नैसर्गिक दात चांगल्या स्थितीत ठेवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची “संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. दातांच्या काही रोगांमुळे शरीरात सेप्टिक फोकस होण्याचा संभव आहे. या कारणास्तव ज्येष्ठ नागरिकांना थोडे किंवा सर्व दात काढून घ्यावे लागतात. दात काढल्यावर दुसरे कृत्रीम दात बसविणे जरूर आहे. असे न केल्यास जबड्याची हाडे झिजून जातात व अन्नपचनावर व शब्दोच्चारावर परिणाम होतो. गेल्या काही वर्षात कृत्रीम दात बसविण्याच्या शास्त्रात उल्लेखनीय प्रगती झाली आहे. थोडे दात बसवावयाचे असल्यास राहिलेल्या दातांचा आधार घेऊन, कृत्रीम दात तयार केले जातात. थोड्या दातांचे किंवा संपूर्ण कवळीचे रोपण (इमप्लाण्ट) सुद्धा केले जाते.
साध्या कवळीची चावण्याची क्षमता नैसर्गिक चावण्याच्या तुलनेत २० टक्के समजली जाते. रोपण केलेल्या कवळीत मात्र जवळजवळ नैसर्गिक दाताप्रमाणे चावण्याची क्षमता असते. रोपण करण्याच्या पद्धतीला शारीरिक आरोग्याची बंधने आहेत. ही उपाययोजना करावयास खर्च पण बराच येतो. जबड्याची हाडे फार झिजली नसल्यास कवळ्या वापरणे अवघड नाही. सुरुवातीला हळू चावावे लागते. प्रवाही पदार्थ घेतानासुद्धा कवळीचा वापर करावा म्हणजे गिळण्याच्या कृतीची लवकर सवय होईल. अन्नाचा लहान घास घेऊन दोन्ही बाजूंनी चावण्याचा प्रयत्न करावा म्हणजे कवळ्या लवकर पकड घेतील. चिवट पदार्थ टाळावेत. जीभ व गाल यांना सांभाळून खावे.
नैसर्गिक दाताप्रमाणे कवळ्या साफ ठेवणे आरोग्याच्या दृष्टीने जरूर आहे. (त्या) करिता विशिष्ट बनावटीचे ब्रश वापरणे चांगले. कवळ्या झिजून गेल्यावरसुद्धा बरेच ज्येष्ठ नागरिक त्या वापरत राहतात; परंतु त्यातून तोंडातील निरनिराळ्या पण त्रासदायक स्वरूपाचे तोंडातील आजार होऊ शकतात. कवळ्या तोंडातील कोणत्याही भागास लागत असल्यास, त्वरित डॉक्टरांच्या निदर्शनास आणावे. यात निष्काळजीपणा झाल्यास कॅन्सरसारखे रोग उद्भवू शकतात. ज्येष्ठ नागरिकांचे अन्न चवदार असले पाहिजे. त्यांना जेवावयास वेळ लागतो म्हणून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तींनी त्यांना वेगळे समजू नये. कवळ्या वापरणे अवघड आहे; पण अशक्य बिलकूल नाही.
-डॉ. प्रभाकर दिवाण
मराठी विज्ञान परिषद
Leave a Reply