वर्णती जयगाथा ऋषि व्यास
स्वयं गजानन बसला पुढती लिखित रूप देण्यांस ।। १
नाम कृष्णद्वैपायन यांचें
ज्येष्ठ पुत्र हे सत्यवतीचे
ज्ञानानें अभिधान मिळालें
‘वेदव्यास’ हें त्यांस ।। २
ऋषिवर ज्याचे स्वत:च साक्षी
कुरु नामक ख्यातकीर्त वंशीं
घटित-अघटितातून मूर्त
‘जय’ नांवाचा इतिहास ।। ३
पर्वांमधुनी घटना-वर्णन
घडे तर्क्य-अतर्क्य प्रदर्शन
पिढ्यापिढ्यांचा, संबंधांचा
एक अखंड प्रवास ।। ४
धृतराष्ट्राचे सुत, शत-कौरव
पंडूचे पुत्र, पांच-पांडव
राज्यावर अधिकार कुणाचा
हें कारण कलहास ।। ५
राज्यासाठी बंधु भांडले
सत्तेसाठी रक्त सांडलें
भावांच्या वादातुन झाला
कुरुवंशाचा र्हास ।। ६
युधिष्ठिराचे जरी सत्वगुण,
परंतु अभिमानी दुर्योधन
पूर्ण हस्तिनापुर-राज्याचा
धरीतसे हव्यास ।। ७
वैरातुन लाक्षागृह जळलें
दुष्ट-हेतु नीचांचे कळले
सुप्त द्वेष उघड्यावर येउन
भस्म करी स्नेहास ।। ८
राज्य मिळे दोहोंस विभागुन
मिळे पांडवांना खांडववन
दिलें मयानें, अमरपुरीसम
रूप इंद्रप्रस्थास ।। ९
द्यूत घडे कपटी चालींचें
वस्त्रहरण मग पांचालीचें
द्यूतातुन आला भाळीं
अज्ञातवास-वनवास ।। १०
कणही भूमि न देती कौरव
समेट घडवूं शके न केशव
अटळच जें, तें टाळायाचा
झाला व्यर्थ, प्रयास ।। ११
कौरव, पांडव, नृपती नाना
अक्षहौणी अठरांची सेना
एका वा दुसर्या पक्षातुन
झाले सिद्ध रणास ।। १२
कुरुक्षेत्रावर आप्त-गुरूजन
बघुन संभ्रमित होई अर्जुन
गीता सांगुन, बोध द्यावया
लागे श्रीकृष्णास ।। १३
मित्र-बंधु लागले लढाया
स्वकीयांस लागले वधाया
कुरुक्षेत्रावर पडली चहुंवर
हताहतांची रास ।। १४
दिवस अष्टदश, युद्ध चालले
लाखो मेले, विश्व हालले
हरलेले, शोकाकुल सारे,
विजयी सर्व, उदास ।। १५
प्रलयंकारी युद्ध भयंकर
नच दुसरें होईल धरेवर
असा पराक्रम महारथींचा,
ऐसा महा-विनाश ।। १६
झाला येथें अंत युगाचा
नाश जाहला ज्ञात-जगाचा
काळानेंही क्षणभर थांबुन
सोडियला निश्वास ।। १७
या धरतीवर, युगांयुगांतिल
पिढ्या शेकडो येतिल-जातिल
त्या सर्वांनी धडा शिकावा
हा व्यासांचा ध्यास ।। १८
– – –
(माझ्या, ‘गा जयगाथा पंडुसुतांची’ या
आगामी गीत-संग्रहातून )
–
– सुभाष स. नाईक. Subhash S. Naik
सांताक्रुझ (प), मुंबई. Santacruz (W), Mumbai.
Ph-Res-(91)-(22)-26105365. M – (91)-9869002126
eMail : vistainfin@yahoo.co.in
Website : www.subhashsnaik.com / www.snehalatanaik
Leave a Reply