हॉलिवुडमधील क्लिंट इस्टवुड हा माझा आवडता अभिनेता आहे. त्याचे काऊबाॅईजच्या पठडीतले बरेच चित्रपट मी पाहिलेले आहेत. आपल्या हिंदी चित्रपटसृष्टीत, क्लिंट इस्टवुड सारखाच दिसणारा व त्याची हुबेहूब ‘कॉपी’ करणारा, फिरोज खान हा एकमेव कलाकार आहे!
१९७५ साली मी नुकताच दहावीची परीक्षा देऊन ‘रिलॅक्स’ झालो होतो. तेव्हा ‘खोटे सिक्के’ हा चित्रपट मॅटिनीला पाहिला. शहरात गुंडागर्दी करणाऱ्या युवकांना हाताशी घेऊन खेड्यातील डाकूंचा नायनाट करणारा पडद्यावरील हा देसी ‘काऊबॉय’, हॉलीवुड चित्रपटाहून मला अधिक आवडला. त्याच्या पडद्यावरील एंट्रीला देखील पाश्चात्य संगीताची टिपिकल धून वापरलेली होती..
फिरोज खानचा जन्म बंगलोरमध्ये १९३९ साली झाला. त्याचे वडील पठाण व आई इराणी होती. हे एकूण चार भाऊ. फिरोज, संजय, अकबर व समीन. चौघांचेही हिंदी चित्रपटसृष्टीत योगदान आहे. फिरोजचं व्यक्तिमत्त्व हिरोला साजेसं होतं. त्याला पहिली संधी मिळाली १९६० सालातील ‘दीदी’ या चित्रपटाने! या सहकलाकाराच्या भूमिकेनंतर पुढील अनेक वर्षे फिरोज तशाच ‘सपोर्टिंग’ कलाकाराच्या भूमिका करीत राहिला..
१९६५ साली आलेल्या ‘उंचे लोग’ या चित्रपटाने, त्याची खरी घोडदौड सुरु झाली. याच वर्षात त्यानं हवाई सुंदरी असलेल्या ‘सुंदरी’ नावाच्या तरुणीशी लग्न केलं. ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटातील भूमिकेसाठी त्याला फिल्मफेअरचा ‘सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेता’चा पुरस्कार मिळाला.
शेवटी या सहायक भूमिकांना कंटाळून त्यानं स्वतःच्या बॅनरखाली ‘अपराध’ या चित्रपटाची निर्मिती व दिग्दर्शनही स्वतःच केले. जर्मनीतील कार रेसचे चित्रीकरण असलेला मुमताज बरोबरचा, हा रोमॅंटिक चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान चालला..
१९७५ साली त्यानं ‘गॉडफादर’ या इंग्रजी चित्रपटावर बेतलेल्या ‘धर्मात्मा’ या चित्रपटाची निर्मिती केली. या चित्रपटात त्याच्यासोबत हेमामालिनी व रेखा, या दोन नायिका होत्या. या चित्रपटातील गाण्याद्वारे, ‘कंचन’ नावाच्या पार्श्वगायिकेने चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. याच वर्षात रवि नगाईच निर्मित त्याचा ‘काला सोना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. यामध्ये देखील तो काऊबॉईजसारखाच वावरला होता..
१९८० साली त्याचा ‘कुर्बानी’ हा सुपरडुपर हिट चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाने त्याच्या आधीच्या उत्पन्नाची सर्व रेकाॅर्ड मोडली. या चित्रपटातील ‘आप जैसा कोई..’ या गाण्याद्वारे नाजिया हसन ही नवीन पार्श्वगायिका रातोरात स्टार झाली.
१९८६ साली ‘जॉंबाज’ चित्रपटात त्याने अनिल कपूर व डिंपलला घेतले. हा देखील चित्रपट तुफान गाजला. त्याच्या प्रत्येक चित्रपटात त्याने, त्याचे आवडते घोडे व काऊबॉईजची डोक्यावरील कॅप कायमच ठेवली.
‘नायकन’ या गुन्हेगारी विश्वावरील, तमिळ चित्रपटावरुन फिरोज खानने ‘दयावान’ हा चित्रपट १९८८ ला प्रदर्शित केला. त्यामध्ये त्याने विनोद खन्नाला ‘कुर्बानी’ नंतर पुन्हा घेतले. शिवाय माधुरी दीक्षित ही नायिका होती..
त्यानंतर ‘यल्गार’ व ‘जानशीन’ या दोन चित्रपटांची निर्मिती त्याने केली. ‘प्रेमअगन’ चित्रपटाद्वारे त्याने आपल्या मुलाला, फरदीनला संधी दिली. फरदीनला मात्र वडिलांसारखे यश काही मिळाले नाही..
२००७ साली फिरोज खानचा शेवटचा चित्रपट ‘वेलकम’ हा प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्याने त्याचा गेटअप पूर्णपणे बदललेला होता. डोक्यावर टक्कल असलेला हा ‘आरडीएक्स’ नावाचा खलनायक एकदम वेगळा वाटला. या चित्रपटानंतर त्याला दोन वर्ष कॅन्सरशी झगडावं लागलं. २७ एप्रिल २००९ रोजी या ‘देसी काऊबॉय’नं या जगाचा निरोप घेतला..
‘कुर्बानी’ चित्रपटाचे वेळी पैसे कमी पडल्याने फिरोजने त्याच्या बंगलोरच्या फार्म हाऊसवरील, मालकीचे काही घोडे विकून पैसे उभे केले होते. त्याने आयुष्यभर या घोड्यांवरती जिवापाड प्रेम केले होते.
शक्ती कपूर चित्रपटात काम मिळावे म्हणून संघर्ष करीत असताना त्याच्या फियाट कारचे एका मर्सिडीजने ओव्हरटेक करताना नुकसान केले. शक्ती त्या ड्रायव्हरला झापण्यासाठी मर्सिडीज जवळ गेला, पहातो तो फिरोज खान दिसला. शक्तीने तक्रार न करता फिरोजला चित्रपटात काम देण्याची विनंती केली. काही दिवसांनी एका ऑडिशनला शक्तीला तेथील माणसाने सांगितले की, तुमच्या साठी एक रोल आहे, मात्र फिरोज साहेबांनी तो एकदा भेटलेल्या फियाटच्या ड्रायव्हरसाठी राखून ठेवलाय. शक्तीने त्या माणसाला सांगितले की, तो ड्रायव्हर मीच आहे! याच चित्रपटापासून शक्ती कपूरचं नशीब फळफळलं.
फिरोज खानच्या जीवनातील काही योगायोग थक्क करणारे आहेत… क्लिंट इस्टवुडने देखील फिरोजप्रमाणे, हवाई सुंदरीशीच लग्न केलेले आहे.. फिरोजचा जिगरी दोस्त, विनोद खन्नाच्या मृत्यूची तारीख देखील २७ एप्रिलच आहे.
मला जेव्हा कधी निवांत वेळ मिळतो, तेव्हा मी यु ट्युबवर ‘खोटे सिक्के’ चित्रपट पाहतो. हिंदी चित्रपटसृष्टीत तसे ‘सिक्के’ भरपूर आहेत. फिरोज खानचा चित्रपट पहाण्याचा आनंद मात्र ‘बंदा रुपैया’ आहे.
© सुरेश नावडकर.
मोबाईल ९७३००३४२८४
४-८-२१.
Leave a Reply