कोणतीही निर्मिती होताना प्रत्यक्ष त्याचं साक्षिदार असणं, हा विलक्षण आनंदाचा भाग असतो. निर्मिती, मग ती कोणतीही असो, ती देखणीच असते असं मला वाटतं. माझ्या लहानपणी आमच्या घरासमोर एक सुतारकामाचा कारखाना होता. माझं लहानपण हे लहानपणी जसं असावं तसंच होतं, आतासारखं ते मोठ्यांसारखं झालेलं नव्हतं. अभ्यास, तोही चोख, शाळेच्याच वेळेत करायची पद्धत होती. तो एकदा केला, की मग पुढचे अनेक तास गंमतीचेच असतं. क्लास ह्या शब्दाचा जन्मही झाला नव्हता तेंव्हा. त्यामुळे अभ्यास हा शाळेतच करायचा असतो, असं तेंव्हा आम्हाला वाटे. शाळेचे दोन-पाच तास सोडले, तर रात्री झोपेपर्यंतचा वेळ हा मजेचाच होता.
तर अशा या मोकळ्या वेळेत मी जमेल तसा त्या सुतारकामाच्या कारखान्यात जाऊन बसे. त्यांचं ते करवतीने लाकडं कापणं, काटकोन्याने मापं घेणं, लाकूड नजरेच्या एका रेषेत पकडून त्याची लेव्हल पाहाणं, रंधा मारून ते सरळ आणि गुळगुळीत करणं असं करता करता त्या लाकडीतून एखादं सुबक टेबल किंवा दिमाखदार शोकेस तयार होताना बघणं मला खुप आवडायचं. त्यावेळी नेमकं काय वाटायचं ते आता सांगता येणार नाही, पण जे काही वाटायचं, ते खुप आनंददायी असायचं हे नक्की.
माझी ही आवड पुढे काॅलेजातही कायम राहीली. माझं काॅलेज उंच टेकडीवर आणि गर्द झाडीत लपलेलं होतं. अजुनही आहे. त्यामुळे विविध चित्रपटांच्या शुटिंग्स तिथे नेहेमीच होत असायच्या. त्या शुटींगची ती प्रक्रिया पाहाणं, मला नट-नट्यांना पाहाण्यापेक्षा खुप आवडायचं. माझं राहाणं अंधेरी पूर्वेला होतं. अंधेरी म्हणजे चित्रपटांचं माहेर घर होतं एकेकाळी. मोहन स्टुडीयो, प्रकाश स्टुडीयो, आरे काॅलनीचं जंगल, पश्चिमेचा फिल्मालय, महाकालीचा कमाल अमरोहींचा कमलिस्तान स्टुडीयो असे आणखी कितीतरी स्टुडीयो दोन-पाच किलोमिटरच्या परिघात होते. तिथे शुटींग आणि शुटींगच्या पुर्वीचं प्रचंड मोठे आणि खरेखुरे वाटणारे सेट उभारताना त्या कारागिरांना पाहाणं अत्यंत आनंदाचं असायचं. सुहाग, धरम-विर, रझीया सुलतान अश्या कितीतरी मोठ्या चित्रपटांचे सेट उभारताना पाहाण्याचा आनंद मी मनसोक्त लुटलाय. तेच सेट पडद्यावर सिनेमात पाहाताना, ‘हा सेट बनवताना मी पाहीलंय बरं का’ असं सोबत्याला सांगणं म्हणजे, मी देवाला पाहिलंय, असं सांगण्यापेक्षा किंचितही कमी नसायचं. प्लास्टर आॅफ पॅरीस आणि प्लायवूडच्या सहाय्याने जी काही जादुई दुनिया ते पडद्यामागचे अशिक्षित कलाकार निर्माण करतात, त्याला खरंच तोड नाही. हा माझा मोह अजुनही तसाच कायम आहे. गेल्या वर्षीच मी सेट पाहाण्याच्या निनित्ताने ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ आणि ‘जय मल्हार’चा सेटवर जाऊन आलो, ते त्या दिवसातल्या कुतुहलानेच.
बॅंकेत नोकरीला लागलो आणि निर्मिती होताना पाहाण्याचं क्षितीज आणखी विस्तारलं. बॅंक अनेक कारखान्यांना कर्ज द्यायची आणि त्यासाठी ठराविक कालावधींमधे त्या कारखान्यांना व्हिजीट करणं हा कामाचा भाग असायचा. ह्या व्हिजीट्स मी मागून घ्यायचो. यंत्राच्या एका बाजूने टाकलेल्या प्लास्टीकच्या पावडरपासून विविध रंगीबेरंगी वस्तू बनून दुसऱ्या टोकाने बनून बाहेर येताना पाहाताना काय विलक्षण मज्जा यायची. पुठ्ठ्यांपासून विविध आकारांचे खोके बघताना, आॅडीया-व्हिडीयो कॅसेट्सवर रेकाॅर्डींग होताना, प्रिंटींग मशिनच्या सहाय्याने कागदावर विविधरंगी उधळण होताना प्रत्यऱ्क्ष पाहाणंहा स्वर्गीय आनंद होता माझ्यासाठी. ह्या मागचं सायन्स अशा वेळी विसरायचं असतं अशी समज मला सुदैवाने तेंव्हा होती, अन्यथा त्या रुक्ष प्रोसेसचं अॅनालिसिस करताना मी त्यांच्या निर्मितीचा आनंद घेऊ शकलो नसतो. सगळ्याच गोष्टींमागचा कार्यकारण भाव शोधू नये, काही गोष्टींचं आश्चर्य हे आश्चर्यच राहावं, नाही तर त्यातील आनंद निघून जातो असं माझं मत आहे. चंद्रावर खड्डे आहेत असा शोध लावून चंद्रासारख्या चेहऱ्यातला रोमॅंटीकपणा वैज्ञानिकांनी पार घालवून टाकला असं मला सारखं वाटतं.
हे सर्व लिहावं असं वाटलं, ते गेले दोन दिवस विजय खातुंच्या परेल वर्कशाॅप येथील श्रीगणेश मुर्तीशाळेत जाण्याचा योग आल्यामुळे. खरं तर गणपती मी लहानपणापासून पाहातोय. सर्वच पाहातात. परंतू गणपती घडताना पाहाण्याचा योग कधी आला नव्हता. खरं तर इथे मी काहीसा उशीराच गेलो, कारण बहुतेक सर्वच गणपतींचा जन्म होऊन त्यांचं मंडळाच्या नांवाने बारसं वैगेरेही झालेलं होतं. मला गणेश मुर्तीं बनवण्याच्या कारखान्याला मुर्ती’शाळा’ का म्हणतात, ते काल कळलं. किमान शंभरेक गणपती अशा पद्धतीनं रचले बोते, की विशिष्ट अॅंगलने पाहिलं असता, ते नर्सरीतल्या पोरांसारखे वात्रटपणा करतायत असं वाटत होतं. काही उभ्या उभ्या खोड्या करतायत असं वाटत होतं. कोणी कोणाची सोंड ओढतोय, तर कोण कोणाला टपली मारतंय, असं गोड दृष्य होतं सारं. त्यांची ‘शाळा’ सुटायची वेळ झाल्यानं, मंडळलातल्या घरी जाण्याची गडबड सुरु होती. मंडळांच्या ‘पालकां’ची आपल्या राजा, महाराजांना, युवराजांना, बालराजांना त्या ‘वर्गात’ शोधून घरी घेऊन जाण्यासाठी लगबग सुरु होती. काही गणपती टापटीप कपडे, मुगुट, दागिने वैगेरे घालून परंतू वात्रट खाली फक्त चड्डीवर होते. त्यांना त्यांच्या त्यांचं धोतर नेसवण्याचं काम जोरात सुरु होतं. मोठं लोभसवाणं दृष्य होतं हे सारं.
आता यात निर्मिती कुठंय, असा रुक्ष सवाल काही जणांच्या मनात उभा राहील. तर मी त्या चित्रशाळेत गेलो होतो, ते गणपतींचे ‘डोळे’ कसे उघडतात ते पाहायला. हे खुळ माझे स्नेही व ज्येष्ठ व्यंगचित्रकार श्री. प्रभाकर वाईरकरांनी माझ्या डोक्यात सोडलं.गणपती कितीही लोभसवाणा, गोड दिसत असला, तरी जो पर्यंत त्याच्या डोळ्यांची आखणी होत नाही, तो पर्यंत त्या मुर्तीत जिवंतपणा येत नाही, त्या मुर्तीची खऱ्या अर्थाने निर्मिती होत नाही. गणेश मुर्तींचे डोळे रंगवण्याच्या कारागिरीला ‘डोळे उघडणं’ किंवा ‘आखणी’ करणं असं म्हणतात. हे डोळे उघडणं एकदा का झालं, की मग त्या मुर्तीचा ‘गणपती’ होतो, तो पर्यंत ती फक्त एक मुर्ती असते. हे आपल्यासारखंच झालं, जो पर्यंत आपले ‘डोळे उघडत’ नाहित, तो पर्यंत आपण, ‘कुणीतरी’ असतो, डोळे उघडले की माणसात येतो. गंम्मत म्हणजे, आपल्यापैकी बहुतेकांचे डोळे ‘घरी’ जातानाच उघडतात..!
गणपतींच्या डोळ्यांची आखणी हे एक विलक्षण कौशल्याचं काम असतं. गणपतीचा आकार, त्याची पोझ, त्या मुर्तीचा प्रेमळ किंवा अन्य भाव, गणपतीच्या सभावतालचं मंडपातलं दृष्य ह्या सर्वांचा विचार, मोठ्या मुर्तींचे डोळे उघडताना करावा लागतो. विस-पंचविस फुटी मुर्तीच्या समोर परांतीवर लावलेल्या एका फळकुटाच्या आधाराने, तो फाटका कलावंत काय विलक्षण तन्मयतेने मु्र्तीचे डोळे रेखत होता. साधारण एक तास लागला त्याला गणपती जिवंत करायला. पण तो एक तास त्याचा तो नव्हता, तोच जणू गणपती झाला होता. आखणी पूर्ण झाल्यावर ती मुर्ती एवढी जिवंत झाली, की आता उठून आपल्याला उचलून कडेवर घेईल की काय असं वाटू लागलं!
मी जेवढी आणि ज्या गोष्टींची निर्मिती होताना पाहिलंय, ते करणारे सारे कलावंत एकजात फाटके होते. लहानपणी पाहिलेले सुतार असोत की एखाद्या चित्रपटासाठी ऐश्वर्यसंपन्न महालाची निर्मिती करणारे स्टडियोतले कारागीर असोत, प्लास्टिक मोल्डींग मशिनवर काम करणारे मशिन आॅपरेटर असो की मल्टीकलर प्रिन्टींग मशीन चालवणारे असोत किंवा आणखी कोणीही कलाकार असोत, हे सर्व शरीराने, कपड्याने फाटकेच बोते. परिस्थितीनेही फाटकेच असावेत. वेदनेचा आणि बेजोड कलाकृतींचा जसा घनिष्ट संबंध असतो, तसा फाटकेपणाचा आणि कलावंतांचाही असावा. किंवा निर्मितीचा आनंदच एवढा स्वर्गीय असावा, की पृथ्वीवरचं फाटकेपण त्यांच्या लक्षातच येत नसावं..
काहीतरी निर्माण करणारे हात परिस्थितीने कसेही असोत, मला मात्र नेहेमीच विलक्षण देखणे वाटतात..माझ्या लहानपणी रस्त्यावर रंगीत खडूंच्या सहाय्याने देवांची मोठाली मनमोहक चित्र काढणारे कलावंत यायचे. राहायचेही फुटपाथवरच. कित्येकांना तर हातच नसायचे, मग पायाच्या अंगठ्यात खडू पकडून ते तेवढ्याच ताकदीने चित्र रंगवायचे. ते नसणारे हातही मला सुंदरच दिसायचे. कोणतीही निर्मिती होताना पाहाणं हा एक सुगंधी मंगल सोहळाच असतो..अशावेळी बा. भ. बोरकरांच्या ओळी नकळत आठवतात, “देखणे ते हात, ज्यांना निर्मितीचे डोहळे..मंगलाने गंधलेले, सुंदराचे सोहळे..” आणि हात आपोआप जोडले जातात..!
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply