गेले चार दिवस दिल्लीत राजकीय क्षेत्राशी संबंधीत कामं घेऊन मित्रांसोबत आलोय. माझा हा दिल्ली मुक्काम राजकीय दृष्ट्या वेगळे अनुभव देणारा ठरला. मी शक्यतो राजकारणावर लिहित नाही आणि लिहिलंच तर ते नकारार्थीच जास्त असतं. कारण ‘वेल्फेअर स्टेट’ किंवा ‘कल्याणकारी राज्य’ ही राजकारणाची मध्यवर्ती संकल्पना असलेल्या आपल्या देशात राजकारण/ राजकारणी आणि ते ज्यांच्या कल्याणासाठी करायचं असतं ते सामान्य जन, यांचा काहीच संबंध उरलेला नाही असं मी अनुभवांती समजतो. राजकीय व्यक्तींना कोणत्याही कामासाठी भेटणं मी शक्यतो टाळतो. राजकारण किंवा राजकीय व्यक्ती, मग ती कोणत्याही पक्षाची असो, ती कोणाचीच नसते, असं मी माझ्या अनुभवाअंती समजतो. त्यातून आपल्याकडे लोकशाहीच्या नांवाखाली राजकारण्यांचा आणि त्यांच्या बगलबच्च्यांचा जो तमाशा चालतो, त्यातून माझं हे मत अधिकच घट्ट होत गेलंय. असं असलं तरी माझा गत चार दिवसातला दिल्ली मुक्काम मला आश्चर्याचे धक्यांवर धक्के देणारा ठरला.
भाजप, काॅंग्रेस किंवा कोणताही राजकीय पक्ष किंवा त्या त्या पक्षांशी संबंधीत कोणत्याही व्यक्तींकडे मी जरा साशंकतेने पाहातो. मला या लोकांची साधार भिती वाटते. याचा अर्थ असं नव्हे, की सर्वच वाईट आहेत. काही चांगली माणसंही यात जरूर आहेत, परंतु ती आपल्या वाट्याला काही येत नाहीत हे मात्र खरं. पण जर असा चांगला अनुभव आलाच, तर तोही शेअर करणं मला आवश्यक वाटतं. काल-परवाचीच श्री. सुरेश प्रभू आणि श्री. गिरिराज सिंह या केंद्रातील मंत्री महोदयांच्या मला आलेल्या अनुभवावर मी लिहिलेली ‘मेरा देश बदल रहा है’ ही माझी पोस्ट याच भावनेने पोस्ट केलेली होती. जे चांगलं आहे त्याचं कौतुक व्हायलाच हवं, मग ते कुणाचही असो, या मताचा मी आहे. हा आताचा हा लेखंही ही त्याच भावनेने लिहित आहे.
मी कुठेही बाहेरगांवी गेलो, की शक्यतो सामान्य माणसांशी संवाद साधण्याचा माझा प्रयत्न असतो. यात हाॅटेलचे वेटर, रखवालदार, चहाचे ठेलेवाले, दुकानदार, फेरीवाले आणि रिक्शा-टॅक्सी चालवणारे असे हातावर पोट असलेले लोक असतात. त्यांचा दिवसभरात अनेक मानवी स्वभावाच्या नमुन्यांशी संबंध येत असतो. त्या माणसांच्या आपापसांतल्या गप्पांतून या कष्टकरी लोकांना बऱ्याच गोष्टी कळत असतात आणि अशा रोजगाराशी लग्न लागलेल्या लोकांशी आपण आपला शहरी एलिटपणा बाजूला ठेवून मारलेल्या गप्पांतून, त्यांच्या रांगड्या शैलीतून त्या आपल्यापर्यंत पोचत असतात. त्यांच्याशी मारलेल्या गप्पांतून त्या त्या शहरातल्या लोकांच्या विचारसरणीचा आणि वागण्याचा अंदाज लावता येतो. अशा अतिसामान्य लोकांकडून समजलेल्या गोष्टी, त्या शहरात राहाणाऱ्यांच्या मतांचा आणि भावनांचा लसावि असतो असं मी समजतो. त्यांचं बोलणं त्या शहराची नाडी परिक्षेसारखं असतं. दिल्लीच्या या चार दिवसांतही मी माझ्या सवयीला जागून हेच केलं.
या चार दिवसांतही अशा लोकांशी भरपूर गप्पा मारल्या. दिल्लीच्या हवेतच राजकारण असल्याने, विषय कुठूनही सुरु केला तरी तो राजकारणावर यायचाच. किंबहूना मलाच दिल्लीच्या एकूणच राजकारणाविषयी कुतूहल होतं, म्हणून मीच त्या विषयवार आपोआप यायचो. मी ज्यांच्याशी बोलत होतो त्यांचा केंद्र सरकारच्या खात्यांशी संबंध येण्याची शक्यता तशी कमीच होता आणि सहाजिकच आमच्या गप्पा दिल्ली राज्य शासन आणि दिल्ली नगर निगमच्या कारभाराविषयी झाल्या. त्यांच्याकडून जे कळलं, ते ही दिल्लीच्या ‘आप’ सरकारविषयी आजवर असलेल्या माझ्या समजाला धक्का देणारच होतं..
श्री. अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या दिल्ली सरकारविषयी मला आजवर जे काही माहित होतं, ते टिव्हीवरच्या बातम्या ऐकूनच. ते ऐकून श्री. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या मंत्रीमंडळातील सदस्यांविषयी ‘नौटंकी है’ असंच मत झालं होतं. केजरीवालांची एकूण वागण्याची पद्धती, त्यांची देहबोली टिव्हीवरुन पाहाताना माझं हे मत गडद होत गेलं होतं. पण गेल्या चार दिवसांत दिल्लीतील सामान्य माणसांकडून त्यांच्या कारभाराविषयी जे काही ऐकलं, ते ऐकून टिव्हीवर पाहून मनात उमटलेल्या त्यांच्या प्रतिमेला उभा छेद गेला. मिडियाने दाखवलेलं सर्वच खरं नसत, हे जुनं सत्य पुन्हा एकदा नव्यानं लक्षात आलं.
मला दिल्लीत भेटलेल्या या सामान्य लोकांचं दिल्लीच्या केजरीवाल सरकारबद्दल संमिश्र मत होतं. त्यात चांगलं बोलणारे अधिक, तर त्यांच्यात खोट काढणारे कमी होतं. तसं तर कोणत्याच सरकारबद्दल १०० टक्के चांगलं बोलताना कोणीच आढळणार नाही. इथंही दिल्लीचे मुख्यमंत्री श्री. अरविंद केजरीवाल आणि त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या ‘आप’च्या सरकारबद्दल लोकांची वेगवेगळी मतं असली तरी, दोन बाबतीत मात्र सर्वांचं अत्यंत चांगलं मत होतं. जवळ जवळ एकमतच होतं म्हणा ना. या दोन गोष्टी म्हणजे सरकारी शिक्षण व्यवस्था आणि दुसरी म्हणजे सार्वजनिक आरोग्य व्यवस्था. त्यांच्या सांगण्याचा सारांश होता, केजरीवाल सरकार शिक्षणाच्या क्षेत्रात उत्तम काम करतंय. सरकारी शाळांचा, त्यातील शिक्षणाचा दर्जा आणि शाळेतील अवांतर शिक्षणाचा दर्जा कोणत्याही उत्तम खाजगी शाळांच्या बरोबरीने आणला आहे. किंबहूना त्याहीपेक्षा वर नेऊन ठेवला आहे. लोक खाजगी शाळांकडून सरकारी शळांकडे वळू लागले आहेत. आरोग्याच्या क्षेत्रातही केजरीवाल सरकार अत्यंत सकारात्मक काम करतंय, असंही त्यांचे मत होतं. हाॅस्पिटलात थोडीशी गर्दी असते, मात्र उपचार आणि औषधोपचार मात्र अगदी उत्तम मिळतात. “केजरीवाल सरकार अच्छी काम कर रही है, मगर उसे विरोधी पक्षवाले काम करने दे नही रहे है” हे त्यापैकी बहुतेकांचं मत होतं. राज्यस्तरावरच्या भाजप आणि काॅंग्रेस या दो प्रमुख पक्षांबद्दल तिथल्या लोकांची नाराजी जाणवत होती.
अर्थात मी ज्यांच्याशी बोललो ते चार लोक म्हणजे संपूर्ण दिल्ली किंवा संपूर्ण देश नव्हे याची मला कल्पना आहे. तरी आवर्जून मतदान करणारे सामान्य लोक कशापद्धतीने विचार करतात याचा एक अंदाज येतोच..!
माझा दिल्लीतील मुक्काम चार-पांच दिवसाचीच असल्याने, दिल्लीच्या सामान्यजणांनी केजरीवाल सरकारबद्दल व्यक्त केलेल्या मतांची मला खातरजमा करता येत नव्हती. तसं करायची माझी इच्छा खुप होती, परंतु नाहीच जमलं शेवटपर्यंत. एखाददुसरा केजरीवालांचा भक्त असू शकेल, पण मला भेटलेली सर्वच माणसं काही त्यांचे भक्त असण्याची शक्यता नाही. मला दिल्लीत भेटलेली तिकडची माणसं केजरीवाल शासनाच्या शिक्षण आणि आरोग्याबद्दल असेच भरभरून बोलत होते. ‘साब आम आदमी को बच्चों की शिक्षा और परिवार का स्वास्थ्य यही दो चिजों की जादा जरुरत रहती है. और यह चिजे बैहतर करनेवाली कोई भी सरकार हमे अपनी लगती है” हे त्यांचं सांगणं मला मनापासून पटलं.
मुलांचं शिक्षण आणि कुटुंबाचं आरोग्य ह्या सामान्य माणसाच्या दोन जिव्बाळ्याच्या गोष्टी. या दोन्ही गोष्टी उत्तम सोडा, चांगल्या हव्या असल्यातरी कमाईतला बराचसा हिस्सा खर्च होतो. हातावर पोट असणाऱ्या कष्टकरीजनांना या दोन क्षेत्रात सरकारच्या फायद्या-तोट्याचा विचार न करता उत्तम काम करणारं कोणतंही सरकार त्यांचं स्वत:चं वाटतं. वेल्फेअर स्टेट किंवा कल्याणकारी राज्यात हे अपेक्षितच असतं. दिल्ली ‘आप’ सरकारने हे करुन दाखवलंय, हे तिकडची सामान्य माणसं अभिमानाने सांगत होता. असं खरंच आपल्याही राज्यात होतंय की करुन दाखवलंची फक्त जाहिरातबाजीच चालवलीय, हे प्रत्येकाने आपापल्या पक्षाच्या आणि जाती-धर्माच्या आंधळ्या प्रेमातून बाहेर येऊन तपासणं गरजेचं आहे. तसं होत नसेल तर मग त्या लोकशाहीतील नागरीकांना ‘सुजाण’ नागरीक म्हणता येत नाही व अशा लोकशाहीलाही मग काही अर्थ उरत नाही.
दिल्लीच्या ‘आप’ सरकारबद्दल तेथील लोकांची इतर वेगवेगळी मतं होतीच, पण त्या मतांना काहीशी सहानुभुतीची किनार होती. ‘आप’चे लोक अनुभवी नाहीत, भाजप किंवा काॅंग्रेस त्यांना काम करु देत नाही, केजरीवाल थोडा सणकी है पर नोटंकी मनोज तिवारी(राज्य भाजप अध्यक्ष) और राहूल गांधीसे अच्छा है, इतर पक्षांमधे असलेले गुण-दोष ‘आप’मधेही आहेत वैगेरे वैगेरे मतंही होती. असं असलं तरी “केजरीवाल सरकार आम आदमी के लिये काम कर रही है” याबद्दल मात्र त्या सर्वांचं एकमत होतं. काॅंग्रेस अध्यक्ष श्री. राहूल गांधींच्या वैचारिक सक्षमतेबद्दल मात्र देशातील इतर बहुसंख्य माणसांसारखीच त्यांनाही शंका होती. मात्र “गर कांग्रेस नेत्ता बदलती है, तो मोद्दी को धोब्बीपछाड दे सकती है. ऐसा होना ना मुमकीन है, मगर हुआ तो लोग कांग्रेस के बारे मे सोच सकते है.” असंही त्यांचं खास दिल्ली-हरयाणवी टोनमधलं मत होतं. अर्थात हे होणं अशक्य कोटीतलं असल्याचंही त्यांनी त्यांच्या सांगीतलं. काहींना “राहूल को हल्के मे नही लेना चाहीये” असंही वाटत होतं. कसंही असलं तरी ‘आप’ सरकारबाबतीत मात्र त्यांच्या बोलण्यात जिव्हाळा जाणवत होता. ‘आप’ला मुख्यत्व्करुन काॅंग्रेस व भाजप काम करु देत नाहीत अशी त्यांचं तक्रारीच्या स्वरुपातलं मत होतं.
केंद्रातील मोदी सरकारच्या नोटबंदी किंवा जिएसटीबद्दल मात्र त्यांची काहीच तक्रार नव्हती, कारण त्यांना त्याची फारशी झळ बसलेली नव्हती. तरीही मोदी सरकारबद्दल त्यांच्या मनात सर्व काही आलवेल नाही, हे त्यांच्या बोलण्यातून जाणवत होतं. “अब दुसरा कोई नही है, इसलीये मोदी सही है” हे त्यांचं मत. दुसरा कुणीच नाही म्हणून मोदी, असा त्यांच्या म्हणण्याचा सारांश होता.दिल्लीतील असं लोकांना वाटू लागणं, ही केंद्रात सत्तेवर असलेल्या भाजपसाठी आणि सत्तेवर येवू पाहाणाऱ्या काॅंग्रेससाठी विचार करायची गोष्ट आहे.
दिल्लीच्या सामान्य माणसालाही राजकारणाची चांगली जाण असते आणि देशातील इतर प्रांतातील लोकांपेक्षा राजकारणाची ओळखंही जास्त असते. त्यांचं मत हे अनुभवावर आधारीत असतं. म्हणून मला वाटतं दिल्लीतील सामान्य माणसाने व्यक्त केलेल्या रांगड्या आणि रोकड्या शब्दातल्या भावनां या दिल्लीतील असल्या तरी त्या देशपातळीवरच्या आहेत असं समजून केंद्रातील सत्ताधारी पक्षाने त्यांचा विचार करायला हवा..
देशभरातल्या सामान्य माणसांच्या गरजा समान असतात, तशीच त्यांची विचार करायची पद्धतीही समान असते व म्हणून त्यांची सरकारकडे बघायची दृष्टी समान असते असं म्हटलं तर चुकणार नाही. मोफत किंवा माफक दरांत शिक्षण आणि आरोग्य ह्या सर्वांसाठी आवश्यक बाबी. सामान्यांसाठी तर अत्यावश्यकच. ह्या दोन गोष्टी मोफत वा अत्यंत वाजवी दरात उपलब्ध करुन देणारं कोणतंही सरकार सामान्यांना आपलं वाटतं. तिथे लोक पक्ष कोणता आहे याचा सामान्यजन विचार करत नाहीत. दिल्लीच्या ‘आप’ पक्षाने हे बरोबर ओळखलं आणि म्हणून तेथील लोकांना ‘आप’चं सरकार त्यांचं वाटतं. आज तरी अनेक कारणांनी दिल्ली पुरता मर्यादीत असलेल्या ‘आप’ पक्षाने जर योग्य नियोजन करुन पावलं टाकली तर आणि दिल्लीत केलेली कामं देशातील जनतेपर्यंत पोचवली तर भविष्यात हा पक्ष प्रस्थापित पक्षांसमोर आव्हान उभं करु शकतो.
चांगलं, मग ते कुणाचही असो, अगदी आपल्या विरोधकाचंही असलं तरी, त्याचं कौतुक करावं हा माझा स्वभाव आहे व त्यास जागून मी काल मी मला दिल्लीत आलेल्या केंद्र शासनातल्या मंत्री पातळीवरचा सुखद अनुभव मी शेअर केला होता. तो माझा अनुभव सोशल मिडियावर तुफान व्हायरल ही झाला. या लेखात लिहिलेल्या ‘आप’ सरकारविषयी मी ऐकलेल्या दिल्लीतील लोकभावनाही असाच आश्चर्य जनक आहेत.
माझ्या पांच दिवसातल्यी दिल्ली मुक्कामावर मी लिहिलेला हा दुसरा लेख. चांगलं आहे ते लोकांसमोर ठेवावं, या भावनेनं मी मोदी सरकारातील मंत्र्यांनी मला केलेल्या सहकार्याविषयी तीन-चार दिवसांपूर्वी पहिला लेख लिहिलेला होता. ‘आप’सरकारवरचा प्रस्तुत लेखही त्याच भावनेनं लिहिलेला आहे. हे दोन्ही लेख जर कोणाला त्या त्या पक्षाच्या प्रसारचे वाटले, तर त्याला माझा काहीच इलाज नाही. मी कोणत्याही पक्षाचा समर्थक नाही, चांगल्याचा समर्थक मात्र नक्की आहे. जे भावलं, ते मांडायला मला आवडतं, मग ते कुणाच का असेना..! चांगल्याला दाद देणं हे माझं, तसंच हे वाचणारांचंही कर्तव्य आहे. माझी मोदी सरकारवरची पोस्ट वाचून त्यावर प्रचंड प्रतिसाद देणारे माझे नि:पक्ष मित्र, या पोस्टवरही तसाच प्रतिसाद देतील अशी आशा आहे.
मी दिल्ली सोडताना ज्या रिक्शाने निझामुद्दीन स्टेशनवर गेलो होतो, त्या रिक्शावाल्याने मला जो प्रश्न विचारला होता, त्याचं योग्य उत्तर आज तीन-चार दिवसांनीही मला सापडलेलं नाही. त्या प्रश्नाने मी अस्वस्थ आहे. आणि ती अस्वस्थता तुमच्यापर्यंत नेऊन सोडण्यासाठी तोच प्रश्न मी तुम्हाला विचारणार आहे. त्याच प्रश्नावर आधारीत तीसरा व शेवटचा लेख येत्या काही दिवसांत मी इथे पोस्ट करेन.
-©️नितीन साळुंखे
9321811091
(हा लेख लिहित असताना योगायोगाने श्री.अरविंद केजरीवाल यांची काही छायाचित्र मला कुणीतरी व्हाट्सअॅपवर पाठवली, तीच सोबत देत आहे. केजरीवालांचा पहिला फोटो मात्र नेटवरून घेतला आहे)
Leave a Reply