ग्रंथ दर्शन
दिवाळी म्हणजे दिव्यांचा-प्रकाशाचा उत्सव! अंधाराकडून प्रकाशाकडे व अज्ञानाकडून ज्ञानाकडे जाण्याची प्रेरणा देणारा दिपोत्सव! हल्लीच्या शिक्षणाने मार्क मिळतात, कधी-कधी नोकरी मिळते त्यातून बऱ्याचदा चांगले पैसेही मिळतात मात्र सन्मानाने व सर्वार्थाने जगण्याचं ज्ञान मिळतंच असं नाही. ते मिळण्याची सोय आणि व्यवस्थाही नाही. म्हणूनच ते ज्ञान आपल्याकडे दुर्मिळही आहे. बऱ्याचदा अज्ञानातच सुखही असतं. किती चांगलं किती वाईट ते माहित नाही, पण असतं, अज्ञानातही सुख असतं. कधी जगाविषयीचं अज्ञान असतं तर खूपदा स्वतःविषयीचंही असतं. मी कोण? मी कशासाठी आलोय? मी कशासाठी काय करतोय? काही थांग-पत्ता नसतो. बस्स, काहीतरी करायचं असतं आणि कसंतरी जगायचं असतं! यातून मार्ग काढण्यासाठी-त्या मार्गावर प्रकाश दाखवण्यासाठीच बहुदा दिपोत्सवाची योजना असावी!
प्रत्येकालाच वाटतं दु:खाकडून आनंदाकडे, गरीबीकडून श्रीमंतीकडे, असमाधानाकडून समाधानाकडे जावं. आनंद आणि दु:ख हे बाहेरील घटकांवर व घटनांवर अवलंबून असतात की, आपल्या मानसिकतेवर की या दोन्हींवर हे जाणून घेतलं तर हा प्रवास सोपा होऊन जातो. याशिवाय आनंदाचेही अनेक प्रकार. स्वतःसाठी घाम गाळून मिळवलेला आनंद, इतरांसोबत वाटून घेतलेला आनंद, काहीही न करता फुकटात मिळालेला आनंद आणि इतरांच्या दु:खावर शेकून घेतलेला आनंद. फटाक्यांच्या आवाजाने इतरांच्या कानठळ्या बसवणारा व धुरामधून प्रचंड प्रमाणात प्रदुषण करून मिळणारा आनंद आणि अंधारातून लुकलुकत्या पणत्यांना बघून मिळणारा निरागस-निखळ आनंद. यातून खरा आनंद शोधण्यासाठी सारासार विवेकबुद्धी व ज्ञानचक्षुच कामी येणार.
श्रीमंतीचा ध्यास असावाच! परंतु कसली श्रीमंती? मनाची, विचारांची, कर्तृत्वाची की नुसतीच कागदी पैशांमध्ये मोजता येणारी? कारण पैसा आला म्हणजे सुख-शांती व समाधान येईलच याची काही शास्वती नाही. त्याने फार-फार तर व्यवहार चालू शकेल तो आवश्यक आहेच, परंतु ज्यासाठी हा खटाटोप चालतो त्या इतर बाबींचं काय? कारण शेवटी आनंद-सुख व समाधानसुद्धा मनाची अवस्थाच आहे आणि ती काही पैशाने किंवा इतर कशाने विकत घेता येत नाही.
लाख घडोत चुका मात्र जाणिव थोडी हवी. कमी-अधिक प्रमाणात प्रत्येकाकडून चुका होतात. कधी जाणून-बुजून तर कधी अजाणतेपणी व नकळत. चुकांचा साक्षात्कार झाल्यावर त्यात सतत सुधारणा करून वाटचाल केली तर सत्कृत्यांकडे जाण्याचा मार्ग सोपा होईल. त्यातूनच चुकांचे प्रमाणही आपोआपच कमी होत जाईल. प्रयत्नांमधून चुका वजा केल्या तर उरतं ते यश व प्रगती.
व्यसनं शारीरिक असतात तशी मानसिकही. हल्ली मानसिक व्यसनंच जास्त. नकारात्मकता, वैफल्य, निष्क्रियता अशी एक ना अनेक. सर्वच व्यसनं दुहेरी नुकसान करतात. एक तर ती तुमची शारीरिक-मानसिक झीज करतात आणि दुसरं म्हणजे प्रगतीच्या मार्गात धोंडा बनून राहतात. म्हणूनच प्रयत्नपूर्वक कोणत्याही व्यसनांपासून दूर राहण्याचा व आळसाकडून उद्योगीपणाकडे जाण्याचा संकल्प या दिव्यांच्या साक्षीने करू या. कारण आजच्या काळात शारीरिक-मानसिक आरोग्य हीच मोठी धन-संपत्ती झालेली आहे.
अज्ञानातूनच अंधश्रद्धेचा जन्म होतो त्याने मग अवघं जीवनच अंध:कारमय होऊन जातं. तर ज्ञान-विज्ञानाच्या प्रकाशाने संपूर्ण विश्वच मानवी जीवनाच्या कल्याणाने आणि प्रगतीने न्हाऊन-उजळून निघतं.
म्हणूनच या दिवाळीला आनंद-सुख-शांती-समाधान-ज्ञान-विज्ञान यांचा खरा-खुरा दिपोत्सव म्हणूनच साजरा करू या! मना-मनातील व जना-जनातील या आगळ्या-वेगळ्या दीपोत्सवासाठी खूप-खूप शुभेच्छा!
श्री.नरेंद्र जोशी ठाणे
Leave a Reply