व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंकामध्ये प्रकाशित झालेला प्रतिष्ठा कुलकर्णी-सोनटक्के यांचा लेख
स्त्यावरून चालताना आपले पाय अचानक थबकतात… कळत नाही पण आपण आपोआप थांबतो.. कारण कुठेतरी बारीक आवाजात लतादीदींचे सूर कानावर पडतायत. जहांगीर आर्ट गॅलरी पाहून मन थक्क होतं… रेषा, वर्तुळ, चौकोन, मानवी भावमुद्रा, विविध रंगांची उधळण. मन प्रसन्न होतं. घुगरांचा ताल असो, ढोलकीची थाप असो, सप्तसुरांचा नृत्याविष्कार पाहून आपसूक आपलेही पाय ताल धरायला लावतात. ओबडधोबड माती, पण त्यातून निर्माण झालेली मूर्ती; काळाभिन्न दगड पण जेव्हा त्याची कलाकृती बनते, त्याला देवत्व येते आणि आपले हात नमनासाठी जुळतात.
संगीत, चित्रकला, नृत्यकला, शिल्पकला या काय आहेत! त्या भावनाप्रदानाचे साधन आहे. ती खरी कला जी भावना देते. जीवनाला, व्यक्तिमत्त्वाला सुसंस्कृत करणारे अंग म्हणजे कला. अशा विविधांगी कलांची खाण असलेला आपला भारत देश. भारताची जी थोर संस्कृती आहे, ती या कलांमधून प्रवाहित झाली आणि प्रसारित झाली. भारतीय संस्कृतीने अनेक स्थित्यंतरे पाहिली. काळानुसार ती बदलत गेली. तिला गंगा जमुना संस्कृती म्हणतात. एका बाजूने गंगा येते, एकाबाजूने जमुना येते. दोघींच्या मिलनातून तिसरी जन्म घेते आणि त्यात सामावून जाते. भारतीय संस्कृती अशी वाहत्या नदीसारखी आहे. वैविध्य हे खास वैशिष्ट्य तिने अनंतकाळ जपले आहे.
भारताचे वेगळेपण म्हणून इथले संगीत, शिल्प, संस्कृत भाषा, योग, आयुर्वेद, विविध कला असे जे जे जगाला माहीत आहे, ते पूर्वी कधीतरी शोधून काढलेले भारतातले सार आहे. हे सार शोधून काढल्यानंतरही भारताच्या प्रांतोप्राती आणि गावोगावी हजारो लोकांनी कितीतरी नवीन गोष्टी तयार केल्या आहेत. न नोंदले गेलेले, प्रकाशात न आलेले अनेक आचार, विचार, कला, शास्त्र, साहित्य हे लोककला, लोकसाहित्य, लोकाचार या नावाने आजही भारतात आहेत. नवीन निर्माण होत आहेत. हे सर्व भारतीय आहे. सर्व भारतीयांना ते माहीत झाले पाहिजे. आपले वाटले पाहिजे. यातूनच आपला स्वदेशी बाणा जपला जाणार आहे.
प्रमुख कलांचा संदर्भ घेऊन विषय मांडण्याचा प्रयत्न केला आहे, कारण व्याप्ती अफाट आहे. या विषयात रुची असणाऱ्यांनी याचे खोलात जाऊन वाचन करावे.
आपला देश निसर्गपूजक आहे. याच संस्कारातून चित्रशैलीचा उगम झाला. भारतात असे अनेक समाज आहेत. त्या समाजात चित्रनिर्मिती करणारे चित्रकार आहेत. आवर्जून सांगण्यासारखी गोष्ट म्हणजे बहुतेक समाजात चित्रकारितेचे काम स्त्रिया करतात.
सर्वसाधारणपणे ही चित्रे जमिनीवर रांगोळ्यांच्या रूपात, भिंतीवर किंवा कापडावर काढली जातात. उत्सवप्रसंगी, लग्नसमारंभात चित्र काढणे व त्या चित्रासमोरच सर्व मंगलविधी पार पाडणे हा शुभसंकेत मानला जातो. यावरून भारतात चित्रकलेला किती मान आहे हे लक्षात येते. चित्र काढणे ही गोष्ट धर्माशी संबंधित आहे. आदिवासी संस्कृतीत हे कलेचे मूळ खऱ्या अर्थाने सापडते. जगभरात प्रसिद्ध असलेली वारली पेंटिंग ही आपल्या भूमीतील ग्रामीण जीवनाचे, मानवी भावभावनांचे सुरेख चित्रण हे याचे वैशिष्ट्य. गुहाचित्रे, लोककलाचित्रे, पहाडी प्रदेशातील लघुचित्रे हा भारतीय चित्रकलेचा प्राण आहे. भारतीयांची मान ताठ आहे ती अजून एका चित्रशैलीमुळे. ती चित्रशैली म्हणजे ‘अजिंठा चित्रशैली.’ गुप्तकाळात बौद्ध धर्म प्रसारार्थ खोदल्या गेलेल्या या गिरिशिल्पात असलेली ही भित्तिचित्रे आजही प्रवाशांचे आकर्षण ठरलेली आहेत. या चित्रांतही रेषा हाच घटक महत्त्वाचा आहे. आलंकारिक वळणे घेत जाणाऱ्या या रेषेने आध्यात्मिक आणि लौकिक जीवनाचे सुंदर दर्शन घडवले आहे. लघुचित्रांपेक्षा या चित्रांची रेषा अधिक आलंकारिक आहे. भगवान बुद्धाचे राजेशाही आणि योगी दर्शन घडवण्यास ती समर्थ ठरली आहे. या चित्रात मानवी भावभावनांतून निर्माण होणाऱ्या नवरसांचे दर्शन घडवले आहे. मानवीच नव्हे तर पशुपक्ष्यांच्या भावनांचेही दर्शन घडवण्यात हे चित्रकार यशस्वी ठरले आहेत. ही केवळ उदाहरणदाखल नावे आहेत. संपूर्ण भारतभर हा अनमोल ठेवा आपले अस्तित्व टिकवून आहे. हा ठेवा जतन करणे, त्यातील आनंद घेणे आणि दुसऱ्यास देणे हे कर्तव्य आहे.
॥ गीतं वादनं तथा नृत्यं त्रयम् संगीतमुच्यते ।।
संगीत कला ही अतिप्राचीन कला आहे. आदि मानवाला अज्ञात गोष्टींची भीती वाटत असे. त्या अज्ञात शक्तींना प्रसन्न करण्यासाठी आदिमानव ढोल वा तत्सम चर्मवाद्ये वाजवू लागला. त्यातूनच पुढे संगीताचा जन्म झाला असावा, असा मानववंशशास्त्रज्ञांचा अंदाज आहे. खरेतर संगीताची पाळेमुळे ही त्यापेक्षाही फार खोलवर रुजली आहेत. भारतीय परंपरेतील महान ग्रंथ म्हणजे वेद. चार वेदांपैकी ‘सामवेद’ या वेदामध्ये संगीताची माहिती सापडते. भारतीय परंपरेमध्ये वेद हे अपौरुषेय मानले आहेत. म्हणजेच वेदांचा कर्ता हा मानव नसून, जगाचे नियंत्रण करणारी अज्ञात शक्ती हीच वेदांच्या निर्मितीचे कारण आहे, अशी भारतीयांची धारणा आहे. भारतीय संगीताचे ‘हिंदुस्थानी संगीत’ व ‘कर्नाटक संगीत’ असे दोन प्रकार आहेत. साधारणतः उत्तर भारतीय संगीत हे हिंदुस्थानी संगीत मानले जाते, तर दक्षिण भारतीय संगीताला कर्नाटक संगीत असे नाव आहे. त्यातही कर्नाटक संगीत हे भारतातील अतिप्राचीन संगीत आहे, असे मानले जाते. भारतीय संगीत हे रसभरित, वैविध्यपूर्ण आणि मनोरंजक आहे. भारतीय संगीताची नेमकी जाण येण्यासाठी, अवघा जीवनकाळ देखील कमी वाटावा, इतका हा संगीत महासागर विशाल आणि सखोल आहे.
सप्तस्वर, रंग संकल्पना, ख्याल गायन, संगीत घराणी, शास्त्रीय संगीत, भाव संगीत, भारतवर्षामध्ये आढळणाऱ्या विविध संगीत परंपरा या एका समान ‘भारतीय’ अस्तित्वाच्या निदर्शक आहेत. पूर्वी गुरू-शिष्य परंपरेने ही साधना जपली, वाढवली. आता संगीत शिक्षणाचे मार्ग बदलले, मात्र संस्कार नाही. तो असाच अबाधित राहिला तर संगीतकलेतून स्वदेशी मूल्यही बहरेल.
॥ रसभाव व्यंजादियुतं नृत्यभितीर्यते ।।
नृत्य म्हणजे मूलतः आनंदाची उत्स्फूर्त शारीरिक प्रतिक्रिया जी प्रत्येक प्राणिमात्रात असते. लहान मुलाला आवडती गोष्ट मिळाली की, ते आनंदानं नाचू लागतं. याच उत्स्फूर्त नाचण्याचं पहिलं साधंसुधं स्वरूप म्हणजे ‘आदिवासी नृत्य’ आणि त्याचंच जरा अधिक अर्थवाही रंजक स्वरूप म्हणजे ‘लोकनृत्य’. या नृत्यप्रकारांचं सौंदर्य त्यांच्या साध्या, सोप्या हालचालीत आणि चित्रविचित्र पोशाख व प्रांतीय संस्कृतीच्या दर्शनात असतं. जेव्हा याच नृत्याच्या ऊर्मीचा विशिष्ट भावभावना व सौंदर्यकल्पना प्रकट करण्याचं एक माध्यम या दृष्टीने उपयोग केला जातो, तेव्हा त्याचं जे नियमबद्ध रूप बनतं ते म्हणजे शास्त्रीय किंवा अभिजात नृत्य. नियमबद्ध असल्यामुळे ते शिकता शिकवता येतं. त्याची परंपरा निर्माण होऊ शकते. बदलत्या काळानुसार, समाजानुसार त्याचं स्वरूपही बदलत जातं. त्यामुळेच ते जितकं जुनं तितकंच नवीनही असतं. प्राचीन काळी नृत्य देवालयातून फक्त देवपूजेचा एक भाग म्हणून सादर होत असे. ऐतिहासिक काळात नृत्याचे प्रयोग राजदरबारात खास समारंभ व विशेष उत्सवप्रसंगी होऊ लागले व आज ते नाट्यगृहात रंगमंचावर सादर होतात. भारतीय अभिजात नृत्य आज त्याचा आध्यात्मिक गाभा कायम ठेवून अधिक समाजाभिमुख झालं आहे. भारतीय अभिजात नृत्याचा विशेष म्हणजे चित्र, शिल्प, साहित्य व संगीत या सर्वच अभिजात कला प्रकाराची संकल्पना या नृत्यातून प्रत्यक्षपणे साकारली जाते. पारंपरिक नृत्यशैली आपल्या जुन्या संस्कृतीचं जतन करणाऱ्या आहेत. आज आपल्याच जुन्या संस्कृतीला पारखी होत चाललेली पिढी या नृत्यशैलीच्या शिक्षणातून जुन्या मूल्यांशी नातं जोडू शकते.
शिल्पकला
नृत्यकला, चित्रकला, हस्तकला, शिल्पकला, गायन, वादन इ. ६४ कला आणि १४ विद्यांचे माहेरघर म्हणून भारत देशाचे नाव सर्वश्रुत आहे. त्यापैकी अगदी पुरातन काळापासून शिल्पकला ही आपली खास ओळख राहिली आहे. हे सुंदर जग ज्याने निर्माण केले त्या विधात्याचे गुणगान गावे यातून नृत्य, संगीत कला उदयास आली. तो जगतनियंता कसा असेल, याचं मनः पटलावर उमटलेलं चित्र दगडांच्या कोरीव कामातून तयार झालं आणि स्थापत्य शिल्पकलेचा जन्म झाला. मूर्ती तयार झाल्या, मंदिरे उभारली. मंदिराच्या स्तंभांवर गोपुरांवर, द्वारांवर विविध शिल्पे कोरलेली दिसतात. ते मंदिर कोणत्या काळात बांधले गेले असेल, याचीही ही शिल्पे प्रचिती देतात. भारतामध्ये आज आपल्याला घारापुरीच्या लेणी, अजिंठा-वेरुळच्या लेणी, पट्टडकळ, बदामी औरंगाबाद येथील लेणी, मध्य प्रदेशातील खजुराहो मंदिर, ओरिसातील सूर्यमंदिर, जगन्नाथ पुरी मंदिर, भुवनेश्वरचे मुक्तेश्वर मंदिर, उदयगिरीच्या राणीगुंफा, तामिळनाडूमधील थिलाई नटराज मंदिर, तंजावर येथील बृहदिश्वर मंदिर इ. अनेक मंदिरे व लेण्या शिल्पकलेचा प्रत्यय देतात. नृत्य आणि शिल्प कला एकमेकाना पूरक ठरल्या हे अनेक उदाहरणांवरून सिद्ध झाले आहे. गुंफा, लेणी, मंदिरे, काष्ठ, मेण इ. अनेक स्वरूपांत शिल्पकला जिवंत आहे.
हस्तकला
आपला देश अनेक प्रकारच्या कलाकुसरीच्या कामाबद्दल कित्येक वर्षापासून प्रसिद्ध आहे. थेट काश्मिर ते कन्याकुमारी आणि भूज ते पश्चिम बंगालपर्यंत व्यापलेल्या सर्व भूभागावर लोकांनी निरनिराळ्या पारंपरिक हस्तकला अवगत केल्या आहेत. त्याचा मूळ धागा या वरील कलांशी जोडला गेला आहे. म्हणून त्याचा विस्ताराने आढावा घेतला पाहिजे. भारताचे विविधता हे जे वैशिष्ट्य आहे, ते कला कौशल्यातून प्रकर्षाने जाणवते. नक्षीकाम, काचकाम, लाकडावरील कोरीव काम, मणेरी काम, हस्तिदंत, शिंपले, मातीची भांडी, शिवणकाम यातून ही कला विकसित झाली आणि ती जीवनाची अत्यावश्यक घटक बनली. रोजगारासाठी तिचा आधार बनला. आता ती पैसा मिळवण्याचे चांगले साधन देखील झाली आहे. अनेक लोक, खासकरून महिला त्यांच्याजवळच्या हस्तकला कौशल्यातून अशा वस्तू तयार करत आहेत आणि हस्तकला म्हणून त्या घरातूनच त्यांचा व्यवसाय करत आहेत.
हस्तकला व्यवसायाला नव्या नव्या संधी मिळाल्याचे सध्या सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे. केंद्रीय अल्पसंख्यक मंत्रालयातर्फे दरवर्षी ‘हुनर हाट’ हे प्रदर्शन भरवले जाते. गेल्या पाच वर्षात देशभरातील पाच लाखांहून अधिक हस्तनिर्मित वस्तूंच्या कारागिरांना ‘हुनर हाट’मुळे मोठ्या प्रमाणावर रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. ही स्वदेशी उत्पादने विलक्षण लोकप्रिय झाली आहेत. देशभरातील दुर्गम ते सगळ्याच भागातील कारागिरांना, त्यांच्या कौशल्य व उत्पादनांना यामुळे बाजारपेठ उपलब्ध झाली आहे. हुनर हाट, स्वदेशी हस्तनिर्मित वस्तूंची खरीखुरी नाममुद्रा अर्थात ब्रॅण्ड झाला आहे. हस्तकला विकास आयुक्त, भारत सरकार, मुंबई येथील हस्तकला विकास कार्यालय हे देखील हस्तकलांचे संरक्षण करणे, वाढविणे, यासाठी प्रयत्नशील असते. गावपातळीवर अशी प्रदर्शने, मेळावे मोठ्या प्रमाणावर भरवली तर स्वदेशी कारागिरांना आंतरराष्ट्रीय पातळीवर बाजारपेठ उपलब्ध होऊन चांगली आवक होऊ शकते. देशातील कलांचा वारसा असलेल्या लाखो कारागिरांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण होऊ शकेल.
कलेतून स्वदेशीप
स्वामी विवेकानंद म्हणतात, ‘कला ही कमळासारखी असावी’ कमळ हे चिखल आणि पाणी यांतून अन्नरस घेऊन वर येते, उमलते. ते पाण्यात असूनही पाण्याच्या वर असते. तशी कला ही वास्तवात असूनही वास्तवापासून अलग असावी. कलानिर्मितीची मूळ कल्पना वास्तवातील गोष्टीतून घ्यायची असते; परंतु कलेचे अंतिम रूप हे निसर्गाचे अंतरंग उलगडून दाखवणारे असावे लागते आणि अशा दृष्टीने भारतीय कला ही खरी कला मानावी लागते आणि त्याचा आपल्याला रास्त अभिमान वाटतो.
आपल्या प्रत्येक प्रांतातील कला, कौशल्य यातील वेगळेपण जपले तर संस्कृती संवर्धन आणि परस्परांमध्ये देवाण घेवाण होऊ शकते. वेगळेपण टिकणे म्हणजेच स्वदेशी बाणा. तो जपूया !! यासाठी काही बदल करावेही लागतील. अगदी लहान वयापासून देशी वळणाचा आग्रह धरणारी शिक्षणपद्धत अंगीकारली पाहिजे. स्वदेशी वस्तू आणि शैली ही अधिक आकर्षक व झोकाची वाटली पाहिजे, असे वळण घराघरांतून व शाळाशाळांतून लावले पाहिजे. माझ्या कोणत्याही कृतीतून माझ्या भारतातील अडाणी, श्रमिक, कारागीर, उद्योजक व व्यापारी जगेल असे वागणे, ही खऱ्या देशभक्तीची खूण मानली गेली पाहिजे. गंगेचं पाणी रोज वाहतं, बदलत असतं; पण तिचं ‘गंगापण टिकून राहतं, कालपरत्वे, हवामानपरत्वे बदल जरूर हवेत; पण त्या बदलाचा पाया पाश्चात्त्यांचे अनुकरण हा नसावा, जुन्या परंपरांचा दुराग्रह हाही नसावा, तर खळाळत्या जीवनाला समृद्धपणे सामोरं जाणारं भारतीय मन हे त्याचं अंतरंग असावं, ती खरी स्वदेशी आहे.
(व्यास क्रिएशनच्या प्रतिभा दिवाळी २०२० च्या अंका मधून)
Leave a Reply