दीपावली हा सण व दीपोत्सव आहे. संपूर्ण भारतात हा साजरा केला जातो. शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी आश्विन कार्तिक महिन्यांच्या संधीकाळात हा सण येतो. येथून शेतकर्यांच्या सुगीच्या दिवसांना आरंभ झालेला असतो. सध्या सर्वांना असे वाटते गरुद्वादशीपासून भाऊबीजेपर्यंत दीपावली असते. पण दीपावली ही नरक चतुर्दशीपासून बलिप्रतिपदेपर्यंत असते. याला जोडून गुरुद्वादशी, धनत्रयोदशी येतात व बलिप्रतिपदेला जोडून किंवा काही वेळा याच दिवशी भाऊबीज येत असल्याने असा समज झाला असावा.
दीपावली हा दिव्यांचा सण आहे. दीप शब्दाची व्याख्या “दीप्यते दीपयति या सत्वं परंचेति” म्हणजे जो स्वत: प्रकाशतो किंवा दुसर्याला प्रकाशित करतो तो दीप (दिवा) होय. दीप हा अग्नीचे किंवा तेजाचे रूप आहे. या दिव्यांचे आकार निरनिराळे आढळतात. प्रकाशाचे एक साधन या दृष्टीने दिव्याला अत्यंत महत्त्व आहे. कालिका पुराणांत – दिव्यामुळे विजय मिळवता येतो, दीप हा तेजोमय आहे. तो धर्म, अर्थ, काम, मोक्षप्रद आहे. म्हणून दीप प्रज्वलित करावा असे सांगितले आहे.
सांप्रत अनेक कुटुंबात सांजवात करण्याची प्रथा आहे. त्यावेळी श्लोक म्हणतात – “दीपज्योती: परं ब्रह्म दीपज्योतिजनार्दन: । दिपो हरतु पापानि संध्यादीप नमोऽस्तुते ।।”
दिव्यांची त्या-त्या प्रसंगानुरूप नांवे आहेत. दिवाळीमधील दिव्याला आकाशदिवा, लग्न वगैरे कार्यात वापरला जातो, तो लामण दिवा दिव्याच्या अमावस्येला, विवाहात ऐरणीदानावेळी वापरतात तो पिष्टदीप (पीठाचा दिवा), देवळात अखंड नंदादीप, पूजाकर्म वगैरे वेळी वापरतात तो स्थापित दीप वगैरे.
दिवा ओवाळण्याच्या क्रियेला औक्षण असे म्हणतात. औक्षण म्हणजे आयुष्यवर्धन होय. म्हणून दिवा ओवाळण्याने आयुष्यवर्धन होते. (सध्या दिवे चालवण्याची प्रथा जास्त ठिकाणी आढळते.) दीप बुद्धीचे व ज्ञानाचे प्रतीक आहे. “तमसो मा ज्योतिर्गमय” म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे ने. अशी प्रार्थना उपनिषदांत आढळते.
शरीरातील जीवन तत्त्वाला प्राणज्योत म्हणतात.
— विद्याधर करंदीकर
Leave a Reply