15 ऑगस्ट 1947 ला जेंव्हा भारत स्वतंत्र झाला तेंव्हा जर कोणी असे म्हटले असते की भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात ब्रिटनचा पंतप्रधान हा भारतीय असेल तर त्या व्यक्तीला त्यावेळी वेड्यात काढले गेले असते. पण नियतीचा खेळ काही वेगळाच असतो. भारत आपल्या स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष साजरा करत असतांना, आपल्या देशावर दीडशे वर्ष राज्य करणाऱ्या त्या इंग्लंडचा पंतप्रधान हा भारतीय वंशाचा व्हावा हाच नियतीचा आणि निसर्गाचा एक न्याय आहे असे म्हणायला हरकत नाही. काळाचा महिमा अगाध असतो तेच खरे.
त्याचं कारणही तसंच. असं म्हणतात की ब्रिटिशांच्या साम्राज्यावरील सूर्य कधीच अस्ताला जात नव्हता. क्षेत्रफळाने व लोकसंख्येने अतिशय छोटया असलेल्या या देशाने परंपरांची जोखडं झुगारून विज्ञानाची कास धरली आणि आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर जवळपास संपूर्ण जगात आपले साम्राज्य स्थापन केले होते.फार कशाला आता दशकभरापूर्वी होंगकोंग हा चीनचा प्रांत ब्रिटिशांच्या ताब्यातून मुक्त झाला. कदाचित ती त्यांची शेवटची वसाहत असावी. त्या ब्रिटिशांचा पंतप्रधान हा एक दिवस भारतीय वंशाचा होईल ही गोष्ट म्हणजे स्वप्नवत होती. पण भारतीयांनी ती गोष्ट शक्य करून दाखविली.
संपूर्ण जगावर आपली सत्ता गाजवणाऱ्या या ब्रिटिशांनी भारतावर सुद्धा जवळपास दीडशे वर्ष राज्य केले. भारताच्या तुलनेत चिमूटभर असणाऱ्या लोकांनी येऊन आपल्या बलाढ्य देशावर हुकूमत गाजवली. ‘गुलामी’ मग ती कोणाचीही असो वाईटच.
ब्रिटिशांच्या या राजवटीचे अनेक फायदे आपल्याला झाले हेही मान्य करावेच लागेल. इंग्रजांपूर्वी आपल्या देशात सहाशे ते साडेसहाशे संस्थाने होती. देशाच्या विविध भागात विविध राजे राज्य करत होती. ती सर्व राज्य व संस्थाने जिंकून किंवा त्या राजांना मांडलिक करून, संस्थाने खालसा करून अखंड भारत वा एकसंघ भारत ही संकल्पना इंग्रजांनीच शक्य केली असे म्हणायला हरकत नाही. देशात शिक्षण, रेल्वे, टेलिफोन, पोस्ट, रस्ते, तारायंत्र, शेतजमिनीच्या मोजण्या, वन कायदे, महसूल कायदे, पोलीस कायदे अशा अनेक चांगल्या गोष्टी ही इंग्रजांचीच देण आहे. आजही अनेक इंग्रज कालीन कायदयांचा आधार घेऊन देश चालू आहे. त्यांनी अनेक चांगल्या गोष्टी आपल्या देशात आणल्या हे जरी सत्य असले तरी त्यांनी ज्याही सोयी सुविधा केल्या त्या त्यांच्या फायद्यासाठी व आपले शोषण करण्यासाठी केल्या हे तेवढेच सत्य. हे सर्व चांगल्या गोष्टी करण्यामागे शोषण हा त्यांचा मूळ उद्देश होता. त्यामुळे त्यांच्या गुलामीच्या जोखडातून मुक्त होणे आवश्यकच होते.
त्यामुळे देश स्वतंत्र करण्यासाठी अनेक ज्ञात,अज्ञात महापुरुषांनी तन,मन,धनाने लढा देऊन प्रसंगी आपल्या प्राणांची आहुती देऊन आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. देश जेव्हा स्वतंत्र झाला तेव्हा देशामध्ये प्रचंड अज्ञान, गरिबी, भिन्न प्रदेश, भिन्न भाषा, भिन्न वेश, भिन्न संस्कृती होती या सर्व समस्यावर मात करत आपली प्रगती सुरू ठेवली आणि या पंच्याहत्तर वर्षांमध्ये जगातील बहुतेक विकसित देशांमध्ये आपल्या बुद्धिमत्तेच्या व शिक्षणाच्या जोरावर भारतीय पोहोचले. त्या देशांमधील एक प्रमुख घटक बनले. तिथे निवास करून त्या देशाचे नागरिक झाले. त्यांच्या संस्कृतीशी समरस झाले. त्यामध्ये ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, कॅनडा यासारख्या विकसित देशांमध्ये अतिशय महत्त्वाच्या पदावर भारतीय पोहोचले.
याशिवाय सिंगापूर, पोर्तुगाल, मॉरीशीस, सुईनाम,सेशेल्स,फिजी, येथील पंतप्रधान व राष्ट्राध्यक्ष यासारख्या महत्त्वाच्या पदांवर सुद्धा भारतीय पोहोचले आहेत. आपल्या बुद्धीच्या आणि शिक्षणाच्या जोरावर भारतीयांनी ही पदे काबीज केली. अमेरिका व इंग्लड ही आजच्या घडीला जगातील सर्वात बलाढ्य राष्ट्र.यातील अमेरिकेचे उपराष्ट्रपती तर इंग्लडचे पंतप्रधान हे भारतीय वंशाशी संबंधीत.जगावर वर्चस्व गाजवणाऱ्या या दोन देशातील प्रमुख हे भारतीय वंशाशी संबंधित आहे ही फार अभिमानाची गोष्ट भारतीयांसाठी निश्चितच आहे.
आजही जर देशातील धर्मभेद, जातीभेद, प्रांतभेद, भाषाभेद, वंशवाद सर्व प्रकारच्या कट्टरता सोडून शिक्षणावर आणि विज्ञानावर जोर दिला तर आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर भारतीय अनेक देश काबीज केल्याशिवाय राहणार नाही. त्यासाठी आजच्या सत्ताधिशांना या सर्व भेदभावाच्या पलीकडे जाऊन व्यापक दृष्टिकोन अंगीकारावा लागेल आणि तशी देशाची ध्येयधोरणे ठरवावी लागतील. तरच जगात एक नंबर केवळ भारतीय आणि भारतीयचं असतील यात तिळमात्र शंका नाही.
जय हिंद ! जय भारत !!
— धनराज कन्नर
खामगाव जिल्हा बुलढाणा
9881229504
Leave a Reply