आज दीपपूजनाचा दिवस…
सनातन हिंदू संस्कृती जपणा-या प्रत्येक घरात आज, ‘तेज’ आपल्यापर्यंत आणणा-या दिव्यांना पुजलं जातं…
काही घरात आज दिवे स्वच्छ धुवून केवळ पुजले जातात तर काही ठिकाणी हेच दिवे स्वच्छ धुवून पुन्हा एकदा लावले जातात ..पद्धती वेगळ्या मात्र भावना सारखीच…
मानवाची उत्क्रांती झाली, निसर्गात असलेल्या किमयांचा एक एक करून मानवाला शोध लागू लागला…त्याचे वेगवेगळे उपयोग मानव करू लागला…
मात्र अग्नी आपल्यापुढे कुठल्या रूपात प्रदीप्त झाल्यावर त्याचे आपल्यावर काय परिणाम होतात हे मानवाला समजायला अनेक वर्षांचा काळ लोटला…
उदाहरणार्थ होळीची पूजा करताना आपल्यामधे एक ऊर्जा संचारते..काही काळ होळीसमोर उभं राहिल्यावर अंगात शक्ती संचार झाल्याचा अनुभव आपण नक्कीच घेतला असणार. वाईट शक्तीला भस्म करून वातावरणात प्रचंड सकारात्मकता पसरवण्याचं सामर्थ्य होळीत आहे.
हेच जर का आपण चिते समोर उभे असू तर गेलेल्या देहाला सद्गती मिळावी ,त्याची वाईट कर्म अग्नीत भस्म होऊन पावित्र्य घेऊन त्याने पुढल्या प्रवासाला निघावं ही भावना आपल्यात निर्माण होते..मन काहीसं उदास असलं तरी त्यातही नकारात्मकता जाणवत नाही. मात्र होळीइतकी ऊर्जाही जाणवत नाही.
देवघरातल्या दिव्यासमोर बसलं की मात्र जो परिणाम आपल्यावर होतो तो या सगळ्याहून वेगळा..मला नेहमी असं जाणवतं की देवघरातला दिवा लावला, मग तो समई च्या रूपात असो ,लामण दिवा असो, निरांजन असो किंवा अगदी पणती असो….हा दिवा लागताच एक दिवा आपल्या आतही प्रज्वलित होतो..आपल्याला आतून शांत करणारा , दिवसभरातले विचार बाजूला सारून मन निर्विकार करणारा..मन शुद्ध करणारा..म्हणूनंच सायंकाळच्या वेळेला दिवेलागणीची वेळ म्हणतात. आपल्या हिंदू संसकृतीत याला अनन्यसाधारण महत्व आहे. दिवसभराची कामं, धावपळ सगळ्यातून आपण काही मिनिटं स्वतःकरता काढणं अत्यावश्यक असतं…रोजच्या रोज मनाचं हे शुद्धीकरण होऊन पुन्हा दुसर्या दिवशी एक स्वच्छ मन (mindset) घेऊन आपण दिवसाची सुरूवात करावी हा मोठा विचार यामागे केलेला आहे..
काळाच्या ओघात दिवेलागण, शुभंकरोती म्हणणं मागे पडलेलं दिसतं…
आता मात्र आपण हे न चुकता करावं व आपल्या पुढल्या पीढीलाही हे करण्याकरता प्रेरित करावं.. तरंच हे संस्कार पिढ्यांपिढ्या हस्तांतरित होऊन टिकून राहतील..
ll शुभम् भवतू ll
ll तेजस्वी भव ll
-गौरी सचिन पावगी
Leave a Reply