तिरुपतीमध्ये सध्या ‘आंध्र प्रदेश पोलीस मीट २०२१’ चे आयोजन करण्यात आलेले आहे. श्यामसुंदर हे तिरुपती पोलीस ट्रेनिंग स्कूलमध्ये सर्कल इन्स्पेक्टर म्हणून तैनात आहेत. ‘ड्युटी मीट’साठी त्यांची पोलीस उपअधीक्षक मुलगी जे. सी. प्रशांती ही देखील तिथे हजर झाली. रविवारी प्रशांती समोर आल्यानंतर श्यामसुंदर यांनी आपल्या डीसीपी मुलीला ‘नमस्ते मॅडम’ म्हणत कडक सॅल्युट ठोकला.
हा क्षण श्यामसुंदर यांना मुलीबद्दलच्या सार्थ अभिमानाचा व कौतुकाचा होता. सव्वीस वर्षांच्या देशसेवेमध्ये त्यांनी अनेक वरिष्ठांना, मान्यवरांना सॅल्युट ठोकला होता, तेव्हा ती त्यांची ड्युटी होती. मात्र आज आपल्या लाडक्या लेकीला सॅल्युट ठोकताना त्यांची छाती अभिमानाने फुलून आली.
श्यामसुंदर यांच्या डोळ्यासमोर भूतकाळातील प्रसंग एकापाठोपाठ एक येऊ लागले… पोलीस खात्यात नोकरी लागल्यावर श्यामसुंदरच्या आई-वडिलांनी त्यांचे लग्न लावून दिलं. दोन वर्षांनी प्रशांतीचा जन्म झाला. लहानपणापासून हुशार असलेल्या प्रशांतीने शालेय शिक्षणात नेहमीच उत्तुंग यश मिळविले. ती सात वर्षांची असताना तिने आपल्या वडिलांप्रमाणे इन्स्पेक्टरच्या ड्रेसचा हट्ट धरला. श्यामसुंदर यांनी तो कौतुकाने पूर्णही केला. ही गोष्ट प्रशांतीच्या मनामध्ये कोरली गेली होती. भातुकली खेळण्याच्या वयात प्रशांती सवंगड्यांबरोबर चोर-पोलीस खेळ खेळू लागली कर्तव्यदक्ष वडिलांचे संस्कार तिच्यात उतरत होते. दिवसभर ड्युटी करुन आल्यावर श्यामसुंदर यांना प्रशांतीला जवळ घेतल्यानंतर हायसं वाटायचं.
माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रशांतीने वडिलांना पोलीस सेवेत जाण्याचा मनोदय बोलून दाखवला. श्यामसुंदर यांनी पहिल्यांदा या बाबत नाराजी दर्शवली. प्रशांती आपल्या निर्णयावर ठाम आहे, हे समजल्यावर त्यांनी तिला परवानगी दिली. प्रशांतीने संबंधित परीक्षा देऊन आपली महत्त्वाकांक्षा यशस्वीपणे पूर्ण केली.
श्यामसुंदर यांना मनातून राहून राहून वाटत होतं की, आपल्या निवृत्तीच्या आधी आपल्या मुलीबरोबर काम करण्याची एकदा तरी संधी मिळावी. तो क्षण या ‘मीट २०२१’ मुळे प्रत्यक्षात आला….
वडिलांनी प्रशांतीला सॅल्युट केल्यावर क्षणभर ती अवाक् झाली, दुसऱ्याच क्षणी तिनं आपल्या जन्मदात्याला उत्तरादाखल सॅल्युट केला. हा हृदयस्पर्शी प्रसंग पाहणाऱ्या सहकाऱ्यांनी या क्षणाला मोबाईलमध्ये टिपले व बाप-लेकीच्या जोडीवर स्तुतिसुमने उधळत सोशल मीडियावर शेअर करुन आपल्या भावना प्रकट केल्या.
हे बाप-लेकीचं अनोखं नातं अनेक क्षेत्रांत आपल्याला दिसू शकतं. जसं मुलगी न्यायाधीश, बाप वकील. बाप प्राध्यापक, मुलगी प्राचार्य. मुलगी प्रकाशक, बाप लेखक. मुलगी हेड आॅफ डिपार्टमेंट, बाप आॅफिसर. कोणत्याही क्षेत्रात आपली मुलगी पुढे गेल्याचं बापाला कौतुक वाटणं, अभिमान वाटणं साहजिकच आहे.
मुलगी असणं हे भाग्याचं असतं. आपण तिला लक्ष्मी म्हणतो. ती ज्ञान देणारी सरस्वतीही होऊ शकते किंवा अन्यायाविरुद्ध लढा देणारी दुर्गाही होऊ शकते. मुलगी झाली म्हणून निराश होणारी पिढी हळूहळू कमी होते आहे. हीच तर नव्या युगाची सुरुवात आहे….
-सुरेश नावडकर ७-१-२१
मोबाईल ९७३००३४२८४
sundar lekh