी आदळली अन् घराकडं निंघाला.
नवरा लवकर घरी आल्यालं पाहून इमलीलं नवलच झालं.तिनं शिरूकडं नवलाईनचं पाह्यलं.आल्या आल्या पाय आपटत नाराजीनच शिरू घरात शिरला. त्याचा ते अवतार पाहून इमली चरकली…तीनं पाणी आणलं . लाडान शिरूच्या जवळ बसली अन शिरूच्या खांद्यावर हात ठिवून लाडीगोडीनं त्यालं ईचारलं,
“काय वं धनी, काय झालं? आज लय लवकर आलासा.मही लय आठवन येवू लागली का?”
तिच्या या लडीवाळ भोळसट मायेच्या बोलानं त्यालं उमाळा आला. तिच्या कुशीत डोस्कं ठिवून तो हमसून हमसून रडू लागला. त्यानं तेह्यच्या डी.पी. वरच्या सगळ्या मोटारी जळाल्याचं इमलीलं सांगतलं. ईमलीचा चेहरा पडला. तिच्या डोळ्यासमोर पोटरलेला गहू दिसत व्हता. थोडा येळ दोघंही सुनंसुनं बसले. इकडं शिरू विचार करत व्हता की,पहाटं लवकर हिरीतून मोटर काढून भरून आणावं लागलं.मोटार भरायलं तिनं चार हजारं तरी लागतीलच. शिरूलं चिंतेत पडलेलं पाहूनं ईमलीनं आपल्या कानातल्या बाळ्या काढून त्याच्या हातावर ठेवल्या. तो नको नको मणत व्हता,त्याचे डोळे डबडबले. त्याच्या डोळ्यात पाहून ईमलीनं मनलं,
“अवं, बाळ्या काय कव्हाबिक करता येतील पण पोटरलेल्या गव्हालं पाणी नाही भेटलं तं आपलं वरीसभराचं वांधे व्हतील”.न वाटूनबी त्यानं नाराजीनच त्या बाळ्या घेतल्या. पहाटं पाहाटं लवकरच उठून त्यांनं दोन रोजदार सांगितले.तेह्यलं घेऊन मोटर काढली आन एका रोजदारालं शेतातलं काम सांगुण तं एकालं मोटर धरायलं गाडीवर बसवुनं शहरात नेलं.अजून मेकॅनिकनं दुकान उघडलं नवतं.रोजदारालं मोटारी जवळ बसवून शिरू सोनार गल्लीत गेला.तिथं त्यानं बाळ्या मोडायलं सोनाराजवळ देल्या. सोनारानं शिरूकडं चष्म्यातून तिरप्या नजरेनं संशयाने पाह्यलं अन् बिल मागितलं, “आमच्याकडं कुठलं बिलं अन फिलं वं वरीस-खांडाखाली तुमच्याच दुकानावरणं ह्या बाळ्या करूनं नेलेल्या हायेत.” असं शिरून सोनारालं सांगीतलं.तसं सोनारं मनाला,“बाबा रे बिल नसेल तर मला तुझ्या बाळ्या घेता येणार नाहीत.अरे,चोरी फिरीच्या असल्या तं काय करू…आपण आश्या बेकायदा धंद्यातं पडतं नसते रे बाबा…!” शिरू घाबरला त्याच्या घरच्या स्वतःच्या बाळ्या असूनबी त्यालं त्या त्याक्षणी चोर असल्यासारखं वाटाया लागलं.तो मनातच स्वतःलं मनाला,“देवा आणखी माही किती परीक्षा घेशील रे.. मालकालंच चोर बनवण्याच्या तुह्या या हातोटीलं तोड नाही रे बाबा!” शेवटी शिरू कळवळुन मणाला मालकं,” शे- दोनशे रुपये कमी द्या पैशाची लय नड हयं वं.” तव्हा सोनार म्हणाला,” ठीक आहे आता तू नेहमी येतोस,ओळखीचा दिसतोयस म्हणून मी तुला या बाळ्यायचे चार हजार रूपये देतो.पटत असलं तं सांग बाबा.” शिरूलं मायीत व्हतं की सोनार शे-पाचशे कमी देतोय मणून!!! तरीबी त्याच्यापुढं पर्याय नवता .त्यांनं सोनाराकडून चार हजार रुपये घेऊन मोटरीवाल्या मॅकनिककडं आला. तव्हा परत एकदा रोजदारानं दहा रुपये मागितले. चहा पिऊन येतो म्हणाला. शिरूनं त्यालं चाहापाण्यालं दहा रुपये दिलं.न देऊन काय करावं आजकाल हे रोजंदार संबाळणंबी लय जिकिरीचं काम झालंय. बिडी,काडी,जमलंच तर एखांदी क्वाटरं देल्याशिवायं ते कामाला येत नवते.आजकाल रोजदार मालकाचं जिनं तं मालक मिन्नतीचं जिनं जगू लागलेतं.इकडं पहाटं पसुनं शिरूनं अन्नाचा तुकडापनं खाल्ला नवता,रोजदाराचा मातरं दोनदातरी चहापाणी झालता. मेकॅनिकनं मोटार खोलून पाह्यली आन मनला की वायरींग जळाली आसुनं उद्यालं भरून मिळलंमुन.तसा शिरूचा चेहरा खाडकन पडला.त्यालं वाटलं व्हतं कि हातोहातचं मोटर सुदरवूनं नेवावं ….त्यानं तं मेकॅनिकलं मनलबी व्हतं कि उशीरलोक थांबतो पण आजच्या आजच मोटर सुदरून द्या मनुनं.पण मेकॅनिकबी काही करू शकतं नवता.त्याच्याजवळं ढिगानं मोटरी सुदरवायलं आलत्या.शेतातलं पिकं पाण्याच्या खंडामुळं सुकुन गेलतं.पाण्याआभावी पिकायच्या कंबरा मोडू लागल्या.एवढं टरारून आलेलं पिक पण पाण्याचा तान सहनं नं झाल्यानं माना टाकतं व्हतं.शिरू उदासवाना व्हवून पिकाचे हे हालं पाहातं व्हता.त्याचं काळीज तिळं तिळं तुटतं व्हतं पण परिस्तीतीपुढं त्याचं काहीच चालत नवतं.त्याच्या डोस्कयात सारख सारखं एकचं ईचार येतं व्हता.आत्ता उद्यातरी पिकालं पाणी भेटावं नायं तं कष्टकरून लेकरासारकं जपलेलं पिकं आवकाळी जाते कान्नू आसं त्यालं वाटू लागलं. तो सारका एका आडंगावून दुसर्या आडंगावरं व्हतं व्हता.त्याच्या डोळ्यालं डोळा लागतं नवता.त्यालं सारखं डोळ्यापुढं शेतातलं पीक दिसत व्हतं.ईमलीनं शिरूची हि तगमगं पाहीली.तसं पाहिलं तं तिच्याबी मनातं तगमगं व्हतीचं नं…! पण ईमली लय धिराची व्हती.तीनं हाताच्या आढीवरं शिरूलं डोस्क ठेवायलं लावलं आन लहान लेकरा सारकं त्यालं कुशीतं घेऊनं ती त्यालं थापटूनं झोपी घालु लागली.ईमलीच्या या उबदारं मायेनं शिरू क्षणभरं सगळं ईसरला व्हता.लहान लेकरासारका तिच्या कुशीतं तो झोपी गेला.दोन आडीच घंट्याची झोपबिक झाली नसलं कि पहाट्याखालं चार साडेचार वाजायच्या सुमारासं शिरूलं जागं आली.लवकरच उठून त्यानं जनावरायचं शेन काढलं,चारापाणी केला आण घरी येवूनं उजेडायची वाटं पाहु लागला.बाहिरचा काळोख नितळतं व्हता तसा तसा शिरू वसरीतं रोजदाराची वाटं पाहातं येरझारा मारतं व्हता.एवढ्यातं ईमलीनं गरमं चहाचा कप आणुनं शिरू जवळं देला आन ती सडा सारवणाच्या कामातं गुतली.ईकडं बाहीर पाहातं पहातं त्यो गरमागरम चहा शिरून ढसंढसं नरड्यातं वतला.शिरू भानावर नसल्यासारकाच वागतं व्हता.त्यो तिन तिनदा बाहीरचा उजेडं पाहातं व्हता.त्यानं कालचं रोजदारालं उजेडायच्या आतचं येयालं सांगतलं व्हतं,आत्ता चांगलं उजाडलं व्हतं पण आजून रोजदाराचा पत्ता नवता.न राहवुन शिरूनं पायात जोडा घातला आन थेट रोजदाराच्या घरालं निंघाला.त्यानं दरूज्याची कडी वाजवली तसं रोजदाराच्या बायकोनं आतुन दरूजा उघडला.रोजदारं पंख्याखाली ढाराढुरं झोपला व्हता.शिरूलं मनातुन रागं आलता कि आपुनं यालं कालचं लवकर जायाचं हे सांगुनबी हेव आंजुक झोपेलचं हे….! पण चेहर्यावरं रागं नं दाखवता शिरूनं रोजदारालं हाक मारूनं उठवलं.तसं जांभाळ्या देतं देतं रोजदारं उठला.त्याच्या तोंडालं रातच्या औषिदाचा वास आजून येत व्हता.रोजदार आरामातं आपलं एकेक काम आटपत व्हता.ईकडं शिरूचा जिव तगमगा व्हतं व्हता.तसं शिरूनं रोजदारालं लवकरं आटप मुन सांगतलं आन मी आलोचं आसं मनला.शिरू घराकडं वळला एवढ्यातं रोजदाराचा आवाज त्याच्या कानावरं पडला,“मालकं तेवढे पन्नासकं रुपये द्या नं साकर-पत्ती आन जराक्स सामायनं आनायचं दुकानावूनं…मी लगेचं आंघुळ करतो कि मंग लगेच निघु….!” शिरूनं मनातल्या मनातचं ईचारं केला,“मायझं यालं काल रातीचं तिनशे रूपये देलते आण आत्ता दिस उजडते का नायं तं याचे पैसं संपलंबी…..बसलं आसलं रातभरं पेताडतं…जाऊद्या आपल्यालं काय करायचं…!” शिरूच्या मनातं नाना ईचारं येत व्हते.त्यानं खिशातुनं शंभराची नोट काढली आन रोजंदारालं देली आन,“ पाच धा मिंटातं आलोच,आटपुन ठुयं..” आस सांगतलं. तसं त्या रोजगाराचे घर बायकोच्या पैशावरच चालायचं तो घरी रुपया बी द्यायचा नाही हेबी शिरूलं माहित व्हतं अन हेबी माहीत व्हतं की आता हे कोणता चहा घेणार आहे म्हणून ! पण नाईलाज होता आज काल कामावर माणसं भेटणं,माणसं संबाळणं,आन तेह्यच्याकडून काम करून घेणं लयं जिकिरीचं झालं व्हतं.शिरू रोजदारालं लवकरं आटपायचं बजावून गेलता.आन घरी जाऊन वापस येऊन शिरूलं अर्धा घंटा तरी झालता पण रोजदार जो बाहिर सामायनं आनायं गेलता ते काय अजून आला नव्हता. शिरूलं त्याचा ठेपा माहीत व्हता.शिरूनं दारूच्या आड्यावुन रोजदारालं गाडीवरं बसुन घेतलं. त्यालं धड गाडीवर बसता येत नव्हतं ते काय मोटार धरलं आसं शिरूलं वाटलं पण इलाज नव्हता.काय करणार? तसंच त्यालं गाडीवर बसवलं अन जीव मुठीत घेऊन गाडी चालवु लागला.रोजदारालं घेऊन शिरू शहराकडं निघाला. रोजंदारं त्याच्यासाठी पांढरा हत्ती झालता .पण पर्याय नवता.
शिरू,मेकॅनिकच्या दुकानालोक गेलाबी नवता कि तेवढ्यात रोजदारानं पुन्हा एकदा दहा रूपये चहा पाण्यालं मांगतले.शिरूपुढं मुकाट्यानं पैसे काढून देण्याशिवाय ईलाजच नवता.त्यानं स्वतालं रूपायाचाबीक खर्चं केला नवता.तेव गडबडी-गडबडीनं मोटर न्यायलं आलाता.थोड्यावेळानं मेकॅनिक दुकानाकडं आला. त्यांनं शिरुकडं पाहिलं,राम राम शाम शाम झाला.मेकॅनिकनं दुकान उघडलं,देवाची अन काउंटरची पूजा केली अन् चहा पाण्यालं निंघून गेला.इकडं शिरूचं सेकंदा सेकंदालं काळीज तुटत व्हतं. त्यालं सारखं शेतातलं पीक दिसतं व्हतं.कव्हा एकदा मोटर नेतो अन् भिजवतो असं त्यालं झालं व्हतं .काही झालं तरी शेतकऱ्याचं त्याच्या शेतातल्या पिकावर लेकरासारखं प्रेम असतं.पाण्या वाचून पीक सुकतं व्हतं,मानसांच्ं सोडा,मुकी जनावरं पण इकडं तिकडं जाऊन जगतील पण त्या जमिनीशी बांधलेल्या झाडांचं काय? ते एका जाग्याऊन हलू पणं शकतं नाहीत….. मेकॅनिकनं मोटरचं काम रातीचं करून ठेवलं व्हतं. शिरू खुश झाला . त्यांनं मोटारचे पैसे दिले अन् रोजदारासंगट गावाकडं निघाला.त्यांनं शहरातुन आल्या आल्याच भर दुपारीच ईहिरीत मोटर बसवली व्हती. आज संध्याकाळी कोंत्याबी हालतीत आपल्या पिकालं पाणी भेटणार यामुळं तो आनंदात व्हता. ईमली त्याची भाकर घेऊन शेतात आलती. आज ईमलीसंग बोलतानं त्याच्यात उल्लास जाणवत व्हता. आपल्या सुकलेल्या पिकालं पाणी भेटणार मनुन तो खुशीत व्हता. ईमलीसंगट शेतातले राह्यलेलं काम करतं करतं दिवस कसा गेला हे त्यालं कळलंच नाही.
घरी येऊन त्यांनं जेवण केलं. आता त्यालं शेताकडं जायाची गडबड झालती. कव्हा एकदा लाईट येते आणि आपण पिकालं पाणी देतो असं त्यालं झालं होतं .शिरू संध्याकाळचं जरा लवकरच शेतात गेला अन् शेकुटी पेटुन लाईनीची वाट पाहू लागला .त्यानं आंबराईतल्या डिपीकडं चक्कर मारली डीव-फिव,फ्युज तपासले.मंग मोटरिकडं जाऊन मोटारीचे फ्युज ,आर्थींग चेक केले.तेव लायटीची वाट पाहतं उताविळ झालता. एकाजागी त्याचा पाय ईसावतं नवता. तेवढ्यात त्याच्या पायाखालं कायतरी वळवळुनं पुढं गेलं. शिरू थरारला….. त्याच्या अंगावर काटा आला . एकदम घाबरल्यानं त्याचं आंग वल्लचिंब झालंतं. जसं ते जनावर आलं तसं ते निघूनही गेलं.भलामोठा सरोप व्हता तेव..! शिरू भानावर आला,अनं परत शेकुटीजवळ येऊन बसला. सगळ्याच्या आधी शिरू शेतात आलता.बाकीचे जागलकरी मागून आले व्हते. गप्पाटप्पा रंगल्या.मंग रातचे अकरा वाजायची येळ झाली तसं शिरूच्या मनात उत्कंठा दाटली. कव्हा एकदाची लाईट येते अन् मोटार चालू करतो असं त्यालं झालतं. घड्याळात बराबर अकराचा काटा पडला आणि धडाडऽऽऽ धमऽऽ धमऽऽऽ आवाज घुमला.धस्स..ऽऽ चरऽकन…शिरूचं काळिजचं चिरल़ं. सगळेजनं आवाजाच्या दिशेनं पळाले.
आमराईतला डिपू जळाला व्हता.हे पाहुन शिरू फतकन खालीच बसला.त्याच्या डोक्या-तोंडावून घामं वघळतं व्हता. शिरू स्वताशीचं पुटपुटला,“मायझं या डीपूच्या… यालंबी आत्ताच जळायचं व्हतं तं….याच्या भरोशावर राहिल्या पक्शा शेंदून जरी पिकालं पाणी दिलं असतं तरी तीन दिसात सगळं पीक भिजवनं झालं असतं !!!” पण परिस्तीतीपुढं कुणाचं चालत नाही तसं झालं व्हतं. सगळे शेतकरी कावरेबावरे झालते. एकट्या शिरूचीच नाही तर सगळ्यांची तीचं परिस्तीती व्हती.
डी.पी. जळाला व्हता.पिकं करपाया लागली व्हती. शेवटी सगळ्या शेतकऱ्यांयनं वर्गणी गोळा केली.परत्येकाच्या वाट्यालं पाच पाच हजार रुपये आले व्हते. शिरूनं कालच बाळ्या मोडून मोटर भरून आणली व्हती. त्याच्याजवळ पैसाच नवता. घरात ईकाय-टिकायलंबी काही नवतं.आता काय करावं या काळजीत तो पडला व्हता. तेवढ्यात त्यालं मुरली शावकार आठवला.तो तसाच मुरली शावकाराकडं गेला. मुरली शावकार आपल्या जवळच्या तचोपडीत डोकं खुपसुनं कायतरी हिसाब किताब करत बसला व्हता.मुरलीशावकारानं शिरूकडं तीरपट नजरनं पाह्यलं अन् परत हिसाबात गुतला. पाच-दहा मिनिटं असंच होतं राहिलं.शिरू खाली जमिनीवर मुकाट्यानं टक लावून बसला व्हता. मुरली शावकारांनं आपली हिसाबाची चोपडी बंद करून ईचारलं ,“काय रं शिरू, कसं काय येणं केलं ?”
तसं शिरू मनला, “मालक…! जरा पैशाची नड व्हती.”
“किती रूपे पायजेतं?” मुरली शावकारानं ईचारलं.
“पाच हजार मालक!”शिरू एका दमातं बोलला.
तसं मुरली शावकार मनला,“हे बघ शिरू,तुलं तं माईतच हे की सद्या धंदा लय मंदा हे.सध्या बाजारबीक मंदा चाललाय.त्यात मलं पण पैशाचा वांदा हयं. पण तू आपला नेमीचा मनुनं तुलं पाच हजार रुपे देतो, पण तुलं महिन्याचं महिन्यालं व्याज द्यावं लागलं. वरतून माझं पैसं गहू निघलं की द्यावं लागतील.”
तसं शिरू निमुटपणे हो मनला त्याने शावकाराकडून पाच हजार रुपये घेतले पैसे देतानीच शावकारानं चालू महिन्याचं व्याज त्यातनं काटुन घेतलं व्हतं.
शिरू आन बाकीचे शेतकरी पैसे गोळा करून वीज महामंडळाच्या हापिसात गेले, हाफिसात कोणबी नव्हतं.सायेबलोकं चहा पाण्याला गेलेतं आसं तिथंल्या शिपायानं सांगतलं.मं ते ऐकुन सगळेजण तिथच बसून राह्यले. तेवढ्यात हालत डुलत शांतपणे तमाखूचे तोबारे भरलेले दोन-तीन बाबू हाफिसात आले.ते फायलांचा गठ्ठा चाळू लागले. मग शिरू व इतर शेतकरी घाबरत घाबरत सायबाकड गेले.हापीसर सायबानं तोर्यानचं ईचारलं की,“काय रं कुठलं तुम्ही ? ईथं काय कामं काढलं…?” तसं शिरू मणला की ,“आम्ही खालच्या आंधारवाडीचे होतं.आमची आंबराईतली डी.पी जळालीयं . आम्ही डी.पी चे पैसे गोळा करून आणलेतं. तेवढं डी.पी जोडून द्याल तं लय बरं व्हईल बघा..पंधरादी तिन हाप्ते झालेतं पिकालं पाणी नाही…पिकानं माना खाली टाकल्याती…हाता तोंडालं आलेलं पिक पाण्यावाचुनं करपायलं वं पाहुबी वाटयनं झालयं तव्हा तेव्हडं लायनीचं पाहा नं जरा….दया करा सायब…..!”
शिरूनं आसं मनताचं बाबू म्हणाला,“अरे तुमच्या आंधी नऊ ते दहा नंबर हेतं. तुम्हालं दोन-तीन दिसं तरी लागतील. दोन दिवसांनं या. आज पैसे भरून टाका” बाबूंनी तसं मनताच शेतकरी गयावया करू लागले होते,“सायेब एक दोनं दिसातं जर पिकालं पाणी भेटलं नायनं तं पिकं हातची जातातं हो!” हे सांगतानं शेतकर्यायनं थरथरत कापरे हातं सायबालं जोडले.मठ्ठ सायबावर त्याचा कायबी परिणाम झाला नाही. साहेबांनं हापिसातल्या शिपायाकडं पाहिलं आन इशारा केला तसं त्या शिपायानं सगळ्यांयलं हापिसातून हाकलून लावलं.शिरूच्या तं पायाखालची वाळूचं सरकली व्हती.एक तं बायकोच्या बाळ्याबी मोडल्या व्हत्या वरतुन शावकाराकुनं पाच हाजाराचं कर्जबीक उचललं व्हतं…राहून राहून शिरूलं डोळ्यापुढं उभ्या शेतातलं वाळलेले पीक दिसत होतं.आता काय करावं त्यालं चिंता खातं व्हती.
सगळे शेतकरी चिंतेत पडले.एवढ्यातं तेह्यलं जिल्हा परिषद मेंबर भाऊसायबाची आठवण झाली. भाऊसायब निवडणुकीच्या प्रचारालं गावात आलते.तव्हा सगळ्यायलं मनले व्हते की,“तुम्ही माझ्याकड चोविस तास कव्हाबी या. मी तुमच्यासाठी हजर आसेन.” सगळ्या गावानं तेह्यलं मोठ्या मतायनं निवडून देलं व्हतं. भाऊ साहेबांच्या विरोधात आमदाराचा माणूस पडला व्हता.मनुन आमदार सायेबबी भाऊसायबाच्या जिल्हा परिषद सर्कल मध्ये तेवढं ध्यानं द्यायचे नाहीतं.तरीबी सगळेजनं मोठ्या आशेनं भाऊसायबांच्या घराकडं गेले. भाऊसायेब लहान नातवंड पतवंडांसंग खेळतं व्हते.तेह्यनं शेतकऱ्यायकडं पाहिलं न पाह्यल्यासारकं करून पुन्हा आपल्या लहान लेकरायसंगं खेळण्यात गुतले. इकडं सगळे शेतकरी बैठकीत खाली बसले व्हते. घंटा दीड घंटा झाला तरी भाऊसाहेब फिरकले नाहीत. शिरू जाऊन नोकराला भेटला. नोकरानं सांगतलं की भाऊसायब तं कव्हाचेच जिल्ह्याच्या ठिकाणी महत्त्वाच्या बैठकिलं गेले. भाऊसाहेब मागच्या दारानं गाडीत बसून गेले व्हते. गौतमी नावाच्या कलावंतीनीचा जवळच्याचं गावातं लावणीचा कार्यक्रम व्हता. भाऊसाहेब जिल्ह्याची बैठक मनुनं तिकडं गेलते,हे मागावूनं सगळ्यायलचं कळलं.निवडणुकीच्या टाईमलं मतं मागतांनी पाया पडणार्या भाऊसाहेबानं आज तेह्यलं साधं पाणी पण ईचारलं नवतं.सगळेजण नाराज झाले.आत्ता कायं करावं या ईचारातं पडले.
आंधारवाडीच्या शेतकर्यायलं आत्ता आमदार साहेबांची आठवण आली.तेह्यलं वाटलं की,‘ बा जे झालं, ते झालं ,एकदा आमदार साहेबाचे पाय का धरणं व्हईनं धरू…! एकदाचं नाक रगडू,माफी मागु पण एकदाचं डी.पी च काम करून द्या अशी विनंती करू आस ते एकमेकांत मनु लागले.’आमदार सायेब आपलं कामं करतीलं असं तेह्यलं वाटलं.मंग सगळ्यांनी मिळून ठरवुनं आमदार साहेबांच्या बैठकीत गेले.तिथं आमदार साहेब त्यांच्या कार्यकर्त्यांच्या गराड्यातं हासण्या खिदळण्यातं रमले व्हते.कसल्यातरी फुटकळ विनोदावर ते सगळे मिळून जोरजोरात हसत व्हते.शिरू आन संगच्या गावकर्यायलं हे पाहून कसतरी किळसवाणं वाटतं व्हतं.ते विनोदालं हासायले का आपल्यावर बितलेल्या परिस्थीतीलं हासायलेतं हे तेह्यलं समजयनं गेलं.आमदारसाहेबं शेतकर्यायच्या केविलवाण्या परिस्थितीची मजा घ्यायलेत का कायं आसं तेह्यलं वाटू लागलं. राहुन राहुनं तेह्यलं डोळ्यासमोर तेह्यचं वाळायलेलं,करपायलेलं,माना टाकलेलं पीकचं दिसत होतं. सायबांनी तेह्यच्याकडं पाहून नं पाह्यल्यासायखचं केलं.ते आमदार साहेबालं बोलाय गेलते पण आमदार साहेबांनी त्यांच्याकडे एक नजर टाकली अन पुन्हा ते कार्यकर्त्यासंग गप्पांत रंगले.शेवटी सगळं आवसन एकवटूनं शिरू उभा राह्यला अन न राहवुन तो आमदार साहेबाला बोलला की,
“साहेब आम्ही खालच्या अंधारवाडीवुन आलोय आमच्या शेतातली लाईन मांघच्या पंधरादी तिन वारापसुनं नाही.मोटरी बंद आसल्यानं पिकालं पाणी देता येईन. पीक वाळून,करपुन चाललेत.आता काय ते एकदाच तुम्हीच पहा आणि आम्हाला डी.पी तेवढी द्या…!”
असं मंताच आमदार साहेब म्हणले, “अरे तुम्ही त्या भाऊसाहेबांच्या जिल्हा परिषद सर्कल मधले नां…त्यालं भेटले नाही का ? अरे तिथून तर आम्हाला मतदानच नाही. मंग आम्ही कसं काय तुमचं काम करायचं…. आं….. सांगा नं………..”
तसं शिरू मनला ,“ भाऊसायब झालं गेलं ईसरून जा….वाटलं तं कान पकडतो,पाया पडतो,लयच वाटलं तं दोन थोबाडीत द्या….आम्ही लेकरायची शपथ घिऊन सांगतो की ईथुन पुढं आम्ही तुम्हालं कव्हाचं सोडणारं न्हाही…कायमचं तुमच्याचं पाठीमाघं राहु…आमचे पिक वाळायलेतं आत्ता तुम्हीचं आमचे मायबाप आहातं…तेव्हडं डी.पी.चं काम करूनं द्या…”
आसं मनुन शिरूनं आमदारं सायेबाचे पाय धरून गडबडा लोळतं गवरू लागला.त्याच्यासंग आलेले शेतकरीबी आपल्या टोप्या,फेटे काढून खाली ठुवूनं कानं धरून गुडघ्यावरं बसले…तेवढं डि.पी.चं काम करून द्या आसं मनु लागले. भाऊसाहेब धुर्तपणे त्याह्यच्याकडं पाहत हासले अन म्हणले,“ते काय आहे,मी कव्हाच माझ्या मतदारसंघातल्या लोकांकडं आपल्या पक्षाचे का दुसऱ्या पक्षाचे असा भेदभावं करत नाही.मी तसं तुमच्यासंगं येऊनं त्या एम.एस.ई.बी वाल्या इंजिनियर लोकांना सांगितलं असतं पण मला अर्जंट कामासाठी मुंबईलं जायचयं.मुंबईला आज संध्याकाळची गाडी आहे.तव्हा घंटा दिड घंटा तं आटपायलचं लागल,म्हणून काय आत्ता त्या एम.एस.ई.बी.च्या हापिसात येणं व्हतं नाही, तवा पुढं भविष्यात काही काम पडलं तं बिंदास माझ्याकडे या….आता मलं मुंबईला जायचयं…चला राम राम………”
सगळ्या शेतकऱ्यांना आमदार सायबांचं राजकारणं ढळढळीतपणे कळतं व्हतं.तसं पाहिलं तं आमदार साहेबं नुसत्या फोनवर सुद्धा तेह्यचं काम करू शकत व्हते.पण काहीतरी सांगून लोकायलं हाकलून द्यायचं म्हणून तेह्यनं मुंबईलं जायच कारण काढून शेतकऱ्यांना बगलं देलती.
सगळेजण नाराजीनं गावाकडं आले. शिरू माळवदाकडं एकटक पाहत घरातच झोपला व्हता. आज त्याची शेतात जायाची पण हिम्मत व्हत नवती.शेतातलं सुकलेलं पीक पाहिलं की त्याला कसंनुसं व्हयाचं.त्याचा जीव जळायचा. शिरूलं दिवसभर लयं दगदग झालती.दिवसभराच्या दगदगीनं त्यालं ग्लानी येऊन झोपं लागली व्हती.झोपतं त्यालं त्याचा मळा दिसतं व्हता.मळ्यातल्या पिकानं आपल्या माना टाकल्या व्हत्या.त्या पिकातं त्यालं कसलीतरी हालचालं जाणवतं व्हती.मनुन तो त्या पिकातं घुसुन चौकडं कोण पिकातं घुसलयं मणून पाहु लागला…आसं करता करता तो पिकाच्या मंधात आला….पाहतो तं कायं पिकातं हालचालं करणार्या त्या आकृतीनं शिरूच्या भवताल गोलाकार रिंगन केलं ती भलीमोठी माजलेली रानडुकरं त्यालं त्या रिंगणात दिसतं व्हते.त्यानं निरखुनं पाह्यलं तं त्यालं आसं दिसलं की त्या माजलेल्या रानडुकरांचे चेहरे त्यालं आमदार सायेब,तेह्यचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद मेंबर भाऊसाहेब तेह्यचे नातवंड, एम.एस.ई.बी.चे अधिकारी,लाईनमेनं,हापीसातुन बाहीरं काढणारा शिपाई,कामवर येऊन उपकार करणारा रोजदारं,व्याजानं पैसे देऊन उपकारं करणारा मुरली शावकारं,सोनं ईकतं घेऊन उपकार करणारा नागनाथं सोनारं ,आदी लोकांसारके दिसतं व्हते.त्यालं जाणवू लागलं की त्याचं आंग करपायलयं….
ईमली पाण्याचा लोटा घेऊन त्याच्याकडं पाणी द्यायलं येतेयं आनं त्याच्या भवतालचे आमदार सायेब,तेह्यचे कार्यकर्ते, जिल्हा परिषद मेंबर भाऊसाहेब तेह्यचे नातवंड, एम.एस.ई.बी.चे अधिकारी,लाईनमेनं,हापीसातुन बाहीरं काढणारा शिपाई,कामवर येऊन उपकार करणारा रोजदारं,व्याजानं पैसे देऊन उपकारं करणारा मुरली शावकारं,सोनं ईकतं घेऊन उपकार करणारा नागनाथं सोनारं ,आदी लोकं रिंगण करून मोठ मोठ्याने पहाडी आवाजात खलऽऽखलऽऽखलऽऽखलऽऽ असे हसत व्हते…आपले हात उंचावत व्हते…वेडे,वाकडे,चाळे करून शिरूलं घाबरवत पाणी पिऊ देतं नव्हते.तिकडून इमली पाण्याचा लोटा घेऊन शिरूकडे धावत येत व्हती पण इमली आणि शिरूच्या मंधात रिंगणात सामीलं सगळ्या लोकायनं मोठी भिंत केलती.
पाण्याबिनं शिरू सुकून जात व्हता,एकदम करपून जात व्हता…ईमलीच्या हातातला पाण्याचा लोटा त्यालं पुढ्यातच दिसतं व्हता पण त्यालं ते पाणी पिता येत नवतं.आण्याआभावी त्याचं शरीर विरघळू लागलं अनं अचानक शिरू मोठ्याने ओरडला,
“ वाचवा,वाचवा,वाचवा… !” तसं धावतच घरातून इमली पळत आली. तिन हातातल्या तांब्यातल्या पाण्यानं त्याच्या तोंडावर सपकारा मारला अन,“काय झालं ?असे का ओरडायलातं… झोपतं काही वंगाळ सपनं पडलं का कायं वं ?” असं म्हणत त्यालं जागी केलं.शिरू खडबडून उठला.त्यांनं अवती-भवती पाहिलं.त्याच्यापुढे ईमली बसली व्हती.तिनं त्यालं तांब्यातलं पाणी दिलं. तसं त्यांनं हावरटासारकं ते पाणी घटाघटा पिलं.“स्वप्न होतं तर” असं मनतं सुस्कारा सोडला… आणि बैलाचा चारापाणी करायलं तो गोठ्याकडं गेला…
दुसऱ्या दिशी भल्या पहाटं आंबराईतले सगळे शेतकरी ट्रॅक्टर घेऊन डीपी आणायला गेलंते. तिथं सायब जाग्यावर नवता.दोन-तीन घंट्यानं सायब आले. त्यांनं जरासा टाईमपास केला. इकडं शेतकर्यांचा जीव भिजवनीसाटी तिळंतीळं तुटतं व्हता. मग दोन चारशे रुपये दिल्यावर सायबानं डीपी रिलीज करूनं दिला.डीपी ट्रेक्टरातं लोडं करताच शेतकरी उत्साहानं नाचाया लागले.आत्ता शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला व्हता.शिरू तं गळ्यातला रूमालं हवेतं भिरकावतं बेधुंद होऊन नाचतं व्हता.उत्साहानं सगळे शेतकरी डी.पी घेऊन नाचतं नाचत गावाकडं निंघाले.लाईनमननं डीपी बसवून दिला.आत्ता संध्याकाळी मोटर चालू करणार मनुनं सगळे शेतकरी आनंदात व्हते. डी.पी बसवुनं दुपारच्यालं सगळे घरी आले. घरी येऊन बैठकीत बसले.ईमलीनं मस्त गुळाचा फक्कड चहा बनवुन आणला व्हता.शिरूनं कप उचलला.गरमा गरम चहाचा एक घोट पिला.तेवढ्यात गावात दवंडी आली. ऐकाऽऽ होऽऽ ऐकाऽऽ ज्या कोण्या शेतकऱ्यानं आपल्या शेतातल्या मोटरीचे बिलं भरली नाहीत त्यांना ताबडतोब आपल्या मोटारीचे बिल भरावे ..हो ऽऽऽ जोपर्यंत बिल भरले जातं नाहीत.तव्हरोक शेतातली लाईन चालू होणार नाही होऽऽहोऽऽ ओओओऽऽऽ हे ऐकून शिरूच्या अंगातलं बळच निघून गेलं…. तेव थरथरतच मटकनं वसरीतं बसला….. वसरीत शेतातल्या लाईन चा केबल पडलेला व्हता… शिरूनं हातात काठी घेतली आन दणऽदण ऽदनाऽऽ दनऽ……त्या काठीनं त्या वायरावर रट्टे मारायला लागला……..मारतचं राह्यला…..!
© गोडाती बबनराव काळे
9405807079
Leave a Reply