देहाच्या बाहेर मन आसक्त होते
गात्रे शांत शिथिल डोळे विरक्त होते
मोहाच्या सावरीत तुझ्यात फुलून गेले
श्वासात बंद लय अंतरी सरगम उमलून गेले
ओठ तुझ्या ओठांसाठी आरक्त व्हावे
तुझ्या स्पर्शासाठी भाव मुग्ध व्हावे
मिठीत तुझ्या अलवार चांदणे मोहून जावे
तुझ्या बाहुत अलवर विरघळून जावे
न सोसवते रात्र बेरात्र तुझ्यात मन गुंतावे
तुझ्या भेटीत कितीक भाव अबोध गुंतावे
मिठीत तुझ्या स्पर्श माझे अबोल लाजून मिटावे
कितीक क्षण जातील असे भान तुझ्यात मिटावे
अंतिम प्रवासी जाईल नौका मरणं सांगून न येते
अनंतात विलीन होईल देह वेळ न सांगून येते
आरक्त मन लोचनात जाणिव विरक्त आहे
भेट तू लवकरी व्यक्त राधा साद घालत आहे
तुझ्या ओढीत मन अबोल अलगद लाजले
तुझ्यात माझे भाव विरघळून हृदयस्थ लाजले
कुंजवनात ऋतुराज बहरुन वेळ लुब्ध दाटे
भेट तू सांजसमयी तुझ्याविना व्याकुळ क्षण दाटे
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply