दीपावली म्हणजे पाच सणांचा सामुहिक प्रकाश पर्व. वास्तविक प्राचीन मान्यतेनुसार या पाच उत्सवांशी वेगवेगळ्या घटना जोडल्या गेल्या आहेत. पण खोलवर विचार केला तर आपल्याला हे पाचही उत्सव दीपावलीच्या एका प्रकाशमान श्रृंखलेत गुंफले असल्याचे जाणवते.
सगळ्यात पहिला पर्व आहे तो धनत्रयोदशीचा. या दिवशी वैद्य शिरोमणी धन्वंतरी यांचा जन्म झाला होता. त्यामुळे या दिवशी घराच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले जाते. रात्री घराच्या उंबरठ्यावर एक दिवा लावला जातो. त्याला “यम दीपक” म्हटले जाते. यम मृत्यूदेवता आहे.
दुसर्या दिवशीचा सण म्हणजे नरक चतुर्दशी. पौराणिक मान्यतेनुसार या दिवशी अत्याचारी दैत्य नरकासुराचा वध करण्यात आला होता. याचा आनंद व्यक्त करण्यासाठी या दिवशी दिवे लावून आनंदोत्सव साजरा केला जातो.
याच क्रमाचा तिसरा आणि सर्वात मोठा सण म्हणजे दीपावली. हा अमावस्येच्या रात्री साजरा केला जातो. या उत्सवाशी अनेक घटना जोडल्या गेलेल्या आहेत. लंका विजयानंतर या दिवशी श्री राम आयोध्येला परत आले होते. आणि आयोध्यावासियांनी वाटेवर, आपल्या घरासमोर रांगोळी काढून, दिवे लावून त्यांचे स्वागत केले होते. याच दिवशी धन-दौलतीची देवता लक्ष्मी प्रकट झाली होती. म्हणून लक्ष्मीचे पूजन केले जाते. आणि दिवे लावून आनंदोत्सव साजारा केला जातो.
आर्य समाजाचे संस्थापक स्वामी दयानंद सरस्वती यांचे निर्वाण दीपावलीच्या दिवशी झाले होते. जैन धर्माचे शेवटचे तीर्थंकर महावीर स्वामी यांनीसुद्धा याच दिवशी आपल्या शरीराचा त्याग केला होता. स्वामी रामकृष्ण परमहंस यांच्या जन्माची तिथी आणि मृत्यूची तिथी दोन्हीही दीपावली दिवशीच आहे. मुंबई किवा महाराष्ट्रात दीपावलीच्या रात्री घरीदारी दिवे लावलेले असतात. फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. आणि व्यापाराचे नवीन खातेही उघडले जाते.
दीपावली उत्सवातली पुढची श्रृंखला म्हणजे गोवर्धन पूजन. प्रचलित कथेनुसार एकदा इंद्र क्रोधीत होऊन गोकुळ नगरीवर पर्ज्यनाचा अक्षरशः वर्षाव केला होता. तेव्हा श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर पेलून त्याखाली गोकुळवासियांना आश्रय देऊन त्यांचे रक्षण केले होते.ही कथा आपल्याला आपल्या जीवनात जंगल आणि डोंगर-दर्यांच्या असलेल्या महत्त्वावर प्रकाश टाकते. जंगल, डोंगर-दर्यांचे रक्षण म्हणजे पर्यायाने पर्यावरणाचे रक्षण. त्यामुळेच आपले ओल्या आणि सुख्या दुष्काळापासून रक्षण होते.
पाचवा आणि शेवटचा सण म्हणजे भाऊबीज. या दिवशी यमाने आपल्या बहिणीच्या- यमुनेच्या घरी भोजन केले होते. आणि जो कोणी या दिवशी आपल्या बहिणीच्या घरी भोजन करेल, त्याला मृत्यूरोग होणार नाही, असा वरदान दिला होता. राजस्थानच्या काही भागात दीपावलीच्या दिवशी मांजरीचा लक्ष्मीचे रुप मानून आदर केला जातो. तिला विविध प्रकारची पक्वाने खायला घातली जातात. या दिवशी तिच्यामुळे घरात एखादे नुकासान झाले असल्यास, ते शुभ मानले जाते. आपल्या महाराष्ट्रात घराच्या स्वच्छतेला आणि सजावटीला विशेष महत्त्व दिले जाते. पाडवा मोठ्या हर्षोल्हासाने साजरा केला जातो. शिवाय रात्री नृत्य आणि संगीताचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात घेतले जातात. गुजरातमध्ये दीपावलीच्यादिवशी मीठाची खरेदी-विक्री शुभ मानली जाते. रात्री लहान मुलं मशाल घेऊन फेरी काढतात. महिला या मुलांना मिठाई खायला देतात. पैसे देतात. हैद्राबादमध्ये दीपावलीदिवशी म्हैशींच्या स्पर्धा लावण्याची परंपरा आहे. दक्षिण भारतात कागदाची मंदिरे बनवून त्यात लक्ष्मीची प्रतिमा ठेवली जाते आणि तिची पूजा केली जाते.
अमृतसरमध्ये यादिवशी सुवर्ण मंदिरात विशेष कार्यक्रम होतात. प्रचलित परंपरेनुसार सिख धर्माचे चौथे गुरू रामदास यांनी दीपावलीदिवशी आपल्या समर्थकांचे संमेलन अमृतसरमध्ये भरवले होते. व सुवर्ण मंदिराच्या बांधकामाची मुहूर्तमेढही याचदिवशी रोवली गेली होती. त्यामुळे या दिवशी मंदिरात खूप मोठी प्रकाशाची उधळण केली जाते. बिहारमध्ये दीपावलीदिवशी कच्च्या नारळाचे सेवन शुभ मानले जाते. आदिवाशी क्षेत्रात पुरुष धान्य किवा हिरव्या दुर्वांनी भरलेले मातीचे भांडे आपल्या डोक्यावर घेतात आणि हातात मशाल घेऊन संपूर्ण गावातून फेरी काढतात. कर्नाटकात यादिवशी उठणे लावून स्नान करण्याची प्रथा आहे. उत्तराखंड क्षेत्रात या दिवशी गायीची पूजा केली जाते. बंगालमध्ये कालीमातेचीही पूजा विशेत्वाने केली जाते.
दीपावलीचा सण केवळ आपल्या देशातच साजरा केला जातो, असे नाही तर विदेशातही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. नेपाळमध्ये दिवाळीला मोठ्या उत्साहाचे वातावरण असते. तिथेसुद्धा दीपावली संपूर्ण पाच दिवस साजरी केली जाते, पण त्याचे स्वरुप काहीसे वेगळे आहे. तिथे पहिल्यादिवशी कावळ्यांची आणि दुसर्यादिवशी कुत्र्यांची पूजा केली जाते. यमाच्या प्रकोपापासून सुटका व्हावी, हा एवढाच त्यामागचा उद्देश आहे. तिसर्यादिवशी मात्र आपल्या इथल्याप्रमाणे दीपावलीचा आनंदोत्सव साजरा केला जाते. या दिवशी पहाटे गोपूजा आणि संध्याकाळी लक्ष्मीपूजन केले जाते. दिवा लावण्याची आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्याची परंपरा आपल्या देशासारखीच आहे. चौथ्या आणि पाचव्या दिवशी गोवर्धन पूजन आणि भाऊबीज उत्सव साजरा केला जातो. श्रीलंकेत यादिवशी खडीसाखर खाण्याचा प्रघात आहे. खडीसाखरेचे सेवन तिथे शुभ मानले जाते. रात्री प्रकाश उधळण आणि आतिषबाजी यांची मोठी व्यवस्था केली जाते.
मॉरिशसमध्ये तुपाचा दिवा लावण्याची परंपरा आहे. हे शुभ कार्य पहाटेवेळी घरातल्या नवविवाहिता किंवा अविवाहित युवतींकडून करवून घेतले जाते. दीपावलीदिवशी लक्ष्मी पूजनाबरोबरच राम पूजनालाही विशेष महत्त्व दिले जाते. फिजीमध्येही दीपावलीचे आयोजन मोठ्या उत्साहात केले जाते. इथल्या उत्सवाचे स्वरुप आणि परंपरा आपल्याशी बरीच मिळती-जुळती आहे. इथे रामलीला मोठ्या प्रमाणात आयोजित केली जाते.
चीनमध्ये या दिपोत्सवाला नाव दिलं आहे ते, नई महुआ. भारतातल्याप्रमाणेच इथे दिपोत्सवापूर्वी घराघरांची स्वच्छता, रंगरंगोटी केली जाते. घरांच्या दरवाजाच्या दोन्ही बाजूला चीनी भाषेत शुभ आणि लाभ लिहिले जाते. शिवाय दोन्ही बाजूला एक मानवाकृती रेखाटली जाते. या आकृतींना मॅन-शॅन म्हटले जाते. यांना विजयाचे प्रतीक मानले जाते. यानिमित्ताने सांस्कृतिक स्पर्धा आणि कार्यक्रम यांचेही आयोजन केले जाते. चीनच्या राजधानीत १०० फुटावर एक गोलाकार चक्र बनवून त्यावर हजारो दिवे उजळवले जातात.
थायलंडमध्ये दीपावली “क्रांचोंग” या नावाने साजरी केली जाते. यादिवशी थायलंडवासीय केळीच्या पानांचे त्रोण बनवतात. त्यात जळती मेणबत्ती ठेवून नदी पात्रात सोडतात. जपानमध्ये दीपोत्सव तीन दिवस साजरा केला जातो. मुख्य उत्सव शेवटच्यादिवशी असतो. त्याला सुख-समृद्धी देणारा दिवस असे तिथले लोक मानतात. विशेष म्हणजे या तीन दिवसांमध्ये जपानी लोक झाडूला हात लावत नाहीत आणि झाडूने आपले घर स्वच्छ करत नाहीत किवा झाडत नाहीत. या कालावधीत पाणी, हात किवा कापडाने घरदार साफ केले जाते.
मुस्लीम देश असलेल्या मलेशियातसुद्धा दीपावली मोठ्या उत्साहाने राष्ट्रीय स्तरावर साजरी केली जाते. यादिवशी तिथे सार्वजनिक सुट्टी असते. मोठ्या प्रमाणात रोषणाई आणि आतिषबाजी केली जाते. रामलीलासुद्धा खेळला जातो. लंका विजयानंतर राम परत आल्याच्या आनंदात मलेशियात दीपावली साजरी केली जाते. लक्ष्मी जन्माशी मात्र त्याचा काही संबंध नाही. तिथे त्यांचे वेगळेच असे रामायण आहे. हिकायत सिरीराम या नावाने ते ओळखले जाते. याशिवाय म्यानमार, लाओस, वियतनाम, इंडोनेशिया आणि सिगापूर आदी देशांमध्येसुद्धा रामलीलाचे आयोजन आणि दिव्यांचा उत्सव साजरा केला जातो.
— मच्छिंद्र ऐनापुरे
Leave a Reply