नवीन लेखन...

देर आए, दुरूस्त आए

बार्बाडोस इथे झालेल्या टी ट्वेंटी विश्वचषकाच्या अंतिम लढतीत टीम इंडियाने द.आफ्रिकेचा सात धावांनी चित्तथरारक पराभव करत २०१३ नंतर आयसीसी विश्वचषकाला गवसणी घातली आहे. दोन्ही संघांनी तुल्यबळ लढत दिल्याने सामना शेवटच्या षटका पर्यंत लांबला. मात्र हार्दिक पांड्याच्या चलाखीने आपला संघ वरचढ ठरला. अनेक उतारचढाव आणि विजयाचा दोलक दोन्ही संघाकडे आलटून पालटून फिरत असल्याने भारतीय पाठीराख्यांचा जीव कासावीस झाला होता. मात्र क्लिंटन डिकॅाक, हेनरी क्लासेन आणि डेव्हिड मिलरचे प्रयत्न तोकडे पडले आणि त्यांचा संघ शेवटच्या षटकात जिंकण्यासाठी सोळा धावा करू शकला नाही.

झाले काय तर नाणेफेकीचा कौल आणि प्रथम फलंदाजी हे आपल्यासाठी सुचिन्ह होते. मात्र रोहीत आणि पंत स्विपच्या नादात आपली विकेट गमावून बसले आणि टीम इंडिया अनपेक्षितपणे दबावात आली. भरीस भर म्हणून आतापर्यंत स्पर्धेत तळपणारा सूर्याला खग्रास ग्रहण लागल्याने मैदानात काळोख पसरला होता. सर्वत्र निराशा पसरली होती. याक्षणी रोहीतने कल्पकता दाखवत अक्षरला बढती दिली आणि त्याने संघीचे सोने केले. आतापर्यंत स्पर्धेत आपली छाप न उमटवणार्या विराटला अखेर सूर गवसला आणि त्याने अक्षरसोबत बहूमुल्य ७२ धावांची भागिदारी करत टीम इंडियाच्या जीवात जीव आणला. अक्षर थोडा गाफील राहल्याने धावबाद झाला परंतु त्याला दिलेले काम चोखपणे बजावून तो माघारी परतला.
पुन्हा एकदा विराटला नवीन साथीदार शिवम दुबेची संगत लाभली आणि या दोघांनी आफ्रिकन गोलंदाजीचा खरपूस समाचार घेत वेगवान अर्धशतकी भागिदारी केली. स्लॅाग ओव्हर्समध्ये विराट, दुबेने चांगले हात धुतल्याने आपला संघ पावने दोनशेच्या टप्यात पोहोचला. अर्थातच हे लक्ष्य कठीण जरूर होते, मात्र अशक्य नव्हते. तरीपण अंतिम सामन्याचा दबाव, पाठलाग करतांना होणारी तारांबळ पाहता भारताचे पारडे नक्कीच जड होते. त्यातही बुमराह नावाचे ब्रह्मास्त्र पाठीशी असल्याने टीम इंडिया विजयाप्रती आश्वस्त होती. आफ्रिकेचा प्रारंभ डळमळीतपणे झाला. बुमराहने जणुकाही लेझर गाईडेड मिसाईल सारख्या चेंडूवर सलामीवीर रेझाचा वेध घेतला तर अर्शदीपने कर्णधार एडन मार्क्रमचा मार्ग तंबूच्या दिशेने राहील याची काळजी घेतली.

अवघ्या तिसर्या षटकांत दोन बाद बारा स्कोअर होताच आफ्रिकेचा संघ नेहमीप्रमाणे गळपटतो की काय असे वाटत होते. पण यावेळी डिकॅाक आणि स्टब्स खंबिर निर्धाराने मैदानात उभे होते. या दोघांनी आपल्या कोणत्याही गोलंदाजाची तमा न बाळगता अर्घशतकी भागिदारी करत भारतीय संघाच्या तोंडचे पाणी पळवले. स्टब्स डोईजड होत असतांनाच त्याने आत्मघात करून घेतला. फारसा प्रभावी न ठरलेल्या अक्षरला अक्रॅास खेळत त्याने आपला बळी दिला. पुन्हा एकदा टीम इंडिया सामन्यात कमबॅक करत आहे असे वाटतांनाच हेनरी क्लासेनच्या रूपात बुलडोझर मैदानात आला. चेहर्यावरची माशी न उडू देता अगदी शांतपणे त्याने मैदानात रक्तपात, धावापात घडवला. तो इतक्या सहजपणे चौकार षटकार ठोकत होता जणुकाही चेंडू त्याच्या बॅटचा गुलाम होता.

समाधानाची बाब म्हणजे तेराव्या षटकात डिकॅाकला झेलबाद करत अर्शदीपने आपल्या जखमेवर फुंकर जरूर घातले मात्र काळरूपी क्लासन काही केल्या टीम इंडियाला जुमानत नव्हता. भरीर भर म्हणजे अक्षरच्या १५ व्या षटकांत जवळपास २४ धावांची लयलूट करत त्याने रनरेटची ऐसीतैसी करून टाकली. आता नाकातोंडात पाणी सद्रुष्य परिस्थिती निर्माण झाली होती. अभी नही तो कभी नही, हातातोंडाशी आलेली ट्रॅाफी क्लासन हिसकावून घेऊ लागला होता. अखेर रोहीतला सुबुद्धी सुचली. सर्वजण बुमराहचा धावा करू लागले होते. टीम इंडियाला केवळ आणि केवळ बुमराहच वाचवू शकतो हेच सर्वांच्या मनी होते.

सर्वांच्या नजरा बुमराहवर टिकल्या असतांनाच त्याने सोळावे षटक टिच्चून टाकले. बुमराहचे सोळावे षटक धोक्याचे आहे हे क्लासन सुद्धा जाणून होता. खरी गंमत म्हणजे यानंतर अर्शदीप, बुमराहचे केवळ एक एक षटक बाकी असल्याने कुणाला गोलंदाजी द्यावी हा यक्षप्रश्न होता. त्यातही जडेजा अजिबात फॅार्ममध्ये नसल्याने क्लासन त्याचा खिमा कलेजी करणार यात शंका नव्हती. अखेर अब तुम्हारे हवाले वतन साथीयों करत रोहीतने पांड्याच्या हाती चेंडू दिला आणि भारतीय पाठीराखे जीव मुठीत धरून बसले. पांड्या करून दाखवतो की मार खाऊन दाखवतो हे केवळ काळच सांगू शकत होता. पण काळाने जे सांगितले, जे दाखवले, ते क्रिकेटरसिक जन्मभर विसरू शकणार नाही.

पांड्याची धाव कुंपना पर्यंत की द.आफ्रिकेच्या तीन राजधानी प्रिटोरिया, केपटाऊन, ब्लोएमफॅांटेन पर्यंत जाते याची सर्वजण डोळ्यात तेल घालून पाहणी करत होते. अखेर महापुरे झाडे जाती तेथे लव्हाळी वाचती याची प्रचिती आली. उपेक्षितांचे अंतरंग असलेल्या, वन्स छपरी अॅालवेज छपरी म्हणून हिनावलेल्या, आयपीएल ला मुंबई इंडियन्सची वाताहत केल्याने प्रचंड शिव्याशाप भोगलेल्या, कौटुंबीक कलहात भरडलेल्या पांड्याने क्लासेनची त्सुनामी रोखली. अॅाफ स्टंप आणि क्लासेनच्या दांडपट्याच्या रेंजबाहेर हळूवार चेंडू सोडत पांड्याने क्लासेनचा कोथळा बाहेर काढला. पांड्याने आमचं ठरलंय, आम्ही करून दाखवलं करत पुन्हा एकदा टीम इंडियात प्राण फुंकले. याचाच फायदा घेत १८ व्या षटकात बुमराहने यान्सनच्या दांड्या उडवत टीम इंडियाला धमाल दांडीया खेळण्याची संधी उपलब्ध करून दिली.

तरीपण खेळपट्टीवर धोकादायक किलर मिलर असल्याने सगळीकडे माय हार्ट इज बिटींग, किप्स अॅान रिपीटींग चालू होते. दिलासादायक बाब म्हणजे १९ व्या षटकांत अर्शदीपने धावांचा लंगर लावला नाही. विसावे षटक दोन्ही संघासाठी जीव की प्राण होते. पुन्हा एकदा पांड्या मिशन इम्पॅासीबल साठी सज्ज होता. त्याच्या लो फुलटॅासवर मिलरने संपुर्ण ताकदीने चेंडू सिमारेषेबाहेर भिरकवण्याचा प्रयत्न केला. जसजसा चेंडू वर जात होता तसतसे आपला जीव खालीवर होत होता, हा चेंडू सिमापार जाऊच नये असे मनोमन वाटत होते आणि झालेही तसेच. नभातला सूर्य करोडो भारतीयांचा धावा ऐकून सिमेवर सज्ज होता. कमालीचे हॅंड आय कॅार्डीनेशन आणि एखाद्या सराईत नर्तकीचे पददालित्य दाखवत सूर्याने द.आफ्रिकेचे तारें जमींपर आणले होते. सूर्याचे ते सात पाऊले (चार सिमारेषेतले, तीन सिमारेषेबाहेरचे) जणुकाही टीम इंडियासाठी शुभमंगलं सावधान आणि सप्तपदी होते. ही सात पाऊले सातासमुद्रापार असलेल्या तमाम क्रिकेट रसिकांना सुखावून गेली. आयसीसी ट्रॅाफी येती घरा तोची दिवाळी दसरा म्हणत भारतीयांनी पुन्हा एकदा दिवाळी साजरी केली. आबालव्रुद्धांचा उत्साह ओलांडून वाहत होता. मैदानात पांड्या अॅन्ड कंपनीचे तर इकडे मनोमन सर्वांचे आनंदाश्रू ओघळत होते. रात्रीचे बारा वाजले तरी पार्टी अभी बाकी है म्हणत तरूणाईच्या उत्साहाला ऊधान आले होते आणि त्याचे कारणही तसेच होते.

निजामाच्या म्रुत्यूपत्रात एक नोंद आहे. “नान तहहयात, दौलत ब करामत” म्हणजे अन्न आयुष्य असेपर्यंत मिळेल परंतु दौलत पराक्रमानेच मिळेल. निश्चितच टीम इंडियाने आयसीसी ट्रॅाफीची दौलत आपल्या पराक्रमाने मिळवली आहे. आफ्रिकेचा संघ गोलंदीजीत प्रारंभी तीन बळी मिळवूनही विराट, अक्षर आणि दुबेला लगाम घालू शकला नाही. तर स्टब्ज, डिकॅाक, क्लासन आणि मिलर चांगल्या सुरवातीनंतरही निर्णायक खेळी करण्यात अपयशी ठरले. टीम इंडियाच्या भीमपराक्रमात विराट, अक्षरची झुंजार फलंदाजी तर बुमराह, अर्शदीप, पांड्याची भेदक गोलंदाजी यासोबत रोहीतचे कल्पक नेत्रुत्व ठळकपणे उठून दिसले.

डॅा अनिल पावशेकर
दिनांक ३० जून २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com

आम्ही साहित्यिक चे लेखक

Avatar
About `आम्ही साहित्यिक' फेसबुक ग्रुप 374 Articles
आम्ही साहित्यिक या फेसग्रुप ग्रुपवरुन आलेले लिखाण. हा ग्रुप मराठीसृष्टीने बनवला आहे व त्यावरील निवडक साहित्य मराठीसृष्टीवर प्रकाशित केले जाते. मराठीतील हा एक लोकप्रिय आणि दर्जेदार साहित्यविषयक ग्रुप आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..