नवीन लेखन...

देहात भरून घ्यावा सूर्य…

पूर्वेला लाल रंग पसरु लागला की दिशा उजळू लागतात. हवेत वाढलेला प्रचंड गारठा जाणवू लागतो,दरी-खो-यातून धुके दाटून येते. धुके म्हणजे अस्पष्ट आभाळी पडद्यासारख्या भींती जागोजागी आडसर जणू,दुरून पाहतांना वाटत राहते पार करता येणार नाही तरीही अस्पष्ट विचारांचे दिशाहीन साशंक मन सोबत घेऊन चालत राहतो आपण कितीतरी वेळ उगाच जीवनाच्या अपरिचित वाटा. कधी अंतरंगात साचत जातो दु:खाचा साठा,कधी आपल्याच प्रिय स्वप्नांना,इच्छा-आकांक्षानां मारून फाटा करत राहतो केविलवाणा आटापिटा. आपल्याच कर्तृत्वाचे घटित-अघटित,भले-बुरे वाट्याला आलेले सारे पीत असलो गटगटा तरी देखील कळत नाही आपल्याच विरोधात का शिजत राहते क्रुर नियतीचे कारस्थान रटारटा? तरीही आपसूक अपयशाच्या माथी घेऊन लांबचलांब वाटा पार कराव्या लागतील बिनबोभाटपणे यशाच्या हुलकावणा-या लाटा. खरं तर जवळ गेल्यावर जाणवते आड येणारे धुके म्हणजे नसतेच काही फक्त धूराशिवाय. आतही धुके अन् बाहेरही धुकेच. धुक्याचे धुरकट रंग म्हणजे संदिग्ध,अस्पष्ट सावल्याच जणू. शुभ्रतेमधला गोजिरवाणा आडसर अन् आकशाच्या निळाईवरची सुंदर कलाकुसरही असते धुके.

विस्तीर्ण पसरलेल्या डोंगररांगामधून डोकावणारा सूर्य म्हणजे कडाक्याच्या थंडीत मिळालेल्या उबदार जाणिवेची प्रेमळ चाहूल किंवा पृथ्वीवरील सर्व प्राणी मात्रांना जीवन देणारी मायेची झूल तर कधी गोरगरीब कामगारांच्या पोटात लागलेली भुकेची आग शमवणारी चूल कधी झाडावर उगवलेले टवटवीत फूल तर कासेत ढुसण्या मारणा-या वासरांसाठी आसूसलेला पान्हाळलेल्या गायीचा पूल. अंधारावर प्रकाश किरणांचे करून वार चालत येते प्रकाशाची शुभ्र धार. रात्रभर कुडकुडत पडलेल्या जिवाला आस लागावी उबदार स्पर्शाची तेंव्हा कळते किंमत सूर्यप्रकाशाची.

सोनेरी उन्हाची शाल अंगावर लपेटून घेतांना आख्या देहात भरून घ्यावा सूर्य अन् उगवावे आपणही निरुत्साहाच्या विशालकाय डोंगरापाठीमागून रोज अन् उजळून टाकावे स्वत:सहित सा-या जगाला. चमकत रहावे कर्तृत्वाचे किरण होऊन गवताच्या पात्यापात्यांवर मोत्याप्रमाणे,कधी फुलाप्रमाणे व्हावे टवटवीत अन् ओवून घ्यावे स्वत:ला दिवसाच्या अखंड माळेत. नाही तर रागाने व्हावे तप्त लाल इथल्या मुर्दाड आणि भ्रष्ट अशा व्यंवस्थेवर प्रखर सूर्यासारखे,काही वेळापुरते का होईना बसावे दडून ढगाच्या आड जाऊन. सारे ताणतणाव विसरुन अन् घ्यावा मोकळा श्वास,पुन्हा सुरु करावा झाडापानांतून किलबिलाट. अलगद उतरुन नदीकाठावर भरुन घ्यावा उरात थोडा प्रकाश अन् नेऊन ठेवावे स्वत:ला कुठल्याही अज्ञात अंधाराच्या गुहेत तरीही सापडते वाट आपल्याला. केवढी ताकद असते सूर्यप्रकाशात बारा हत्तीची. निबीड आंधाराच्या वाटेवर सूर्य म्हणजे उत्साहाचा उत्सव असतो. अंधार-दु:खाचा अस्त करणारा प्रकाशाचा महोत्सव असतो. कधी उगम तर कधी अस्त हे जसे सूर्याला तसे आपल्या जीवनाला ही व्यापून असते.

धुके ओसरुन गेल्यावर लख्खं झालेलं आभाळ म्हणजे जणू रिक्त-रिक्त झालेल्या मनासारखे स्वच्छ पारदर्शक अंतरंगच जणू. मनावर आलेला ताणतणावाचा गाळ अपार मेहनतीने उपसून काढावा अन् अंतरंगातून नवे झरे फुटावेत. पर्वतात लुप्त झालेल्या नदीचा एकदम पायथ्याशी प्रवाह व्हावा अन् सुरु व्हावा खळखळाट तसेच स्वच्छ पाण्याने तुडूंब व्हावे अंतरंग अन् तळापर्यंतचा खडान् खडा ‍दिसावा. शुभ्र आकाशात पहात रहावे तळ स्वत:च्याच अंतरंगाचे. आपल्या अनेक चुकांना करुन टाकावे माफ मोकळया मनाने. करत रहावी नवी सुरुवात प्रत्येक वेळी नव्याने. मागचेच बसू नये दु:ख उगाळत सदान्-कदा तर हिंडून यावा सकारात्मकतेने आपल्या सभोवतीचा सारा परिसर नवा.

डॉ. संतोष सेलूकर ,परभणी
मो. 7709515110

Avatar
About डॉ.संतोष सेलूकर 25 Articles
प्राथमिक शिक्षक जि.प.परभणी येथे कार्यरत असून दूरचे गाव हा कविता संग्रह प्रकाशित आहे.अनेक ठिकाणी कविसंमेलने व साहित्यसमेलनात सहभाग. सातत्याने १९९५ पासून कविता व ललितलेख लेखन विविध काव्यलेखन स्पर्धेत पारितोषिक प्राप्त.

1 Comment on देहात भरून घ्यावा सूर्य…

  1. अप्रतिम, मी ललित लेखन पहिल्यांदाच वाचल आणि प्रभावित झालो. इथून पुढे नेहमी वाचीत राहीन.

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..