गुरूवार दिनांक १३ एप्रिल २०१७ हा दिवस बोरिवलीकरांच्या, विशेषत: प्रबोधनकार ठाकरे सभागृहात उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या, कायमचा स्मरणात राहील. या दिवशी या वर्षातल्या सर्वात देखण्या आणि भारदस्त कार्यक्रमाला उपस्थित राहाण्याचा योग बोरिवलीकरांना आला. कार्यक्रम होता बोरिवलीच्या ‘जनसेवा केंद्रा’ने आयोजित केलेला जगद्विख्यात सिद्धहस्त चित्रकार श्री. वासुदेव कामत यांच्या सत्काराचा आणि तो ही साक्षात परमपुजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवतांच्या हस्ते. हे वर्ष संपायला अद्याप तीन चतुर्थांश काळ जावयाचा असला तरी या उर्वरीत काळात असा व या उंचीचा कार्यक्रम पुन्हा होणे नाही अशी माझी खात्री आहे.
श्री. वासुदेव कामत व परम पूजनीय सरसंघचालक डाॅ. मोहनराव भागवत ह्या दोन तपस्वी व्यक्तिमत्वांना व्यासपिठावर एकत्र असलेलं नुसतं पाहाणंही भाग्याचं तिथं दोघानाही ऐकणं, काय
पराकोटीचा आनंद असेल याची कल्पना या दोघांना ओळखणारे सहज करू शकतील. त्यातून या कार्यक्रमाला आणखी उंचीवर नेणारं आणि कानांना तृप्त करणारं श्री. प्रमोद बापट यांचं यथार्थ सूत्रसंचालन..’पाहाण्या’पेक्षा ‘अनुभवणं’ अन् ‘ऐकण्या’पेक्षा ‘श्रवण’करणं वेगळं असतं हा मला या कार्यक्रमात उमगलं आणि स्वर्गसुखाचा अनुभव दिलेल्या या कार्यक्रमानंतर पाहाण्या-ऐकण्याच्या अवयवांमा ‘इंद्री’य का म्हणतात हे ही समजलं..!
श्री. प्रमोद बापट यांनी दोघांनाही ‘चित्रकार’ म्हटलं. श्री. वासुदेव कामत तर खरंच चित्रकार आहेत. मनातल्या रंग-रेषाना आपल्या नजरेसमोर कॅनव्हासवर साकारणारे समर्थ चित्रकार. तर सरसंघचालक सर्वसामान्यांच्या मनात असलेला ‘तो भारत’ रेखाटण्याच्या ध्यासाने वाटचाल करणारे. दोघंही ‘सत्यम शिवम सुंदरम्’चे पुजारी. श्री. प्रमोदजींनी या दोघांचं वर्णण करताना,
“देखणे ते हात ज्यांना
निर्मितीचे डोहळे ।।
मंगलाने गंधलेले
सुंदराचे सोहळॆ ॥
देखणी ती पाऊले
जी ध्यासपंथे चालती ।।”
या बा. भ. बोरकरांच्या तितक्याच समर्थ ओळी उधृत केल्या. सत्कार करणारा व सत्कार घेणारा दोघंही सारख्याच तोलामोलाचे. कार्यक्रमाचं वर्णन करण्यास मला त्या तोलामोलाचे शब्दच सापडत नाहीयेत या क्षणाला. पूर्ण कार्यक्रमच खानदानी देखणेपणानं झाला. खानदानी यासाठी, की कुठेही दिखाऊपणा, बडेजाव, मोठेपणा, सुरक्षेचं जराही अवडंबर नव्हतं. साधेणातही सौंदर्य असतं आणि ते अवर्णणीय असतं ते इथं समजलं. सा-या सभागृहातच लक्ष्मीपेक्षा सरस्वतीचा वास जाणवत होता. सुरूवातीचं पंडीत बालीगांचं वेणूवादन व नंतर सौ. अनुराधा परब यांनी शब्दबद्ध केलेल्या ‘वासुदेव कामत’ या पुस्तकाच्या सरसंघचालकांच्या हस्ते झालेल्या प्रकाशनाने या कार्यक्रमाच्या भारदस्तपणात आणखी भर घातली.
बोरिवलीच्या प्रबोधनकार ठाकरे सभागृहात त्या दिवशी उपस्थित असलेल्या प्रत्येकाला या कार्यक्रमातून काहीतरी संदेश नक्कीच मिळाला असेल. व्रत कोणतंही असो, त्याचं उद्यापन त्या व्रताच्या देशार्पणानं झालं पाहिजे हा संदेश मला तरी या कार्यक्रमातून मिळाला..
अशा या कार्यक्रमास मला सहकुटुंब उपस्थित राहाण्याची संधी ज्यांच्यामुळे मिळाली त्या ‘जनसेवा केंद्रा’चे श्री. शरद रेगे व माझे स्मेही श्री. श्रीधर साठे यांचा मी कायमचा ऋणी राहीन. या लेखाचं शिर्षक, सत्कारमुर्ती आणि सत्कारकर्त्यांप्रमाणे, या कार्यक्रमाचे ‘निर्माते’ जनसेवा केंद्रालाही समोर ठेवलं आहे.
— नितीन साळुंखे
9321811091
Leave a Reply