देणाऱ्याने देत जावे
घेणाऱ्याने घेत जावे ॥ धृ ॥
सत्तेवरल्या मंत्र्याकडून
भले मोठे पोट घ्यावे
मऊ मऊ खुर्चीसाठी
डावपेच त्यांचेच खेळावे ॥ १ ॥
गरीबशा लोकांकडून
गरीबीची दु:खे घ्यावी
पोटातल्या आगीसाठी
हातचलाखी शिकावी ॥ २ ॥
भडकलेल्या आगीवरुन
तडकण्याचा गुण घ्यावा
भरलेल्याशा ‘खिशा’कडून
आपला तेवढा ‘हप्ता’ खावा ॥ ३ ॥
मेलेल्याने मरत रहावे
खाणाऱ्याने खात जावे
नरकातल्या जागेविषयी
‘खाऊबा’ने निश्चिंत रहावे ॥ ४ ॥
(कवी विंदा करंदीकरांची ‘देता’ कविता, जी आमच्या शालेय अभ्यासक्रमात होती, ती प्रस्तुत कवितेची स्फूर्ती आहे.)
-यतीन सामंत
ऋणानुबंध या कविता संग्रहातून
(१९७४)
Leave a Reply